लेख-  अंधारातील तेजस्वी दीप!

792

1963च्या जानेवार महिन्यात दिल्लीतल्या एका स्टेडियमवर सैनिकांना अभिवादन करणारा हृद्य कार्यक्रम झाला. त्यावेळी कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आणि सी. रामचंद्र यांचं संगीत असलेलं एक अजरामर गीत लता मंगेशकर यांनी गायलं. 1962च्या अखेरीस जे युद्ध आपल्यावर चीनने लादलं त्यात शहीद झालेल्या सैनिकांविषयी त्या गाण्यात कृतज्ञता होती. त्यातली एक ओळ अशी होती की ‘जब हम बैठे थे घरों में वो खेल रहे थे होली’ ही ‘होळी’ साक्षात मरणाची होती आणि ती देशवासीयांच्या सुरक्षेसाठी होती. ती तर प्रत्यक्ष शस्रास्त्रांची लढाई होती. कारण समोर उन्मत्त शत्रू दिसत होता. त्याच्य आक्रमणापासून देश वाचवण्यासाठी सैनिक प्राणांची बाजी लावून लढले होते. ‘हे मेरे वतन के लोगो’ या गाण्यातले ते शब्द आहेत.

आज जगात एका अदृश्य शत्रूविरुद्ध लढाई सुरू आहे. कोरोना नावाच्या महामारीविरुद्धचं महायुद्ध! आणि त्यातले शिलेदार, सैनिक आहेत डॉक्टर, परिचारिका (नर्स) आणि पोलीस, तसेच सफाई कामगारांपासून पत्रकारितेसारख्या आवश्यक सेवांमधले सर्व कर्मचारी. ही सारी मंडळी आपण घरात बसलेलो असताना ‘लढतायत.’ आपल्याला हात जोडून सांगतायत की घरात निवांत बसूनच आम्हाला सहकार्य करा. त्यांचं काम मात्र त्यांना अहोरात्र करावंच लागतंय. ती केवळ नोकरी नाही. ते एक क्रत आहे. कठीण कर्तव्य ते आपल्यासाठी पार पाडतायत. जगातल्या नागरिकांनी ठिकठिकाणी या सर्व सेवा देणार्‍या सुरक्षा देणार्‍यांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली आहे. मात्र त्यांना संपूर्ण सहकार्यही द्यायला हवं. कारण असल्यासाठीच ‘लढताना’ ही मंडळी सैनिकांप्रमाणेच स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मैदानात उतरलीय. त्यांचा हा सामाजिक सेवाभाव, आपलं सहकार्य आणि नजीकच्या भविष्यात या आता दुर्धर वाटणार्‍या रोगावरचं औषध आपल्याला ‘कोरोना’ संकटातून जरूर मुक्त करेल, पण तोवर धीर सोडून चालणार नाही.

लढाई, रोगराई, दुष्काळ, भयानक व्याधी जगाला नवीन नाहीत. यावेळची ‘साथ’ मात्र सर्व जगाच्या हात धुवून मागे लागली आहे. या संकटाशी सामना करताना जगात अनेक ठिकाणी सुरक्षाकर्मी, डॉक्टर, नर्स यांनाही कार्यरत असताना प्राण गमवावे लागलेत. आजच्या जागतिक ‘परिचारिका’ दिनानिमित्त त्या सर्वांच्या कृतज्ञतेने स्मरण करूया आणि जे लढताहेत त्यांचं आत्मबळ वाढेल याची काळजी घेऊ या.

आजारी, व्याधीठास्त माणसांची देखभाल करणारी हजारो माणसं समाजात असतात. काही वेळा घरच्या घरीही सुश्रुषा केली जाते. परंतु जिथे विशिष्ट वैद्यकीय सेवेची गरज असते तिथे प्रशिक्षित परिचारिकाच रुग्णांची काळजी घेत असतात. डॉक्टरांनी रोगाचं निदान करून औषधयोजना ठरवल्यावर रुग्ण ठीक होईपर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर येते. महिला नर्सना आपण ‘स्टिस्टर’ आणि पुरुष नर्सना ‘ब्रदर’ म्हणतो यातच त्यांच्याशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं प्रतीक होतं.

12 मे परिचारिका दिवस जगभर मानला जातो कारण इंग्लंडमध्ये आधुनिक नर्सिंगची सुरुवात करणार्‍या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा तो जन्मदिवस आहे. 12 मे 1820 ते 13 ऑगस्ट 1910 अशा नव्वद वर्षांच्या प्रदीर्घ जीवनात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी केवळ रुग्णसेवेचाच ध्यास घेतला. ब्रिटीश कुटुंबाच्या या मुलीचा जन्म इटलीच्या फ्लॉरेन्स शहरात झाला म्हणून तेच नाव ठेवण्यात आलं. (आपल्याकडेही काशी शहरावरून काशीबाई नाव असतं तसंच.) उदारमतवादी घरात फ्लॉरेन्सची वैचारिक जडणघडण झाली तरी अविवाहित राहून तिने ते रुग्णसेवेचं कार्य करण्याचा निर्णय घेतल्यावर थोडी खळखळ झालीच. फ्लॉरेन्स ठाम होत्या. 1844 मध्ये त्यांनी हे ‘क्रत’ स्वीकारलं. तोपर्यंत त्यांचं कुटुंब पुन्हा इंग्लंडमध्ये स्थिरावलं होतं.

पुढे 1854 मध्ये इस्तबूलजवळच्या  क्रिमिया या द्विवकल्पात झालेल्या लढाईतील जखमी सैनिकांची सुश्रुषा करण्यासाठी त्या गेल्या. आधुनिक काळातलं ते पहिलं ‘नर्सिंग’ मानलं जातं. 1853 मध्येच फ्लॉरेन्स यांनी ‘केअर ऑफ सिक’ ही महिलांसाठीची विशेष रुग्णसेवा सुरू केली. त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या काळात वार्षिक पाचशे पाऊंड मिळण्याची व्यवस्था केल्याने आर्थिक विवंचना सुटली. मग त्यांनी सारं आयुष्य रुग्णसेवेला वाहिलं. 1860 मध्ये वडिलांनी दिलेला पैशातील 45 हजार पाऊंडची शिल्लक रक्कम त्यांनी 9 जुलै रोजी ‘नाइटिंगेल ट्रेनिंग स्कूल’ लंडनच्या सेंट थॉमस रुग्णालयात (करोनामुळे पंतप्रधान जॉन्सन जिथे होते तेथे) सुरू केलं. हळूहळू त्यांचा हा वसा जगभर पसरला. एकोणिसाव्या शतकात आनंदीबाई जोशी हिंदुस्थानातल्या पहिल्या डॉक्टर झाल्या, पण अकाली मृत्युमुळे त्यांच्या हातून रुग्णसेवा घडू शकली नाही. डॉ. रखमाबाई राऊत या देशातील पहिल्या प्रॅक्टिसिंग डॉक्टर. न्या. रानडे यांच्या पत्नी रमाबाई यांचं ऍपेन्डिसायटिस्ता ऑपरेशन झालं तेव्हा रखमाबाई इंग्लिश डॉक्टरच्या सहाय्यक होत्या असं वाचण्याचं आठवतं.

ब्रिटीश अंमलात ज्या काही बर्‍या गोष्टी आपल्याकडे घडल्या त्यात आधुनिक रुग्णालय आणि सुश्रुषा पद्धती आली. नर्सिंगच्या क्षेत्रात महिला मोठय़ा प्रमाणावर आल्या. मनोभावे रुग्णसेवा करू लागल्या. माझ्या एका आत्येबहिणीने 60 वर्षे परिचारिका म्हणून काम केलं. नर्सच्या कनवाळूपणाने रुग्णांना किती बरं वाटतं ते आतापर्यंत लाखो रुग्णांनी अनुभवलं असेल. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली. क्रिमियन युद्धकाळात त्या रात्री दिवा घेऊन जखमी सैनिकांनी सुश्रुषा करत. म्हणून त्यांना ‘लेडी विथ कॅम्प’ असं म्हटलं जाई. रुग्णसेवा करणार्‍या सर्वच नर्स रुग्णांच्या जीवनात आशेचा दीप उजळतात हे खरंच.

आपली प्रतिक्रिया द्या