मनतरंग – पॅनिक अटॅक

>> दिव्या सौदागर

प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता आणि समस्या वेचून काढून त्यावर चिंता करत बसणं ही सवय घातकच. ही ताण आणि अतिचिंता पॅनिक अटॅक येण्यास कारणभूत ठरते. यातून समुपदेशनाच्या मदतीने बाहेर पडणे हाच सोपा मार्ग आहे.

राजीव (नाव बदलले आहे) नुकताच कॅनडाला स्थिरस्थावर होत होता. साधारण तीन महिन्यांपूर्वी तो कॅनडात आपल्या पत्नीबरोबर आलेला होता. त्याचं लग्न नुकतंच झालं होतं. त्याच्या पत्नीची आधीपासूनच तिथे नोकरी होती आणि राजीवलाही भारताबाहेर नोकरी करायची होती. त्यामुळे त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करून लग्नासाठी आलेल्या स्थळाला होकार दिला आणि लग्न करून कॅनडाला गेला. तिथल्या नोकरीसाठी राजीवचे प्रयत्न सुरूच होते आणि महिन्याभरात तिथे गेल्यावर त्याला त्याच्या आवडीची नोकरीही मिळाली. त्यामुळे तो खूश होता आणि नवीन आयुष्याची सुरुवात करायला सज्ज झाला…तीही पत्नीच्या साथीने!

पण त्या दिवशीच्या प्रसंगानंतर राजीवच्या मनावर पुन्हा मळभ साचायला सुरुवात झाली आणि तिरिमिरीतच त्याने पुन्हा समुपदेशन सुरू ठेवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. “मॅम, आज मला अचानक पॅनिक अटॅक आला. मी कामाच्या ठिकाणी होतो. प्रेझेंटेशन स्टार्ट झालेलं. मी पूर्ण तयार होतो. माझी सुरुवातही छान झाली, पण अचानक सगळं फिरलं आणि आय लॉस्ट माय कंट्रोल. माझी धडधड वाढली आणि मला घाम फुटला. मी वाक्यं विसरलो. माझे कान बंद झाले. माझ्या टीमला हे कळलं. एकाने मला पाणीही दिलं प्यायला. काही वेळ तसाच गेला. मी अपोलॉजी एक्स्प्रेस करून पुढच्या प्रेझेंटेशनला सुरुवात केलीही, पण मन लागलं नाही. खूप काहीतरी मी गमावलं आहे ही भावना मला डाचतेय.’’ असं बोलून राजीव शांत बसला. एक प्रकारचं औदासिन्य त्याच्या चेहऱयावर पसरलेलं त्याने सत्रासाठी केलेल्या व्हिडीओ कॉलवरूनही जाणवत होतं.

राजीवबद्दल सांगायचं झालं तर तो अतिविचाराने त्रस्त होताच. शिवाय प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता आणि समस्या वेचून काढून त्यावर चिंता करत बसणं ही त्याची सवय त्यालाच घातक ठरत होती. कारण या सगळ्या गोष्टींमुळे राजीव चिडचिडा झाला होता, त्याला कुठल्याही गोष्टीचा प्रचंड ताण येई आणि त्यामुळे त्याला समोरचा मार्ग दिसेनासा होई. त्यामुळे राजीवचं मानसिक खच्चीकरण होत होतं.  या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून त्याला पॅनिक अटॅक येऊ लागले. जेव्हा पहिल्यांदा त्याला हा अटॅक आला तेव्हा त्याने लगेचच मानसोपचार घ्यायला सुरुवात केली आणि नंतर समुपदेशन सुरू केलं.

राजीव तसा का झाला याचीही काही पार्श्वभूमी होती. घराचं वातावरण हे शिस्तीचं होतं आणि त्याचे वडील हे अतिशय त्याबाबतीत कडक होते. त्यांना घरातली वस्तू एक इंचही हललेली खपत नसे. त्यामुळे ते कामावरून घरी यायच्या आधी त्याची आई आणि तो मिळून घर टापटीप ठेवत असत. असं असूनही त्याच्या वडिलांचा पारा घरात पाय ठेवल्या ठेवल्या कुठल्याही क्षुल्लक कारणावरून चढत असे आणि ते आईच्या आणि राजीवच्या अंगावर ओरडायला सुरुवात करत. स्वतच्या बायकोचा तर ते वाटेल तसा पाणउताराही करत आणि त्यालाही कमी लेखत. आईचं असं दिवसभर उदास बसून राहणं, वडिलांनी घरातला कारभार हाती घेणं आणि त्यात स्वतची मनमानी करणं, स्वतचे दोष आणि चुका मान्य न करता त्या बायको व मुलावर ढकलणं या सर्वांमुळे राजीव आतून तुटला होता. तरीही राजीव व्यवस्थित शिकला आणि नोकरीला लागला. तो नोकरीत स्थिरस्थावर होत असतानाच त्याला एक दिवस पॅनिक अटॅक आला आणि त्याला तणाव आला, पण उपचारांतून तो बराच सावरला.

त्याची पत्नी सुप्रिया (नाव बदलले आहे) त्याच्या बाजूला बसली होती. “आज हा आला तो तोंड पाडूनच. मला भरपूर काळजी वाटली. म्हणून मी त्याला तुमची अपॉइंटमेंट घ्यायला सांगितली.’’ सुप्रियाने काळजीने सगळं सांगितलं.

त्याच्या समस्येचं मूळ त्याच्या लहानपणात दडलेलं होतं हे जेव्हा त्याला समजून चुकलं तेव्हा त्याने स्वतला बदलायला सुरुवात केली होती. त्याच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तो अजूनही कुठेतरी स्वतला सिद्ध करण्यासाठी धडपडत होता. त्या वेळी नकळतपणे इतरांशी स्वतशी तुलनाही करत होता. बाहेरच्या देशात गेल्यावर ‘मला लगेचच स्थिरस्थावर झालंच पाहिजे,’ असा निश्चय त्याने केला होता आणि त्यासाठीच राजीव जिवाचा आटापिटा करत होता.

“बरं मला सांग, तुला कॅनडामध्ये जाऊन किती वर्षे झाली आणि ही नोकरी तुला ओळखीने मिळाली ना?’’ असा प्रश्न केल्यावर सुप्रिया मध्येच बोलली, “तीन महिने झालेत फक्त आणि मॅम, राजीवला त्याच्या कर्तबगारीमुळेच मिळाली नोकरी. त्याने माझीही ओळख कुठेही वापरली नाही आणि ऑफिसमध्ये रुजू झाल्यावर त्याला लगेचच काही जबाबदारीची कामं देण्यात आली आहेत.’’ सुप्रिया अभिमानाने म्हणाली.

“तरीही तुला नकारात्मक विचार का येत आहेत?’’ असा प्रतिप्रश्न केल्यावर राजीव एकदम शांत झाला. त्याच्या चेहऱयात बदल जाणवला. त्याच्या मनातली खळबळ शांत होत होती असं जाणवलं.

राजीव जरी बराचसा समस्येतून बाहेर आला होता तरीही काही अंशी त्याच्यातली चिंता आणि वडिलांचे दडपण कुठेतरी मध्ये मध्ये डोकावत होते. बाहेरच्या देशांत स्थिर व्हायला थोडासा वेळ लागतो हे त्याला कळत होतं, पण तो वेळ घेणं आणि शांतपणे परिस्थिती बघून त्याच्याशी जुळवून घेणं, तिथल्या संस्कृती, विचारधारेत स्वतला सामावून घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतच्या विचारांशी ठाम असणं यामध्ये त्याचा गोंधळ झाला. समुपदेशनाचा राजीवला बराच फायदा झाला आणि त्याला बरं वाटू लागले.

पॅनिक अटॅक हा अतिचिंता आणि ताण यामुळे होऊ शकतो. हृदयाचे ठोके जलद होणं, घाम येणं, शरीराची सूक्ष्म थरथर, अचानक सुचेनासं होणं अशा प्रकारच्या अवस्थेत व्यक्ती काही सेकंद किंवा काही मिनिटांकरिता जाते. त्या वेळी त्या व्यक्तीबरोबर कोणीतरी असणं आणि तिला सावरून धीर देणं गरजेचं ठरतं. या व्यक्ती कुठलंही नाटक करत नसतात किंवा कोणालाही आकर्षून घेत नसतात. त्यामुळे समाजाने विशेषत या व्यक्तींच्या घरच्यांनी या गोष्टी लक्षात घेणं जरुरी आहे. नाहीतर असा ताण आणि अतिचिंता घातक ठरू शकते.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

[email protected]