
>> अजित कवटकर
संभाव्य अणुयुद्धाच्या तडाख्यातून कोणीच वाचू शकत नाही. ज्या संसाधनांच्या हव्यासापोटी ही आक्रमकता दाखवली जात आहे, ती संसाधनं अशा युद्धाअंती कितपत उपयोगी राहतील? जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान अमर्याद होणार आणि त्यातून जरी जो वाचेल वा जे वाचेल त्याची शाश्वती कितपत असेल? तेव्हा आण्विक युद्ध म्हणजे सर्वनाशच. तेव्हा माणूस म्हणून लाभलेला जन्म स्वतः जगण्यासाठी, दुसऱ्याला जगविण्यासाठी, निसर्गाची नैसर्गिकता जपण्यासाठी जगणे हेच माणसाचे माणूसपण आहे.
हिरोशिमा, नागासाकीचा विध्वंस केलेल्या अणुबॉम्बपेक्षा आताचे अणुबॉम्ब पैक हजार पटीने अधिक संहारक आहेत. आपल्या जीवनग्रहावरील जीवसृष्टीचा नायनाट करण्याची क्षमता या अणुबॉम्बमध्ये असताना आता त्याहून अधिक घातक अशा ‘हायड्रोजन बॉम्ब’चे जगाला वेध लागल्याचे दिसत आहे. सामूहिक संहारक शस्त्र्ाास्त्र्ाांच्या निर्मितीची स्पर्धा पाहता, या वेडेपणात संपूर्ण मानव संस्कृती ही कायमस्वरूपी संपुष्टात आणली जाण्याची भीती निर्माण होत आहे. जगभरातील त्यांची आजची उत्पादित संख्या पाहता, हे एकत्रितपणे पृथ्वीला ‘होत्याची नव्हती’ करू शकतात, इतकी त्यांची शक्ती विनाशकारी आहे. 1945 ला केवळ दोन अणुबॉम्बने जवळजवळ अडीच लाख लोकांचा क्षणांत बळी घेतला. जिथे ते टाकले गेले त्या शहरांतील जवळपास 70 टक्के इमारती जमीनदोस्त झाल्या. धरणी हादरवून टाकणारे व आकाश व्यापून टाकणारे त्यांचे आगीचे लोट यांपेक्षा त्यांच्यातून दूरपर्यंत पसरणारे ‘रेडिएशन्स’ हे अधिक धोकादायक ठरतात. म्हणूनच या हल्ल्यातून वाचणाऱ्यांपैकी अनेक पुढे ‘कॅन्सर’सारख्या जीवघेण्या रोगांशी अखेरपर्यंत झगडत जगतात. या ‘रेडिएशन्स’चा अनेक दशकांपर्यंतचा प्रभाव हा अनेक पिढय़ा उद्ध्वस्त करतो. इतकी सारी वास्तविकता समोर असतानादेखील आज अशी व यासारखी शस्त्रास्त्र बनविण्याची एवढी घाई व अट्टाहास का? जग संपवून आपण काय जिंकणार आहोत?
पृथ्वीच्या इतिहासात प्रथमच अणुबॉम्ब वापरले गेले आणि त्यांनी दाखवलेला मृत्यू व विनाशाचा अमानुष तमाशा पाहून जग सुन्न झाले. दुसरे महायुद्ध संपले. पुढे अमेरिका व सोव्हिएत युनियन यांमध्ये शीत युद्ध सुरू झाले. तिसरे महायुद्ध लवकरच होणार, याची खात्रीशीर संभावना मनी बाळगून प्रत्येक राष्ट्र मग तयारीला लागले. ज्याकडे अणुबॉम्ब असणार त्याची दहशत राहणार हे निर्विवाद होते, पण आता सगळेच ते तयार करू लागल्यामुळे ज्याकडे अणुबॉम्बची संख्या सर्वाधिक असणार, त्याची दहशत वरचढ ठरणार हे स्वाभाविक होते. याचा परिणाम असा झाला की, आता जगभरात अणुबॉम्बची जणू गुप्त कारखानदारीच सुरू झाली आहे, परंतु जर आपल्याला आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राला याबाबतीत मागे टाकणे शक्य नसेल तर मग अशी प्रतिकूलता अनुकूल करण्यासाठी आपण त्याहून अधिक काहीतरी वेगळे व अधिक संहारक प्रकार निर्माण करणे हुकमी ठरले. असाच तर्क बांधून आता ‘उत्तर कोरिया’सारखी राष्ट्रं ‘भयानक प्रकारांच्या संशोधन व विकासातून’ जे तयार करत आहेत ते सगळ्यांचीच शाश्वती संपवणार असे दिसते.
हे सारं थांबवले गेले पाहिजे आणि तेदेखील वेळीच. हुकूमशाही पद्धतीने लोकशाही चालवणाऱ्या देशांमधील सत्ताधाऱ्यांमध्ये असली दुर्बुद्धी अधिक रुजल्याचे दिसत आहे. ही विकृती संपविणे तेथील मतदारांच्या हातात आहे. जीवनदायी जीवनाचा पुरस्कार करणाऱ्या जनतेच्या जनआक्रोशातून हे संभव आहे. केवळ एखाद् दुसऱ्या देशात असे स्थित्यंतर घडल्याने बदल होणार नाही तर संपूर्ण जगाने आण्विक निःशस्त्रीकरण, शस्त्रसंन्यास घेणे अनिवार्य असेल.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच्या भौगोलिक राजकारणाने पराजित राष्ट्रांना ओरबडल्याचे घाव आता पुन्हा उघडू लागले आहेत. आपले अधिकारच हिरावून घेतल्यावर हक्क दाखविणारा महत्त्वाकांक्षी राष्ट्रवाद आज ‘अणुबॉम्ब’च्या वापराची धमकी देण्याइतपत टोकाची भूमिका घेताना दिसत आहे. मानवाचा अविचारी भौतिकवाद अनेक अत्यावश्यक संसाधनं अक्षरशः नामशेष करण्याच्या मार्गावर आहे. मर्यादित संसाधनांच्या अमर्याद मागणीचा पुरवठा निरंतर सुरू ठेवण्याकरिता, अशा संसाधनांची विपुलता असणाऱ्या राष्ट्रांवर वर्चस्व मिळविण्याची विस्तारवादी भूमिका ही आज जागतिक युद्धाचे ढग पुन्हा एकवटण्यास कारणीभूत ठरत आहे. शेजारील राष्ट्रांच्या महत्त्वाकांक्षेला चढलेला जोर वा मिळणारे बळ हे आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने असुरक्षिततेचे कारण समजण्याची सवय ही इतिहासाने आजपर्यंत दाखवलेल्या कटू अनुभवांमुळे रुजलेली आहे. यामुळेच आज जगातील बहुतेक शेजारी राष्ट्रं ही सीमारेषा वादावरून धुसफूसत आहेत. रशियाने आधुनिक शस्त्रास्त्र निर्मिती व सुसज्ज सैन्य दल बांधणीत घेतलेली आघाडी आणि त्याचेच मित्रराष्ट्र चीन हादेखील अर्थकारणात जागतिक स्तरावर निर्माण करत असलेला दबदबा हा अमेरिकेला आपले महासत्ता पद टिकवण्यासाठी अधिक आक्रमक होण्यास व अनैतिक राजकारणातून हेतुपुरस्सर अनेक भागांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यास प्रवृत्त करत आहे. दुसऱ्यांना अस्थिर करून स्वतःची स्थिरता, प्राबल्य, प्रभुत्व अबाधित ठेवण्याचे राजकारणच आजच्या युद्धजन्य परिस्थितीला जबाबदार आहे.
तिसरे महायुद्ध मिथ्य वाटत असतानाच अनपेक्षितपणे रशिया-युव्रेन वादाची ठिणगी आता महायुद्धाचे रौद्ररूप दाखवू लागल्याकारणाने आज प्रत्येक देशाच्या प्राथमिकता अचानक बदलणार आहेत. कालपर्यंत आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सेवासुविधा वगैरेंना अर्थसंकल्पात अधिक प्राधान्य व उदारता दाखवली जात होती, परंतु आजची असुरक्षितता, अनिश्चितता मात्र या सगळ्या गोष्टींना फाटा देत बहुतांश निधी हा युद्ध तयारी संबंधी प्रत्येक गोष्टीसाठी वळविला जाणार. म्हणजेच अब्जो रुपये जे सामाजिक उन्नतीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेसाठी उत्पादनक्षम ठरणार होते व त्यातून जीवन अधिक समर्थ, समृद्ध, शाश्वत बनविण्याचा प्रयास होणार होता ते आता जीवन संपविण्यासाठी खर्च होणार आहे. अशातून जगाची संपूर्ण अर्थव्यवस्था ढासळणार आणि हेच युद्धाअगोदरच्या मरण यातनांची अनुभुती देणार. कोरोना महामारी विरुद्धचे युद्ध जिंकून मानवता वाचविण्यासाठी संपूर्ण जगाने एकत्र येऊन दाखवलेली माणुसकीची एकात्मता इतक्या लवकर एकमेकांविरुद्ध उभी ठाकणे हे दुर्दैवी आहे.
संभाव्य अणुयुद्धाच्या तडाख्यातून कोणीच वाचू शकत नाही. ज्या संसाधनांच्या हव्यासापोटी ही आक्रमकता दाखवली जात आहे, ती संसाधनं अशा युद्धाअंती कितपत उपयोगी राहतील? जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान अमर्याद होणार आणि त्यातून जरी जो वाचेल वा जे वाचेल त्याची शाश्वती कितपत असेल? तेव्हा आण्विक युद्ध म्हणजे सर्वनाशच. त्या विदारकतेनंतरच्या भयाण व भयावह वातावरणात जगणं हे सुदैव म्हणावं की दुर्दैव! त्या जगण्याला काय अर्थ उरणार? तेव्हा माणूस म्हणून लाभलेला जन्म स्वतः जगण्यासाठी, दुसऱ्याला जगविण्यासाठी, निसर्गाची नैसर्गिकता जपण्यासाठी व जीवनाला आवश्यक असणारे सर्व पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवण्यासाठी जगणे हेच माणसाचे माणूसपण आहे.




























































