ठसा – पराग राजवाडे

>> जे. डी. पराडकर

कधी कधी एखादी चांगली सवयच माणसाला आवडत्या छंदाकडे घेऊन जाते. हा छंद जोपासता जोपासता त्याचा संग्रह कसा होतो हेच कळत नाही. रत्नागिरी जिह्यातील देवरुखच्या पराग राजवाडेने एक दोन नव्हे, तर चक्क साडेचार हजार दुर्मिळ नाणी आणि विविध देशांच्या चलनी नोटांचा अनोखा संग्रह केला असून यामध्य देशी-विदेशीसह अनोख्या स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध धातूंच्या नाण्यांचा समावेश आहे.

‘हा छंद जिवाला लावी पिसे’ हे मराठीतील अजरामर गीत आजही सर्वांच्या तोंडी आहे. खरोखरच छंद हा माणसाच्या जीवनातील एक वेगळी वाट ठरू शकते. कधी कधी तर माणसाला नकळत एखादा चांगला छंद जडतो आणि तोच पुढे सुरू राहतो. देवरुख शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आणि गेली अनेक वर्षांची परंपरा असलेल्या सेंट्रल स्टेशनरी स्टोअर्सचे मालक नंदा ऊर्फ अनंत राजवाडे यांचा सुपुत्र पराग राजवाडे यालाही असाच अनोखा छंद आहे. शालेय जीवनात 1991 साली पराग देवरुख स्कूलमधून सहलीसाठी एका ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी त्याला पडलेले नाणे सापडले. ते स्वच्छ केल्यावर ते प्राचीन असल्याचा संदर्भ त्याला लागला आणि तेव्हापासून त्याने हा छंद जोपासला. दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करताना अनेक देशांच्या विविध चलनांची जपणूकही त्याने केली आहे. हौसेला मोल नाही असे म्हणतात तेच परागच्या बाबतीत खरे ठरले. आपला छंद जोपासण्यासाठी त्याला आर्थिक भारही सहन करावा लागतो; पण छंदापुढे हे सर्व फिके असे म्हणत त्याने हा छंद आज 29व्या वर्षीही जोपासला आहे. गेल्या 29 वर्षांत त्याच्याकडे साडेचार हजार दुर्मिळ नाणी आणि जगातील बहुतांश देशांची चलने संग्रहित करण्यात त्याला यश आले आहे. शिवकालापासून ते ब्रिटिश काळ, स्वातंत्र्यानंतरचे हिंदुस्थानचे पहिले नाणे, हिंदुस्थानातील पहिली नोट, याशिवाय ज्या वर्षी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले त्या 1947 साली सरकारने काढलेले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह संपूर्ण हिंदुस्थानच्या नकाशाचे छायाचित्र असलेले दुर्मिळ नाणेही परागच्या संग्रहात आहे. चांदी, स्टील, पितळ, तांबे अशा विविध धातूंमधील या नाण्यांची जपणूकही परागने तेवढय़ाच कौशल्याने केली आहे. आपल्या संग्रहात असणारे ईस्ट इंडिया कंपनीने काढलेले 1833 सालातले नाणे आपल्यासाठी खास असल्याचे तो सांगतो. 2001 मध्ये पराग दुबईत गेला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कात आलेल्या एका पाकिस्तानी इसमाकडे त्याने त्यांच्या देशाचे चलन आणि नाणे मागितले. परागचा छंद ऐकून त्यानेही तातडीने परागला आपले चलन आणि एक नाणे भेट म्हणून दिले. या अनुभवाचा उल्लेख तो आवर्जून करतो. याशिवाय आपल्या छंदाच्या संग्रहात भर पडावी म्हणून मित्रांनीही आपणाला खूप मदत केली असून बरीचशी नाणी मित्रांकडून मिळवल्याचे सांगत काही नाणी आणि चलनांसाठी आपण तेवढेच पैसे मोजल्याचेही तो सांगतो. शेवटपर्यंत हा छंद जोपासण्याची त्याची इच्छा असून अजूनही कुणाकडे दुर्मिळ नाणी अथवा चलनी नोटा असल्यास त्या आपणाकडे संग्रहासाठी द्याव्यात असे आवाहन त्याने केले आहे. परागच्या या छंदाने त्याला ही दुर्मिळ आवड जडली असून त्याची साठवणूक आणि जपणूक हा सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय बनला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या