लेख – ठसा – प्र. ल. मयेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

1980 च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारा प्रतिभासंपन्न नाटककार कै. प्र. ल. मयेकर. ‘अग्निपंख’, ‘दीपस्तंभ’, ‘रातराणी’, ‘गंध निशिगंधाचा’, ‘पांडगो इलो रे बा इलो’, ‘अथ मनुस जगन हं’सारख्या अनेक संहिता मराठी रंगभूमीच्या श्रीमंतीत भर घालतात. मराठी रंगभूमीला एकापेक्षा एक दर्जेदार संहिता देणारे नाटककार प्र. ल. मयेकर यांचा आज पंचाहत्तरावी जयंती. जगाच्या रंगभूमीचा त्यांनी जरी निरोप घेतला असला तरी त्यांच्या अजरामर संहितांमधून ते आजही आपल्याला सोबत आहेत.

कोकणच्या लाल मातीने मराठी रंगभूमीला नामवंत कलावंत-लेखक दिलेत. प्रभाकर लक्ष्मण मयेकरही याच लाल मातीतले. त्यांचा जन्म 4 एप्रिल 1946 रोजी राजापूरच्या आडिवरेतील कोंभेवाडीत झाला. वडील बेस्टमध्ये चालक पदावर नोकरीला असल्यानेच प्र.लं.चा आडिवरेतून थेट मुंबईत प्रवास झाला. त्याच बेस्टमध्ये नोकरीला लागल्यावर तिथून थेट प्रवास मराठी रंगभूमीपर्यंत. व्यावसायिक रंगभूमीवर प्रचंड यश मिळविल्यानंतरही प्र. ल. मयेकरांची साधी राहणी अनेकांना भावणारी होती. ही साधी राहणी रत्नागिरीकरांनी अनुभवली.

सेवानिवृत्तीनंतर आठ वर्षे त्यांचे रत्नागिरी शहरातील माळनाका परिसरात वास्तव्य होते. त्या काळात रत्नागिरीतील नाटय़क्षेत्रासाठी प्र. लं.च्या रूपाने एक मार्गदर्शक लाभला होता. 1983 साली बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाने प्र. ल. मयेकरांचे ‘मा अस् साबरिन’ हे नाटक सादर केले आणि मग प्र. ल. मयेकर आणि बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाने राज्य नाटय़ स्पर्धा गाजवायला सुरुवात केली. राज्य नाटय़ स्पर्धा किती महत्त्वाची आहे हे प्र. लं.च्या संहितांनी महाराष्ट्राला पटवून दिले. राज्य नाटय़ स्पर्धेसाठी लिहिलेले नाटक पुढे व्यावसायिक रंगभूमीवर येऊन नाटय़गृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत होते. ही ताकद त्यांच्या संहितेत होती.

फक्त एकटा लेखकच व्यावसायिक रंगभूमीवर पोहचला, नाही तर त्या नाटकातून काम करणारे अनेक कलावंत व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेते-अभिनेत्री, दिग्दर्शक-तंत्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. मयेकरांच्या संहितामधील पात्रामध्ये प्रचंड ताकद होती. ती पात्रं त्या कलाकाराला आयुष्यभर रंगभूमीवर उभं करत होती. अभिनेते, तंत्रज्ञ, दिग्दर्शक घडवणारे प्र. ल. हे रंगभूमीवरील एक विद्यापीठच होते. मयेकरांची भाषाशैली हे त्यांचे एक वैशिष्टय़ होते. ‘अथ मनुस जगन हं’मधील जंगल्यांची भाषा, ‘अग्निपंख’मधील रावसाहेब आणि बाईसाहेब, ‘रातराणी’तील ऍना स्मिथ हिचं अँग्लो इंडियन स्पीकिंग, ‘पांडगो’मधील तात्याचा मालवणी बाज, अंगावर राष्ट्रभक्तीचा रोमांच उमटवणारे तक्षकयाग, कुंती पार्थिवाची पौराणिक भाषा. त्यांच्या पात्रांच्या भाषाशैलीतच व्यक्तिरेखा लपलेल्या असायच्या.

मयेकरांच्या संहितामधील कंसातील वाक्य म्हणजे कलाकारांसाठी दिग्दर्शनच होतं. ‘सोनपंखी’ नाटकातून प्रमुख नायिकेचा डबलरोल रंगमंचावर पाहायला मिळाला. नाटकात डबलरोल करणे ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि डबलरोलमध्ये दोन पात्रांत परस्पर भिन्नता निर्माण करणे हे लेखकाचं कसब असते. ‘सोनपंखी’तील दोन पात्रं लिखाणातूनच इतकी वेगळी मांडली होती की,  ऐश्वर्या नारकर यांनी केलेल्या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या होत्या. मानवी प्रवृत्ती, लालसा, भावनांवर भाष्य करणारं ‘रानभूल’, रंगमंचीय चतुराई दाखवणारं ‘दीपस्तंभ’, ब्लॅक कॉमेडी असलेले ‘लाज वाटतेय बंद करा’, ‘पांडगो इलो रे बा इलो’ नाटकात मोजांच्या वासाने पळून जाणारे भूत ही भन्नाट कल्पना प्रचंड मनोरंजन करून जाते. मयेकरांच्या संहितांनी फक्त भाषेच्या सीमा नाही तर प्रांताच्याही सीमा ओलांडल्या.

मराठी आणि गुजराती रंगभूमीवर गाजलेले ‘डॅडी आय लव्ह यू’सोबत ‘रेशमगाठ’, ‘जुगलबंदी’, ‘अंतरपट’, ‘प्रेम घिरय्या’, ‘राजाराणी’ ही नाटकं गुजराती रंगभूमीवर आणि ‘कहाँ गुम हो गयी कमली? सुखा सैलाब’, ‘तिनका तिनका प्यार’, ‘इन्साफ अभी जिंदा है’, ‘अंदमान’सारखी नाटकं हिंदी राज्य नाटय़ स्पर्धेत गाजली. ‘आय कन्फेस’, ‘होस्ट’, ‘अतिथी’, ‘अब्द-शब्द’सारख्या अर्ध्या तासात चिरेबंद होणाऱया दर्जेदार एकांकिका, ‘पुत्रवती’, ‘रंग प्रेमाचा’, ‘विधिलिखित’, ‘रेशीमगाठ’, ‘गिल्टी’, ‘जोडीदार’सारखे आशयघन चित्रपटांतून ‘काचघर’सारख्या कथासंग्रहातून प्र. ल. आपल्याला भेटतात.

प्र. ल. लघुपट

रत्नागिरीतील नाटय़ संस्था समर्थ रंगभूमी आणि कै. प्र. ल. मयेकर यांचे ऋणानुबंध होते. मयेकरांनी समर्थ रंगभूमीसाठी कुंती पार्थिवा हे नाटक राज्य नाटय़ स्पर्धेसाठी लिहिले. समर्थ रंगभूमीने कै. प्र. ल. मयेकर यांच्या नाटय़विषयक कारकीर्दीवर प्र. ल. हा लघुपट तयार केला आहे. हा लघुपट प्र. ल. मयेकर यांच्या 75 व्या जन्मदिनी 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनी’वर प्रसारित होणार आहे.