परमवीर रामा राघोबा राणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक अभ्यंकर

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच पाकिस्तानने कश्मीरमध्ये अचानक हल्ला केला. आपल्या सैन्याने तुटपुंजी साधने असूनही बहादुरीच्या जोरावर तो परतवून लावला. हा संग्राम २२ ऑक्टोबर १९४७ ते ३१ डिसेंबर १९४८ एवढा काळ चालला. त्यातील योद्धय़ा सैनिकांना सर्वाधिक ५ परमवीरचक्रे, ५३ महावीरचक्रे, ३१५ वीरचक्रे केंद्र सरकारने बहाल केली. त्यापैकी ८१ शौर्यचक्रे ही मरणोपरांत होती. जी पाच परमवीरचक्रे जाहीर झाली त्यात चार मरणोपरांत होती. एकुलते एक परमवीरचक्र २६ जानेवारी १९५० रोजी प्रथम राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांनी ज्या रणशार्दूल मावळय़ाच्या छातीवर लावले तो मर्द मराठा होता सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे.

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी फाळणीमुळे झालेल्या नरसंहाराने हतबल होत तत्कालीन हिंदुस्थान सरकार अहिंसेचे तुणतुणे वाजवत बसले होते. ब्रिटिश लष्करी अधिकाऱयांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानने अचानक केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्याची जबाबदारी हिंदुस्थानी सैन्याचे अधिकारी लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांच्यावर आली. तेव्हा ते उत्तर विभागाचे ध्वजाधिकारी होते. करिअप्पा, थिमय्या, कटोच इत्यादी अधिकाऱयांनी युद्धाची सूत्रे सांभाळत तुटपुंज्या साधनसामग्रीसह हा हल्ला परतवून लावला; परंतु पंडित नेहरूंनी युद्धबंदीला होकार देऊन कश्मीरचा एकतृतीयांश मुलूख गिळंकृत करण्यास हातभारच लावला. युनोने मध्यस्थी करताना दोन्ही देशांनी सैन्य पूर्वपदावर न्यावे असे ठरवले असताना पाकने गिलगीट, बाल्टिस्तान इत्यादी भागाचा लचका तोडून त्याला नाव दिले ‘आझाद कश्मीर’. आम्ही त्याला पाकव्याप्त कश्मीर संबोधतो. हे युद्ध २२ ऑक्टोबर १९४७ ला सुरू होऊन ३१ डिसेंबर १९४८ ला संपले. या संग्रामातील योद्धय़ा सैनिकांना सर्वाधिक ५ परमवीरचक्रे, ५३ महावीरचक्रे, ३१५ वीरचक्रे केंद्र सरकारने बहाल केली. त्यापैकी ८१ शौर्यचक्रे ही मरणोपरांत होती. जी पाच परमवीरचक्रे जाहीर झाली त्यात चार मरणोपरांत होती. एकुलते एक परमवीरचक्र २६ जानेवारी १९५० रोजी प्रथम राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांनी ज्या रणशार्दूल मावळय़ाच्या छातीवर लावले तो मर्द मराठा होता सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे.

सेकंड लेफ्टनंट हा तेव्हा सर्वात तरुण व कनिष्ठ अधिकारी समजला जात असे. अभिमन्यूच्या तडफेने या नरशार्दुलाने पाकी फौजेने रणांगणात पेरून ठेवलेले भूसुरुंग, तोफांच्या माऱयात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंदुस्थानी पायदळाला आगेकूच करण्यासाठी मार्ग प्रशस्त करून दिला. स्वतः रणगाडय़ावर ठाण मांडून सहकाऱयांना पुढे मार्गक्रमण करण्यास उद्युक्त केले. भूसुरुंग फुटलाच तर पर्वा नाही, पण तुम्ही लढा चालू ठेवा. अशा बाजीप्रभूंच्या ईर्षेने व तानाजीच्या त्वेषाने हा परमवीर मावळा पाकिस्तानी फौजेचा वेढा फोडून ८ एप्रिल १९४८ रोजी सकाळी १०पासून अहोरात्र राजौरीच्या नादपूर दक्षिण या रणभूमीपासून आपली मोहीम सुरू करत जीवाची पर्वा न करता ११ एप्रिल १९४८ रोजी रात्री ११ वाजता चिंगसपर्यंत पोहोचला.

क्षणाचीही उसंत न घेता त्यांच्या १९व्या इन्फंट्रीने शत्रूला रणभूमीवर गाठून राजौरीवर तिरंगा फडकावला. शत्रूने डोंगराळी अरुंद रस्त्यात पेरून ठेवलेल्या भूसुरुंगांची तमा न बाळगता तत्कालीन बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपच्या या अधिकाऱयाने मावळय़ाप्रमाणे ‘शिर हाती घेऊन’ पाकिस्तानी फौजेला उधळून लावण्यात सिंहाचा वाटा उचलला.

या मोहिमेत झांगरच्या रणभूमीवर ब्रिगेडिअर उस्मान या हिंदी लष्करी अधिकाऱयाने सुभेदार मेजर भोसले यांच्या साथीने पठाण रेजिमेंटचे ५०० शिपाई यमसदनास पाठवले. तेव्हा मेजर जनरल अकबर खान ब्रिगेडियर उस्मान यांना म्हणाला, ‘‘अरे उस्मान, मुस्लिम असून हिंदुस्थानसाठी लढतोस? पाकमध्ये ये, तुला मालामाल करू!’’ उस्मान यांनी सच्च्या हिंदुस्थानीप्रमाणे हे आमिष धुडकावले आणि पाकिस्तानशी लढताना हिंदवी मातेच्या कुशीत चिरनिद्रा घेतली. हिंदुस्थानशी बेइमानी केली नाही. ब्रिगेडियर उस्मान यांना याच मोहिमेत मरणोपरांत महावीरचक्र जाहीर झाले. रामा राणे याच मोहिमेत ब्रिगेडियर उस्मानच्या पलटनीला सुखरूप बाहेर काढत राहिले. हा इतिहास आहे.

‘महावीर’ बिग्रेडियर उस्मान आणि ‘परमवीर’ सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांच्या बहादुरीमुळे जम्मूच्या आग्नेयेस जी गंभीर परिस्थिती खुल्या सरहद्दीमुळे झाली होती त्यामुळे नौशेरा, भिंबर, झांगर, मीरपूर, राजौरी, पूंछ व कोटला या सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या ठाण्यांना पाकी फौजेने जो वेढा दिला होता, तो हिंदुस्थानी सैन्याला मोडून काढता आला आणि म्हणूनच कश्मीरचा हा भाग आज आपल्या अखत्यारीत आहे.

खरे तर रामा राणे यांना असहकार आंदोलनात उडी घ्यायची होती; परंतु पोलीस हवालदार असलेल्या त्यांच्या पिताश्रींनी त्यांना “पराक्रमच करायचा आहे ना? मग सैन्यात जा’’ म्हणून सल्ला देताच रामा राणे तत्कालीन रॉयल इंडियन आर्मीमध्ये भरती झाले. ते दिवस दुसऱया महायुद्धाचे होते. रामा राणे यांनी संधी मिळताच पराक्रमाने नायक, हवालदार ही पदे मिळवून किंग कमिशन मिळवले आणि ते सेकंड लेफ्टनंट पदावर पोहोचले. १३ डिसेंबर १९४७ ला ते बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुपचे अधिकारी झाले. त्यांची रवानगी आघाडीवर करण्यात आली व त्यांनी ८ ते ११ एप्रिल १९४८ या चार दिवसांत पराक्रमाचे तोरण बांधत यशाची गुढी उभारली. सगळय़ांना अभिमान वाटेल असे स्वातंत्र्योत्तर काळातील ५वे परमवीरचक्र जिवंतपणे मिळवले. त्यांचे हे परमवीरचक्र पुण्यातील ‘बॉम्बे सॅपर्स’च्या संग्रहालयात अभिमानाने ठेवण्यात आले आहे.

या परमवीराचा जन्म २६ जून १९१८ रोजी कारवार जिह्यातील हावेरी गावी झाला. पिताश्रींच्या नोकरीनिमित्ताने त्यांनी उत्तर कर्नाटकातील चांदेली या गावी आपले बालपण व शिक्षण पूर्ण केले. वयाच्या २२व्या वर्षी ते बॉम्बे इंजिनीअर रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून दाखल झाले. यशस्वी प्रशिक्षणानंतर त्यांची नेमणूक २८व्या फिल्ड इन्फंट्री डिव्हिजनमध्ये झाली. दुसऱया महायुद्धात त्यांनी ब्रिटिश म्हणजे रॉयल इंडियन आर्मीकडून लढताना बर्मा आघाडीवर पराक्रम केला. त्यामुळे त्यांना नायक, हवालदार अशी पदोन्नती मिळाली. पुढे काही परीक्षा यशस्वी होत त्यांनी किंग कमिशन प्राप्त केले.

अखंड परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती, अनन्यसाधारण देशभक्ती, ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही बेदरकार वृत्ती, संपूर्ण समर्पण भावना या शिवरायांच्या मावळय़ाला शोभेल अशा ईर्षेने रामा राघोबा राणे हे युद्धभूमीवर वावरत. आपल्या साथीदारांच्या पदांचा विचार न करता सर्वांशी मिळून मिसळून वागत. त्यामुळे ते एक आदर्श लोकप्रिय अधिकारी होते. अशा या मर्द मराठय़ाला परमवीराची जन्मशताब्दी २६ जूनला संपत आहे. देशाने, महाराष्ट्राने त्याची नोंद तरी घ्यायला हवी. कारवारमधील त्यांचा पुतळा येणाऱया पिढय़ांना नक्कीच स्फूर्ती देत राहील.

(लेखक निवृत्त लष्करी अधिकारी आहेत.)