
>> राहुल आवारे
ऑलिम्पिक या जगातील प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवाला शुक्रवारपासून टोकियो येथे सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे मागील वर्षी (2020) आयोजित करण्यात येणारे ऑलिम्पिक या वर्षी (2021) ढकलण्यात आले. कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. अशा बिकट परिस्थितीतही जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिकचा थरार पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, जपानी सरकार, जपान ऑलिम्पिक असोसिएशन या सर्वांनीच ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतलाय. ही काwतुकास्पद बाब आहे.
जपानमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय. यामुळे तेथील जनतेकडूनही या महोत्सवाला विरोध करण्यात आला आहे. कोरोना वाढल्यानंतर कोणत्याही क्षणी ऑलिम्पिक रद्दही केले जाऊ शकते असे स्पष्ट मत ऑलिम्पिक आयोजकांकडून व्यक्तही करण्यात आले आहे. तरीही जपान सरकार, जपानी ऑलिम्पिक असोसिएशन व संबंधिक अधिकाऱयांनी ‘ऑलिम्पिक मिशन’ पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे.
हिरोशिमा, नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर बेचिराख झालेल्या जपानने यामधून बाहेर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. आता कोरोना संकटावर मात करीत याच जपानने आता ऑलिम्पिक यशस्वी करून दाखवण्याचा मार्ग अवलंबला आहे. मागील पाच वर्षांमध्ये या ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी मोठय़ा प्रमाणात खर्चही झालाय. ऑलिम्पिकसाठी क्रीडागाव उभारणे व त्याच्या देखभालीचा खर्च उचलणे हे काही सोपे नाही. कोरोनामुळे या क्रीडा महोत्सवामधून स्पॉन्सर्सनेही माघार घेतली आहे. यामुळे आयोजकांवर आणखीनच ताण पडलाय. जपानऐवजी इतर कोणता देश असता तर त्यांनी माघारही घेतली असती; पण जपानने ‘करून दाखवण्यासाठी’ कंबर कसली.
हिंदुस्थान सहा ते आठ पदके जिंकणार
हिंदुस्थानी खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहा ते आठ पदके जिंकतील. मी कुस्तीपटू असल्यामुळे याच खेळामधून मला जास्त पदकांची आशा आहे. बजरंग पुनिया, रवी दहीया, विनेश फोगट हे कुस्तीपटू फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्याकडून पदक जिंकण्याची अपेक्षा बाळगता येऊ शकेल. बॉक्ंिसगमध्ये मेरी कोम व अमित पांघल हे खेळाडूही देशासाठी पदक पटकावू शकतात. नेमबाजी, तिरंदाजी, बॅडमिंटन या खेळांमधून हिंदुस्थान पदकाची आस बाळगू शकेल.
क्रीडा महोत्सव रद्द व्हायला नको
कोरोनाच्या संसर्गामुळे हा क्रीडा महोत्सव रद्द व्हायला नको. कारण टोकियो ऑलिम्पिक दर चार वर्षांनी आयोजित केले जाते. खेळाडूंनी यासाठी प्रचंड मेहनत केलेली असते. काही खेळाडूंचे हे शेवटचे ऑलिम्पिकही असू शकेल. या क्रीडा महोत्सवाशी त्यांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीतील ऑलिम्पिकमध्ये कोणताही अडथळा यायला नको.


























































