लेख – ऑनलाइन शिक्षण सक्षम करण्यासाठी…

441

>> सदाशिव पाटील

मानवी व्यवहारांमध्ये अनेक बाबतीत झालेली तूट कमी-अधिक काळात भरून काढता येते, परंतु शिक्षण क्षेत्र यास काहीसे अपवाद आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील प्रत्येक घटक सजगपणे कार्यरत राहिला पाहिजे. आपल्याकडे मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणक यांपैकी एक किंवा अधिक साधने उपलब्ध आहेत. आधीपासूनच आपण विविध गोष्टींसाठी या साधनांचा उपयोग करत आलो आहोत. आता मात्र शैक्षणिक उपक्रमांसाठी या उपकरणांचा परिणामकारक वापर केला पाहिजे. यातून अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या तीनही घटकांचा विकास साधून ऑनलाइन शिक्षण पद्धत सक्षम करायला हवी.

सध्याच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे संपूर्ण मानवी जीवन शिथिल झाले आहे. सगळ्या क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रही यास अपवाद नाही. परंतु ज्ञानाचे आदान-प्रदान ठप्प होऊन चालणार नाही. म्हणूनच गावपातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सर्वांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा प्रयोग सुरू केला आहे. हे नवे अध्ययन-अध्यापनतंत्र वर्गातील शिक्षण प्रक्रियेला पर्याय ठरू शकत नाही हे जरी खरं असलं तरी सद्यस्थितीत ते स्वीकारणे आवश्यक आहे. त्यासाठी आपली मानसिकता सकारात्मक हवी. नाइलाजानं स्वीकारण्यात आलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसून येत आहेत. यापूर्वी मोबाईल हवा तितका हाताळायला न मिळालेला एक विद्यार्थीगट आता मोबाईलमध्ये फारच व्यस्त दिसतोय. अनेक विद्यार्थी मोबाईलचा वापर प्रामाणिकपणे शैक्षणिक बाबींसाठीच करीत आहेत. बऱयाचशा पालकांना जास्तीचा मोबाईल विकत घ्यावा लागल्याने या टंचाईच्या स्थितीत त्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचे जाणवते. काहींना आपल्या अपरोक्ष आपली मुले मोबाईलचा दुरुपयोग तर करणार नाहीत ना, अशी शंका सतावते. तर काही पालक या नव्या तंत्राचा स्वीकार करून आपल्या पाल्यासोबत ऑनलाइन शिक्षण पद्धतीत सहभाग घेऊन त्याला प्रोत्साहन देत आहेत. विद्यार्थी व पालकांप्रमाणे गुरुजनांमध्येही भिन्न मानसिकता दिसत आहेत. काही गुरुजनांनी ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेचा धसका घेतला आहे. काहीजण सातत्याने हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण नवनवीन प्रयोग करत आहेत. पीपीटी, व्हिडीओज् बनवून अनेकांपर्यंत पोहोचवत आहेत. आपण सगळ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला हवं.

बहुतेक शाळांनी इयत्तांचे, तुकडय़ांचे (शिक्षक, विद्यार्थी-पालक) व्हॉट्सऍप समूह तयार केले आहेत. सुरुवातीला मेसेजच्या माध्यमातून सूचना व अभ्यास देणे सुरू झाले. नंतर पीडीएफ पाठवल्या जाऊ लागल्या. त्यानंतर ध्वनिफिती व चित्रफिती यांचा अवलंब सुरू झाला. हळूहळू गुगल क्लासरूम सुरू केले. यातून अभ्यास करण्याची व तपासण्याची यंत्रणा सुरू झाली. आता तर ‘झूम’, ‘गुगल मीट’ यांवरही विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्या सभा आणि संवाद सुरू झाले. अध्यापनाच्या तासिका सुरू झाल्या आहेत. विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपली तासिका यशस्वी कशी होईल, अधिक परिणामकारक कशी होईल यासाठी गुरुजनांचे प्रयत्न सुरू झाले. या प्रक्रियेस विद्यार्थी, पालक चांगले प्रतिसाद देऊ लागले आहेत.

हे सर्व घडत असताना काही प्रवृत्ती मात्र जशाच्या तशा मूळ धरून आहेत. अनेक शंका-समस्यांचे समर्थन करण्यात व्यस्त आहेत. हे शिक्षण गोरगरीबांपर्यंत कसे पोहोचेल, शेतकरी पालकांना यातलं काय कळतं, भटक्या व विमुक्त जमातींचे काय, सगळ्यांकडेच या सोयी-सुविधा आहेत का. असे प्रश्न उपस्थित करीत आहेत. इतकी वर्षे आपल्या मनाप्रमाणे शिक्षण प्रक्रिया चालू आहे. खरंच शंभर टक्के जग साक्षर झाले आहे का? शैक्षणिक विकास समाजातील सर्व घटकांमध्ये सारख्या प्रमाणात दिसून येतो का? कोणताही बदल माणूस सहजपणे स्वीकारत नाही. माणसाच्या या प्रवृत्तीवर नियंत्रण यायला हवं. खरंतर हे नाही, ते नाही असं म्हणण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य वापर करून चांगला परिणाम प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. आज कोणत्याही इयत्तेचा एखादा पाठय़घटक गुगलवर सर्च केला तर त्याचे अनेक ऑडिओ आणि व्हिडीओज मिळतात. त्यातल्या त्यात उत्तम वाटेल त्याची निवड करून आपण आपल्या स्वतःच्या अध्यापनात वापर करायला हवा. आज अनेक गुरुजन विविध विषयांतील घटकांवर स्वतःच्या ध्वनिफिती-चित्रफिती तयार करताना दिसतात. त्यासाठी विविध तंत्रस्नेहींची मदत घेतात. आपणही त्यांच्याशी जवळीक साधावी. त्यांची कला आत्मसात करावी. आपल्याकडूनही काही नवनिर्मिती व्हावी. अशा निर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो. मला वाटतं समस्या नाहीत असे कोणतेही क्षेत्र नाही, परंतु अडचणींचे अवडंबर माजू न देता परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आपले काम यशस्वी करणे फार महत्त्वाचे आहे. पाण्यात पडल्याशिवाय खोली समजत नाही आणि पोहताही येत नाही. प्रत्येकाची गती कमी-अधिक असू शकते. खरंतर प्रतिकूलतेत संधी शोधणे मानवी स्वभावाचं श्रेष्ठ वैशिष्टय़ आहे. एकमेकांच्या तुलना करण्यापेक्षा एकमेकांशी सहचर्य साधून नवनिर्मिती करायला हवी. राष्ट्रसंत

तुकडोजी महाराज यांच्या सांगण्यानुसार,
दुसऱयाचा राजहंस बरवा । आपला असेना का पारवा ।
परि स्वावलंबी कलेचा । रावा बोलवावा प्रत्येकाने ।

आज प्रत्येकाने या उक्तीनुसार आचरण करण्याची आवश्यकता आहे. मानवी व्यवहारांमध्ये अनेक बाबतीत झालेली तूट कमी-अधिक काळात भरून काढता येते, परंतु शिक्षण क्षेत्र यास काहीसे अपवाद आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील प्रत्येक घटक सजगपणे कार्यरत राहिला पाहिजे. आपल्याला खात्री हवी की, आजच्या नव्या स्रोतांतून भविष्यात खूपकाही कल्याणकारी गोष्टी हाती लागू शकतील. यामध्ये संघटन, समन्वय आणि अहंकाराचा त्याग फार महत्त्वाचा आहे. ‘मला सगळ्यातलं सगळं येतं.’ हा विचार दूर केला पाहिजे. ‘मला प्रत्येकातलं बरंच काही यायला हवं’ ही भावना जोपासायला हवी. प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती विशेष बाब असते. कुणाचं प्रभावी बोलणं, कुणाचं लेखनसौंदर्य, कुणाचं लयबद्ध गुणगुणणं, कुणाची चित्रकला, कुणाची फोटोग्राफी. अशा अनेक गुणवंतांमध्ये समन्वय निर्माण होऊन त्यांच्यातील अहंभाव नाहीसा झाला तर या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तमोत्तम ज्ञानसाधने निर्माण होतील. ती सर्वदूर पोहोचतील. अपेक्षित फलनिष्पत्ती होईल. बऱयाच अंशी हेतू साध्य होईल. आपल्याकडे मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणक यांपैकी एक किंवा अधिक साधने उपलब्ध आहेत. आधीपासूनच आपण विविध गोष्टींसाठी या साधनांचा उपयोग करत आलो आहोत. आता मात्र शैक्षणिक उपक्रमांसाठी या उपकरणांचा परिणामकारक वापर केला पाहिजे. यातून अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या तीनही घटकांचा विकास साधून ऑनलाइन शिक्षण पद्धत सक्षम करायला हवी. सुरुवातीला काही उणिवा नक्कीच जाणवतील, परंतु अनुभवातून अचूकतेकडे जाता येईल.

आपण आणखी किती दिवस लॉक डाऊनसारख्या परिस्थितीत असणार आहोत हे सध्यातरी कुणाला माहीत नाही. परंतु तंत्रविज्ञानाने आपल्याला आपले कार्य निरंतर करण्याची शक्ती निश्चितच दिली आहे. अध्यापनासोबत विद्यार्थी व पालकांना आनंददायी असे अन्य मनोरंजक शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा विकास निश्चितच साधला जात आहे. आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळे प्रतिकूल परिस्थितीचे संधीत रुपांतर होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या