लेख – ऑनलाइन शिक्षण पद्धत; काही फायदे काही तोटे

>> मीनल सतीश सरकाळे

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता ‘शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे.’ राज्य शासनाच्या या धोरणानुसारच आज आपण ऑनलाइन एज्युकेशन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू तर केली आहे, मात्र याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालक प्रचंड संभ्रमात आहेत. त्यामुळे खरोखरच ऑनलाइन शिक्षण पद्धती ही पारंपरिक शिक्षण पद्धतीला पर्याय ठरू शकते का यावर विचार करून त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजूंची चर्चा करणे खूपच आवश्यक आहे.

कोरोना विषाणूने आपल्या जीवनपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आपल्याला हवे किंवा नको असलेले खूप मोठे बदल आपल्या आयुष्यात होत आहेत. वर्क फ्रॉम होम संस्कृती, स्वच्छतेचे नियम, सार्वजनिक ठिकाणी वावरतानाचे नियम हे सर्व आपल्या अंगवळणी पडत चालले आहे. माणसाची जीवनशैली बदलली. प्रत्येकातच वैचारिक, व्यावहारिक, शैक्षणिक, मानसिक सगळ्याच स्वरूपाचे बदल झालेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाइन शिक्षण!

शिक्षणाचा उद्देश चहुबाजूंनी मिळणारे ज्ञान आत्मसात करणे व त्यातून आपले उत्तम व्यक्तिमत्व घडवणे हा आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा जेवढा वापर होऊ शकतो तेवढा अन्य कशाचाही होऊ शकत नाही. ऑनलाइन शिक्षणामुळे विकासाचे पुढचे पाऊल टाकले जाऊन विद्यार्थी व शिक्षकांसाठी ज्ञानाचे भांडार उघडले गेले आहे. झूम, गुगल मीट, क्लास रूम आणि काहीजण व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने शिकवण्याची ही प्रक्रिया राबवत आहेत. नवीन काहीतरी शिकायला मिळणार म्हणून एक जिज्ञासा, कुतूहल आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानयुक्त पद्धत सुरुवातीला खूप छान व परिस्थितीनुरूप सोयिस्करदेखील मानण्यात आली. कदाचित शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही ही वर्क फ्रॉम होमची ऑनलाइन एज्युकेशन पद्धत आवडली असेलही, पण हे डिजिटल शिक्षण कायमस्वरूपी इलाज होऊ शकते का की, आताच्या अडचणीच्या काळात एक पर्यायी उपलब्धता म्हणून स्वीकारलेली ती एक पद्धत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक विकासाबरोबर शारीरिक व मानसिक विकासदेखील खूप महत्त्वाचा आहे. तो आपण ऑनलाइन शिक्षणामध्ये देऊ शकतो का? आणि शिक्षकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक शिक्षकाने तंत्रस्नेही बनले पाहिजे ही काळाची गरज आहे.

सकारात्मकता

  • कोविड-19 चा कोणताही धोका न पत्करता विद्यार्थी व शिक्षक ऑनलाइन संवाद साधू लागले.
  • शिक्षक नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक काळातील टेक्नोसॅव्ही शिक्षक बनत आहेत.
  • शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षकांचे उत्तम शिक्षण ग्रामीण भागातील मुलांना पण मिळू लागले.
  • मुलगा ऑनलाइन अभ्यास करतो आहे की नाही यावर पालक लक्ष ठेवू लागले.
  • मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे याऐवजी मुले ऑनलाइन अध्ययनात व्यस्त झाली.
  • पूर्वी सहा तास शाळा, त्यात जाण्या-येण्यासाठी लागणारा आणि शाळेची तयारी करण्यासाठी लागणारा वेळ, शिवाय अतिरिक्त शिकवणी वर्ग यामध्ये जाणारा वेळ वाचण्यास मदत झाली.
  • तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात त्याविषयी गोडी निर्माण होऊ लागली आहे. यूटय़ुबसह इतर यंत्रणांचा अचूकपणे वापर करता येऊ लागला आहे.हे सर्व असले तरी याच्या नकारात्मक बाजूचादेखील विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. एक शिक्षक जोपर्यंत प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना समोर बघून शिकवत नाही तोपर्यंत या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सजीवता निर्माण होत नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन करत असताना त्यांच्याशी साधला जाणारा भावनिक संवाददेखील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा एक भाग असतो हे दुर्लक्षित करून चालणार नाही. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये प्रत्यक्ष आंतरक्रिया होणार नाही तोपर्यंत अभ्यासातील समस्या, अडचणी सोडवता येणे शक्य नाही.

नकारात्मकता

विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या चार शैली आहेत. यात बसून, ऐकून, स्पष्ट करून आणि कृतीतून शिकण्याचा समावेश आहे. परंतु विद्यार्थी 90 टक्के अनुभवातून शिकत असतो तो अनुभव या पद्धतीमुळे घेता येत नाही.

शिक्षक व विद्यार्थी या दोघांमध्ये प्रत्यक्ष संवाद होत नसल्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अनेक अडथळे येत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे शिक्षकांनी केलेले अध्यापन विद्यार्थ्यांना समजते की नाही याचा उलगडा होत नाही. त्यामुळे शिक्षकांना शिकवण्याचे समाधान मिळत नाही.

दुसरी मोठी समस्या म्हणजे या शिक्षण पद्धतीसाठी लागणारे मोबाईल, संगणक ही साधने. अनेक गरीब पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल, संगणक यापैकी कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होत आहे. ग्रामीण भागातही फार मोठी समस्या आहे. विजेच्या समस्येमुळे हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचितच राहत आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेटवर्क सर्वांकडे उपलब्ध आहेच असे नाही. अनेक भागात इंटरनेटची समस्या असल्यामुळे व्हिडीओ डाऊनलोड करणे, ऑनलाइन लिंक ओपन होत नाही.

मोबाईल, लॅपटॉप, संगणकासमोर अधिक काळ बसल्यामुळे डोळ्यांचे व कानांचे विकार तसेच पाठदुखी असे आजार उद्भवू शकतात.

पूर्वी 30 ते 35 मिनिटांच्या तासात शिक्षक शैक्षणिक साधनांचा उपयोग करून व काही उदाहरणे देऊन अध्यापन करीत असत, व्हिडीओमुळे शिक्षक काटेकोरपणे केवळ विषयावरच बोलतात. त्यामुळे रटाळपणा वाढला.

विद्यार्थी अधिक काळ ऑनलाइन राहू लागल्यामुळे पालकांची नजर चुकवून अध्यापनाव्यतिरिक्त इतर आक्षेपार्ह विंडोज उघडली जाण्याची शक्यता वाढली आहे.

वर्गमित्र-मैत्रिणींशी भेट होत नसल्याने विद्यार्थी एकलकोंडे होण्याची भीती वाढू लागली आहे. पालकांच्या दृष्टिकोनातून विचार करता दररोज सकाळी ऑनलाइन लेक्चरच्या वेळी मुलांची मानसिक तयारी त्यांना करावी लागते. कित्येक वेळा विद्यार्थी झोपलेले असतात. विद्यार्थी खरोखरच अध्ययन करतो आहे की नाही हे समजू शकत नाही.

अनेक शाळांकडे आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. काही तासांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी काही हजार रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय ऑनलाइन शिक्षणातील सर्वात घातक प्रकार क्रीन टाइम हा आहे. यामुळे मेंदूतील चेतापेशी डॅमेज होतात. यातून आँटीजम हा आजार होऊ शकतो. यामुळे मेंदूत बिघाड होत नाही मात्र स्वमग्नता येण्याची शक्यता असते. असे मत मानसशास्त्रज्ञांनी देखील मांडले आहे.

पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला असता वर्ग अध्यापनासारखे प्रत्यक्ष प्रभावी शिक्षण मिळत नसल्याची खंत सर्वांनीच व्यक्त केली आहे. अल्पकालावधीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाइन शिक्षण परवडणारे असेलही मात्र सक्षम अध्ययन-अध्यापन प्रक्रियेकरिता ऑनलाइन शिक्षणपद्धत ही नक्कीच संयुक्तिक आहे की असंयुक्तिक यावर विचार मंथन करणे खूपच गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या