
विनायक श्रीधर अभ्यंकर
25 वर्षांत पाकिस्तानने हिंदुस्थानवर (1947 ते 1971) तीन युद्धे लादली आणि प्रत्येक युद्धात मार खाल्ला. 1971 चे युद्ध फार आगळेवेगळे होते. त्याचा समग्र इतिहास आपण पाहणारच आहोत. या प्रत्येक युद्धात हिंदुस्थानने धडे घेऊन सैन्याचा विस्तार व विकास साधला. आज हिंदुस्थानी सैन्याचा जगात चौथा नंबर असून प्रसंगी कोणालाही आपले सैन्य ‘चारीमुंडय़ा चीत’ करण्यास तयार आहे. पाकिस्तान सतत शस्त्रसंधी मोडतो. आता तर अतिरेक्यांच्या माध्यमातून ‘शीतयुद्ध’ खेळत आहे. कारण पारंपरिक युद्धात हिंदुस्थान आपल्यावर मात करतो हे त्याला चांगले लक्षात आले आहे.
विसाव्या शतकात दोन महायुद्धे जगाला झेलावी लागली. ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता ते साम्राज्य, राणीचे सरकार आर्थिकदृष्टय़ा खिळखिळे होऊन त्या साम्राज्याला अंकित असणाऱ्या ‘गुलाम’ देशांना हळूहळू स्वातंत्र्य देणे क्रमप्राप्त झाले. अमेरिका, रशिया साम्राज्य उदयास आले. जगाच्या नकाशात फेरफार होऊन जगाचा नकाशा कुठे आक्रसला तर कुठे विस्तारला. या फेरफाराचा चटका विसाव्या शतकाच्या मध्यास हिंदुस्थानला खावा लागला. 565 संस्थानांत विभागलेल्या हिंदुस्थानची मधोमध चिरफाड होऊन पाकिस्तान हे नवीन राष्ट्र दक्षिण आशियात स्थापित झाले. पूर्व पाकिस्तान पूर्वेस तर हिमालयीन रांगा, खैबर खिंडीजवळ पश्चिम पाकिस्तान ही दोन शकले उदयास आली. या दोन विभागांत 1600 मैलांचे अंतर होते. द्विराष्ट्रवाद पेटवून कायदे आझम बॅरिस्टर महंमद अली जीना यांच्या नेतृत्वात पाकिस्तान जन्माला आले. दोन टोकांवर असणाऱया या विभागांचे मनोमीलन कधी झालेच नाही.
1947 मध्ये देश स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर असताना ‘हंस के लिया पाकिस्तान, छीन के लेंगे हिंदुस्थान’ अशा आरोळय़ा देत 22 ऑक्टोबर 1947 या तारखेला रझाकार, टोळीवाले असे भासवून पाकिस्तानी प्रशिक्षित सैन्याने ‘कश्मीर’वर हल्ला केला. हरिसिंह डोग्रा या राजाने हिंदुस्थानात विलीन होण्यास उशीर केला, त्याची संधी साधून हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याने लुटालूट, अत्याचार केले. हे करत असताना ते ‘आम्ही कश्मीरचे मुक्तिदाते’ म्हणत अत्याचार करत होते. या युद्धात आपण एकतृतीयांश कश्मीर गमावला. त्याला ते आझाद कश्मीर म्हणतात. आपण म्हणतो ‘पाकव्याप्त कश्मीर.’ हे युद्ध चौदा महिने चालले. या युद्धाचे कोड नाव होते ‘ऑपरेशन गुलमर्ग.’ त्यानंतर 20 ऑक्टोबर 1962 रोजी चीनने हिंदुस्थानवर विश्वासघातकी आक्रमण केले. या युद्धात आपली बरीच हानी झाली. हे युद्ध 22 नोव्हेंबर 1962 ला चीनने थांबवले. या युद्धापासून प्रेरणा घेत पाकिस्तानी शासक फिल्ड मार्शल अयुब खान यांनी हिंदुस्थानवर हल्ला केला. मोहिमेला नाव होते ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ व ‘ऑपरेशन ग्रॅण्ड स्लॅम.’
पाकिस्तानी सैन्याचा होरा होता की, हिंदुस्थानची चीनशी लढताना दमछाक झाल्याने हिंदुस्थानी सैन्यांचे नैतिक खच्चीकरण झाले आहे. तेव्हा ही संधी साधून कश्मीर हस्तगत करावा. दुसरे कारण, मध्यंतरीच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला अत्याधुनिक प्रचंड सैनिकी साहित्य पुरवून त्याच्या ‘युद्धज्वरा’ला खतपाणी घातले होते. तिसरे कारण, दिलेले कुठलेही आश्वासन अयुब खान पूर्ण करू न शकल्याने पाकिस्तानी जनता चिडली होती. क्रोधित झाली होती. ‘इस्लाम खतरे में है’ म्हणत अयुबने पाकिस्तानी जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. चौथे कारण, लालबहादूर शास्त्री हा मध्यमवर्गीय सामान्य माणूस आपल्याला टक्कर देणार नाही हा पाकिस्तानी लष्कराचा भ्रम मात्र या युद्धात पाकिस्तानी सैन्याला ‘मूँह की खानी पडी’ व युद्ध थांबवून हिंदुस्थानशी ‘शस्त्रसंधी’ करावी लागली. कारण हाजीपीर खिंडीमधला हिंदुस्थानचा विजय, हिंदुस्थानी सैन्याने लाहोर सेक्टरमध्ये वाघा बॉर्डर, खार्ला बर्फी व खेमकरण-कसूर ते इच्छोगील कालव्यापर्यंत धडक मारून पाकिस्तानी सैन्यांचे तोंड काळे केले. अयुब खान या हुकूमशहास दाती तृण धरून माघार घ्यावी लागली. हे युद्ध एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत चालले.
युद्धानंतर तत्कालीन नौसेनाप्रमुख ऍडमिरल भास्करराव सोमण पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना भेटून त्यांनी नाखुशी व्यक्त केली. सोमण यांनी राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी मागितली तेव्हा शास्त्रीजींनी ‘ऍडमिरल शांत हो भी जाओ’ असे म्हणत परवानगी नाकारली. सरकारने 1962 च्या युद्धात वायुसेनेचा वापर टाळला, तर 1965 च्या युद्धात नौसेनेला वेसण घातली. सरकारी स्तरावर असा निर्णय का झाला? हे आजही एक कोडे आहे. अन्यथा दोन्ही युद्धांचा शेवट हिंदुस्थानच्या बाजूने लागला असता.
1965 चा पराभव पाकिस्तानी सैन्य व समाजाला पचवता आला नाही. अयुब खान यांना बंडाळीची झळ लागण्यापूर्वीच त्यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे खाली ठेवून तत्कालीन सेनाधिकारी जनरल आगा मुहम्मद याहय़ा खान यांना सत्ता सुपूर्द करून देश सोडला. 1971 चे युद्ध हे 1947-48, 1965 व 1999 च्या युद्धापेक्षा फार वेगळे आणि हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानी नौसेनेच्या टोपातला सोनेरी तुरा ठरला. या युद्धात कराची बंदरावर प्रचंड हल्ला चढवत हिंदुस्थानी मिसाईल बोटस् हिंदुस्थानी नौसेना पोतनाशक निरघट, नियत, विनाश, वीर, विद्युत यांनी अभूतपूर्व हल्ला करून कराची बंदर पेटवून दिले. अगदी लंकादहनाप्रमाणे. आगीचे तांडव इतके प्रचंड होते की, अमेरिकेच्या ‘गुप्त उपग्रहां’नी त्याचे फोटो पाठवल्यावर व ते पाहिल्यावर अमेरिकन शासनसुद्धा दिङ्मूढ झाले, स्तब्ध झाले आणि या मिसाईल बोटींच्या स्क्वॉड्रनला नाव पडले ‘किलर 25’.
या युद्धात अमेरिका, चीन पाकिस्तानला सर्वतोपरी मदत करण्यासाठी उतरले होते. हे युद्ध पश्चिम व पूर्व किनाऱयावर लढले गेले. त्यामुळे या युद्धातला नौसेनेचा पराक्रम हिंदुस्थानी युद्धांच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला गेला. या युद्धात मी लढलो, तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वोच्च मानबिंदू मी मानतो. वाचकहो, स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 25 वर्षांत, रौप्य महोत्सवात चार युद्धांना सामोरे जावे लागले. यातील 1971 च्या युद्धात नौसेना सिंहाचा वाटा घेऊन लढले. त्यापूर्वी व त्यानंतर 1999 च्या कारगील युद्धात हिंदुस्थानी नौसेनेचा सहभाग फक्त गस्त घालणे व सागरी सीमांचे संरक्षण इतकाच शासनाने मर्यादित केला होता.
हिंदुस्थानी राजकीय नेते व लष्करी उच्चाधिकारी यांचा संयम जर तुटला तर ते पाकिस्तानला फार महागात पडेल, याचा अनुभव पाकिस्तानने 1965 च्या युद्धात घेतला आहे. वामनमूर्ती कै. लालबहादूर शास्त्र्ााr यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा देऊन ‘इट का जवाब पत्थर से देंगे’ असा इशारा दिला. हिंदुस्थानचा दृढसंकल्प आपल्या सैन्यदलाने लाहोरच्या वेशीपर्यंत पोहोचवला. 1999 च्या कारगील युद्धात ‘ये दिल मांगे मोर’ म्हणत प्रतिकूल परिस्थिती असताना शत्रूला धूळ चारली आहे.
(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)



























































