मुद्दा – अवयवदान चळवळ व्हावी!

>> विश्वनाथ पंडित

रेल्वे अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे या युवतीला सुमारे सहा वर्षांनंतर नैसर्गिक हात मिळाले ही समाधान देणारी बातमी होय. मुंबईतील ही पहिलीच हस्तप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या नंतर ‘‘मी आता मेहंदी लावू शकेन.’’ या मोनिकाच्या हृदयस्पर्शी उद्गारांनीच अवयवदान किती महान, श्रेष्ठ आणि पुण्याचे काम असल्याचे अधोरेखित होते. चेन्नई येथील दुर्दैवी तरुणाचा मेंदू मृतावस्थेत असल्याचा निर्णय झाल्यानंतर त्याही दुःखद प्रसंगी त्याच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला ही लक्षणीय बाब आहेच. दुसरे म्हणजे याचा सकारात्मक विचार करता नागरिकांमध्ये अवयवदानासंदर्भातील समज, गैरसमज, विचार, पगडा दूर होत आहेत. दुर्दैवाने आपला माणूस तर गेला; परंतु त्याच्या अवयवातून तो जिवंत राहावा, दुसऱया जिवाला आपल्या नातेवाईकापासून नवजीवन, आनंद मिळावा ही भावना वाढीस लागतेय. लोक अवयवदानासंदर्भात विचार करू लागलेत, करताहेत. सकारात्मक निर्णयदेखील घेताहेत हेही नसे थोडके!

हळूहळू अवयवदानासंबंधी गैरसमज कमी होत असले तरी आजही आपण पाहिजे तेवढे लोकांपर्यंत पोहोचू शकलेलो नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आणि म्हणूनच ही एक जागृत चळवळ व्हायला हवी. तिचे महत्त्व आणि महती लोकांपर्यंत जायला हवी. यासाठी शासन, तज्ञ मंडळी, व्याख्याने, मार्गदर्शन, चित्रफिती याद्वारे अधिकाधिक जनजागृती आजही होणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक संस्था, ट्रस्ट, समाजसेवक यांनी ही अवयवदान चळवळ अधिक लोकाभिमुख करणे गरजेचे आहे. हे एक मानवतेचे महान कार्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या