आपला माणूस : यज्ञ ज्ञानदानाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

सध्याच्या वैद्यकीय व्यवसायातील कटप्रॅक्टिसच्या युगात डॉ. ओमप्रकाश कपूर तथा ओ. पी. कपूर गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोफत लेक्चर्स देत आहेत. आज वयाच्या ८६ वर्षीही विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचा हा अखंड यज्ञ सुरू आहे…

देशाच्या फाळणीच्या काळात डॉ. ओमप्रकाश कपूर हा पंजाबी तरुण लाहोरमधून मुंबईत चित्रपटसृष्टीत अथवा हॉटेल व्यवसायात जम बसवण्यासाठी थेट मुंबईत आला. पण अफाट बुद्धिमत्ता व आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न रचत त्यांनी भायखळा येथील ग्रँट मेडिकल महाविद्यालय व जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. १९५५ मध्ये एमबीबीएसची पदवी मिळल्यावर पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांनी जे. जे रुग्णालयातील पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रात्रीचे लेक्चर घेण्यास सुरुवात केली. दर शुक्रवारी रात्री सुरू होणारी लेक्चर्स पहाटेपर्यंत सुरू असत. आजही डॉ. ओ. पी. कपूर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ज्ञानदानाचे त्यांचे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. एकही पैसा न घेता, किंबहुना स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून दरवर्षी पावसाळ्यात सलग सोळा रविवार बिर्ला मातोश्री सभागृहात लेक्चर्स घेतात. रविवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी लेक्चर होते. डॉ. ओ. पी. कपूर यांचा जन्म ३० डिसेंबर १९३२मध्ये पाकिस्तानातील पंजाब प्रांतात झाला. फाळणीच्या वेळेस कपूर कुटुंबीय हिंदुस्थानात आले. हा गोरागोमटा अस्सल पंजाबी तरुण मुंबईत चित्रपटसृष्टीत सहज स्थिरावला असता पण त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. एका बाजूला पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांना दुसऱया बाजूला एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जे. जे. रुग्णालयाच्या मोतलीबेन हॉलमध्ये लेक्चर घेण्यास सुरवात केली. त्यांची ही लेक्चर्स वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ओ पी. कपूर यांची लेक्चर्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. ज्ञानाचा अंखड धबधबा, पंजाबी लयीत कधी विनोदाचा शिडकावा असा ज्ञानदानाचा यज्ञ सुरू होता. पुढे जे. जे. रुग्णालयातच त्यांनी नोकरी पत्करली. १९८५मध्ये जे. जे. रुग्णालयातून निवृत्त होईपर्यंत त्यांची रात्रीची लेक्चर्स सुरू होती. जे. जे. रुग्णालयातील त्यांच्या तीस वर्षांच्या कालावधीत किमान तीस हजार डॉक्टरांनी त्यांच्या लेक्चर्सचा लाभ घेतला. निवृत्त झाल्यावर मुंबईतील केईएम, शीव, नायर आणि जे. जे. रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी त्यांची भेट घेतली आणि मेडिसिन या विषयावर लेक्चर देण्याचा आग्रह धरला. त्यासाठी बॉम्बे हॉस्पिटलने बिर्ला मातोश्री हॉल मोफत उपलब्ध करून दिला. तेव्हापासून डॉ. ओ. पी. कपूर यांची लेक्चर्स सुरूच आहेत.

डॉ. कपूर यांची परदेशातही दोनशेहून अधिक लेक्चर्स झाली आहेत. या सर्व लेक्चर्ससाठी आवश्यक स्लाईडस् त्यांनी तयार केल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवीन संशोधन सुरू असतो. आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी ते दर शनिवार-रविवार भरपूर वाचन करतात. या सर्व व्यापात बॉम्बे हॉस्पिटलचे वैद्यकीय क्षेत्राचे जर्नलही संपादित करतात. लंडनमध्ये आयोजित ब्रिटिश एडिटर्स कॉन्फरन्समध्ये त्यांनी हे सर्व सांगितले तेव्हा उपस्थितांचा विश्वासच बसत नव्हता. पण समाजाचे काही आपण देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम चालवत असल्याचे डॉ. कपूर यांनी विनम्रपणे सांगितले तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकटाड झाला. त्यांच्या या उपक्रमाची दखल ब्रिटिश मेडिकल जर्नलनेही घेतली आहे. लेक्चर्सच्या जोडीला त्यांनी ‘कपूर्स फॅमिली मेडिकल गाईड’ भाग एक व भाग दोन, अॅमेबिक लिव्हर अॅब्सेस, कॉमन क्रोनिक डिसिज पॅटर्न्स इन द अरेबियन गल्फ, सौदी अरेबिया अँड येमेन, व्हेजिटेरियन डाएट इन हेल्थ अँड डिसिज अशी पुस्तके लिहिली. जगभरातील वेगवेगळ्या मेडीकल जर्नल्समध्ये त्यांचे किमान सातशे लेख प्रकाशित झाले आहेत. ज्ञानाचा हा समृध्द खजिना वैद्यकीय विद्यार्थ्यांना ते खुल्या मनाने दान करत आहेत. डॉ. कपूर आता नव्वदीकडे झुकत आहेत. पण लेक्चर्स देण्याची त्यांची उर्जा व उत्साह आजही तेवढाच आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार, बेस्ट टीचर ऑफ मिलेनियम, धन्वंतरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. वैद्यकीय शिक्षण देणारे खासगी कोचिंग क्लासेस एका विद्यार्थ्याकडून प्रत्येक वर्षासाठी ५० हजार ते एक लाख रुपये फी आकारतात. पण डॉ. कपूर यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही न घेता ज्ञानदान केले आहे आणि यापुढेही हा यज्ञ ते सुरू ठेवणार आहेत.

– [email protected]