अवलिया : जलरंगयात्री विकास पाटणेकर

>>डॉ. स्नेहा देऊसकर<<

कलाभिरूची जोपासणाऱ्या विकास पाटणेकर याने जलरंग विश्वात आपली वेगळी छाप उमटवली आहे. पाहूया त्याच्या चित्रांविषयी

वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी 15 सप्टेंबर 1985 रोजी बेळगावचा विकास विनायक पाटणेकर हा मुंबईत आला आणि जन्मभराचा मुंबईकर बनून राहिला. हे स्वप्न होतं कलोपासनेचं. बेळगावात प्रसिद्ध चित्रकार के. बी. कुलकर्णी यांच्या तालमीत चित्रकलेचा श्रीगणेशा करणाऱ्या विकासचे कलागुण कुलकर्णी मास्तरांनी नेमके ओळखले. जलरंगांची उत्तम हाताळणी करणाऱ्या आपल्या छोटय़ा शिष्याचं भवितव्य घडायचं असेल, तर त्याला मुंबईच्या खुल्या आकाशात भरारी मारणं भाग आहे, हे जाणून मास्तरांनी त्याची रवानगी मुंबईला केली. जे. जे. स्कूल ऑफ आर्टला प्रवेश मिळाला नाही. पण त्याच्या मास्तरांनी आपला शिष्य जॉन फर्नांडीस याच्याकडे विकासच्या उदरनिर्वाहाची सोय करून देतानाच, ‘पोटापाण्याची सोय बघताना तू चित्रकार होण्यासाठी मुंबईत गेलायस, हे कधीही विसरू नकोस’ ही जाणीव विकासच्या मनात जागती ठेवली. मावशीच्या घरी राहून उदरनिर्वाहासाठी मग दहा रुपये प्रती कार्ड या भावाने व्हिजिटिंग कार्ड डिझाइन करून देण्यापासून सुरू झालेल्या प्रवासाला जाहिरात कंपन्यांमध्ये इलुस्ट्रेटर म्हणून स्थैर्य मिळत गेलं. विकासला आता उत्तम जाहिराती करण्यातला आनंद मिळत होता खरा, पण त्याच्यातल्या चित्रकाराची खरी घुसमट व्हायला लागली. अखेरीस 2000 साली जाहिरातींच्या जगातून विकासने संन्यास घेतला. इथून पुढे पूर्णवेळ चित्रकार म्हणून विकासचा नवा प्रवास सुरू झाला.

vikas-patenkar-1

आपली कलाभिरूची जोपासणाऱ्या विकासची चित्रप्रदर्शनं हिंदुस्थानातील विविध खासगी कलादालनातच नव्हे, तर हिंदुस्थानबाहेर कॅलिफोर्निया, युनायटेड किंगडम येथील कलादालनातही यशस्वी झाली आहेत. इतकंच नव्हे तर विकासची पेट्रन लिस्ट भली मोठी आहे. जगभरातल्या दर्दी रसिकांच्या घरांच्या भिंतींवर विकासची पेंटिंग्स दिमाखात विराजमान झाली आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर, ‘गांधी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड ऍटनबरो यांच्या बंगल्यातही विकासची दोन चित्रं झळकताहेत.

विकास आपल्या कलेच्या संदर्भात कोणतीही घराणेशाही मानत नाही. त्याची कला बंधनमुक्त आहे. आपण केलेलं चित्र आधी स्वतःला आवडलं पाहिजे, तरच ते रसिकांपुढे ठेवावं. चित्र पाहाता क्षणीच रसिकाला भावलं तरच आपण यशस्वी झालो, असं विकास मानतो. जलरंगांच्या क्षेत्रात तीन दशकाहून अधिक काळ काम करूनही, आजही प्रत्येक चित्र नवं आव्हान देतं, असं विकासने म्हणणं हे त्याच्या विनयशीलतेचं लक्षण आहे आणि तेच विकासच्या चित्रातील नावीन्यपूर्णतेचं गमक आहे. सध्या त्याचे उरुग्वेला चित्रप्रदर्शन आहे. त्यानंतर अर्जेंटिना, ब्राझिल इथेही या वर्षी विकासची चित्रप्रदर्शनं भरवली जाणार आहेत. फेसबुकसारख्या प्रसारमाध्यमांवर विकासचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. नव्या वाटा चोखाळत कलोपासना करणाऱ्या विकास या अस्सल हिंदुस्थानी कलावंताचा जलरंग विश्वातला पुढील प्रवास अधिक समृद्ध होत जाईल, याविषयी विश्वास वाटतो.

आव्हानात्मक माध्यमात ओळख बनवली

जलरंग हे चित्रकलेतलं अत्यंत कठीण आणि म्हणूनच सर्वांत जास्त आव्हानात्मक असं माध्यम आहे. असं म्हणतात की जलरंग हे पूर्णपणे अपघातप्रवण क्षेत्र आहे. आधी कितीही नियोजन केलं, तरी प्रत्यक्षात कागदावर उतरताना हे रंग काय ‘पाणी’ दाखवतील याचा नेम नसतो. जलरंगाच्या या अनिश्चिततेचं आव्हान विकासला साद घालत होतं. विकासने हे आव्हान मोठय़ा हिंमतीने स्वीकारलं आणि स्वतःच्या चित्रांमधून जलरंगांची वाट शोधत जलरंग चित्रकार म्हणून स्वतःची खास ओळख प्रस्थापित केली. विकासची जलरंगातली निसर्गचित्रं आपल्या देशासोबतच परदेशी रसिकांनाही भुरळ घालू लागली.

– डॉ. स्नेहा देऊसकर

आपली प्रतिक्रिया द्या