
>> दिलीप जोशी
आयुष्यभर केवळ आपल्या चित्रकल्पना आणि त्यातील वैशिष्टय़पूर्ण रंग यातच रंगलेला आणि वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षी जीवन संपवून अमर झालेला चित्रकार व्हिन्सेन्ट व्हॅन गॉग. प्रत्ययकारी चित्र मागे ठेवून गेलेल्या या चित्रकाराच्या जीवनाचे रंग त्याला का गवसले नाहीत यावर बरीच चर्चा झाली. वास्तविक त्याचे जीवन हा त्याचा व्यक्तिगत विषय होता आणि त्याची चित्रशैली हा पुढच्या अनेक पिढय़ांमधील चित्रकारांना स्फूर्ती देणारा अमूल्य ठेवा होता. व्हॅन गॉग या नावाने प्रसिद्ध असलेल्या या आगळय़ावेगळय़ा चित्रकाराकडे त्याच्या चित्रशक्तीच्या अनुषंगानेच पाहायला हवे.
30 मार्च 1853 रोजी व्हॅन गॉगचा जन्म नेदरलॅण्डस्मधील झुन्डेर्ट येथे झाला. म्हणजे उद्या त्याची एकशे एकोणसत्तरावी जयंती. या मनस्वी चित्रकाराने 29 जुलै 1890 या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्याचं वय अवघं सदतीस वर्षांचं होतं, परंतु या जगात जसे कर्तृत्ववान शतायुषी आहेत तसेच अल्पायुषी ‘अमर’सुद्धा आहेत. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉग त्यापैकीच एक.
गॉग कुटुंब चांगलं सधन, सुखवस्तू होतं. आपल्या मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्याइतकी वैचारिक उदारता त्या कुटुंबात होती. व्हॅन बालपणापासून शांतता आणि एकांतप्रिय मुलगा होता. तो स्वतःशीच कसलासा विचार करीत असे. ते व्यक्त करण्यासाठी त्याने शब्दांचं नव्हे तर चित्रांचं माध्यम निवडलं. आसपासच्या निसर्गापासून माणसांपर्यंतचं निरीक्षण करताना त्याला जीवनाचे विविध रंग दिसले. सर्वसामान्यांना दिसणाऱ्या रंगसंगतीपेक्षा व्हॅनची नजर शोधत आणि अनुभूती घेत होती ते रंग वेगळेच होते. त्यातूनच त्याने जलरंग आणि तैलरंगांची स्वतःची शैली निर्माण करून अतिशय प्रभावी चित्रनिर्मिती केली.
तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना व्हिन्सेन्ट लंडनला गेला. आयुष्याचा शोध घेता घेता त्याला अखेरीस त्याचं ‘स्वत्व’ गवसलं ते चित्रांमध्ये. नजरेपुढे तरळणारी, मनात उमटलेली चित्रं कॅन्व्हासवर आणण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू झाले आणि आयुष्याच्या शेवटच्या एकाच दशकात त्याने सुमारे 2100 चित्रं चितारली. त्यातली 860 तैलरंगातली (ऑईल पेंटिंग) होती. लॅण्डस्केप (निसर्गचित्र), स्थिर चित्र (स्टील लाईफ) पोर्टेट असे विविध चित्राविष्कार व्हिन्सेन्ट व्हॅन गॉग यांच्या चित्रशैलीतून कागदावर उमटायला लागले. व्हॅनचा मोठा भाऊ थिओडीरस ऊर्फ थिओ याला आपल्या धाकटय़ा भावाच्या चित्रसामर्थ्याची चांगलीच जाण होती. व्हॅन लंडन येथे असताना त्याला पत्र पाठवून थिओ सातत्याने प्रोत्साहन देत असे. पुढे व्हॅन घरी नेदरलॅण्डस् येथे परतल्यावर त्याला चित्रकलेसाठी रंग आणि इतर साहित्य आणून देत असे. त्यातूनच व्हिन्सेन्ट व्हॅन गॉग यांची ‘पोर्टले इटर्स’, ‘सनफ्लावर’, ‘द स्टारी नाइट’, ‘द सिएस्टा’ अशी विलक्षण रंगसंगती आणि बावना घेऊन आलेली चित्रं निर्माण झाली. गॉग यांना त्यांच्या अल्पायुष्यात प्रसिद्धी लाभली नाही आणि या सिद्ध चित्रकर्त्याने स्वतःही प्रसिद्धीसाठी काही केलं नाही. त्यांची चित्र आत्मानंदासाठी कदाचित आत्मशोधासाठी होती. तो चित्रठेवा मागे ठेवून त्यांनी जगाचा अकाली निरोप घेतला आणि नंतर अनेक वर्षांनी त्यांच्या चित्रांचं महत्त्व कला क्षेत्राला तसंच जगालाही कळलं. ‘ट्रनिक पेन्टर’ असं म्हटल्या गेलेल्या या चित्रकाराच्या चित्रांना लौकिक जगात अफाट किंमत आली. नेदरलॅण्डस्ची राजधानी असलेल्या ऍमस्टरडॅम नगरात अखेर त्यांच्या चित्रांचं एक सुंदर म्युझियम मात्र उभारलं गेलं.
या प्रत्ययकारी चित्रकाराविषयी बोलताना आपल्याकडचे प्रतिभावंत चित्रकार दत्तात्रय पाडेकर म्हणतात, ‘मायकेल ऍन्जेलो, लिओनार्दो द विन्ची किंवा व्हॅन गॉग यांच्या चित्रशैलीपेक्षा त्याबाबतच्या मिथकांचीच चर्चा सगळीकडे जास्त होत राहिली. खरं तर चित्रकाराचं व्यक्तिगत जीवन हे त्याचं असतं. त्याच्या चित्रांची योग्य ती समीक्षा होऊन चित्रकलेतील त्याचं महत्त्व विषद करायला हवं, परंतु तसं अभावानेच होताना दिसतं. व्हिन्सेन्ट व्हॅन गॉग यांच्याविषयी एका वाक्यात सांगायचं तर ते चित्र अक्षरशः जगत होते. त्यांची चित्रशैली त्यातली रंगरंगती लय आणि डौल घेऊनच येतो. त्यांच्या केवळ ‘सनफ्लावर’ किंवा सतत सूर्यवेध घेणाऱ्या ‘सूर्यफूल’ या चित्राकडे पाहिलं तरी त्यांच्या चित्रकलेचं सामर्थ्य दिसतं. माझ्यासारख्या चित्रकाराला त्या सूर्यफुलासाठी वापरलेली ‘क्रोमयलो’ ही नारंगी छटेकडे जाणारी रंगशैली खूपच प्रभावी वाटते. चित्रसमीक्षा अशी चित्रगुणांवर आधारित असावी. बाकीच्या गोष्टी गौण आहेत. पाडेकरांचं म्हणणं अनुभवसिद्ध आहे. व्हेन गॉगचं सामर्थ्य त्यांच्या चित्रशैलीतूनच अमर, अक्षय झालं आहे एवढंच लक्षात ठेवावं.



























































