
>> मनमोहन रो. रोगे
अगदी सहज सर्वत्र नजरेस पडणारा कोणता पक्षी असेल तर तो म्हणजे कावळा. लहानपणी आई मुलाला पहिला घास भरवते तो ‘काऊ’चाच असतो आणि मृत्यूनंतर ठेवलेल्या पिंडाचा घास घ्यावा असे सर्वांना मनोमनी वाटते तोही कावळाच असतो. बालपणीच्या कितीतरी गोष्टींमध्ये कावळ्याचा उल्लेख असतोच. स्त्रियांच्या मासिक निसर्गधर्मात कावळ्याचा काहीही संबंध नसताना लहान मुलांना घरातल्या स्त्रिया – मुलींना कावळा शिवलाय असे खोटेच सांगितले जायचे / जाते. खिडकीजवळ जर कावळा सतत ‘काव…काव….’ करू लागला तर पूर्वी कुणीतरी पाहुणा येणार आहे असे समजत आणि बहुतांशी ते खरे ठरल्याने पिढय़ान्पिढय़ा तशी समजूत होती / आहे. संत ज्ञानोबा माऊलीही आपल्या अभंगात ‘पैल तो गे काऊ कोकताहे, शकून गे माये सांगताहे’ असे लिहून कावळ्याचा सन्मान करतात. तीव्र भूक लागली हे ‘पोटात कावळे ओरडताहेत’ असे बोलून सांगितल्याने पटकन कळते तर प्रेयसी प्रियकराला ‘झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वेसे डरीयो……. मै मैके चली जाऊंगी, तुम देखते रहियो’ अशी भीती दाखवते. माणसाच्या जन्मापासून (अगदी बालपणापासून) मरेपर्यंत (खरे तर मेल्यानंतरही) कावळ्याशी असा संबंध असतो. इतर पक्षी ठरावीक देशात आढळत असले तरी कावळ्याचा आढळ जवळपास जगभर असतो.
एरवी रोज दिसला तरी दुर्लक्षित राहणाऱ्या कावळ्याकडे सर्वांचे लक्ष जाते ते गणेशोत्सवानंतर लगेच सुरू होणाऱ्या पितृपंधरवडय़ात. पितृपंधरवडय़ात आपले मृत पूर्वज खाली येतात ते कावळ्याच्या रूपात असा समज आहे. त्यांना जेवूखाऊ घालून तृप्त करावे अशी रीत आहे. म्हणून त्या पंधरवडय़ात त्यांना जेवण ठेवून ते लवकर यावे म्हणून ‘काव….काव….काव…….’ अशी माणसांना साद घालावी लागते. दुसरा प्रसंग असतो तो मृत व्यक्तीच्या दशक्रियेचा. तेव्हा तर मृत व्यक्तीच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा आप्तेष्टांचा आटापिटा सुरू असतो. मृताच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, तर त्याला गती मिळत नाही, आत्मा भटकत राहतो अशी धारणा आहे म्हणून दशक्रियेच्या विधीत पिंड ठेवून त्या ठरावीक पिंडाला कावळा शिवावा म्हणजे मृत व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यात असे मानले जाते. यावेळी कितीतरी कावळे पिंडाच्या जवळ येऊनही कधी कधी पिंडाला शिवत नाहीत. तेव्हा त्यांची म्हणजे मृताच्या आत्म्याची विनवणी करावी लागते. इतके महत्त्व कावळ्याला कधीच मिळत नाही. जर कधी पिंडाला कावळा शिवला नाहीच, तर दर्भाचा कावळा बनवून तो विधिवत पिंडाला शिववून कार्य उरकायची पाळी येते. अशावेळी मृताचे आप्तेष्ट निराश होतात. दशक्रियेच्या विधीतील हा पिंडास कावळा शिवण्याचा प्रकार मुंबईपेक्षा गावी जास्त पाळला जातो. मृताचा आत्मा कावळ्याच्याच रूपाने येतो असे सांगण्यामागे शास्त्र आहे. किंबहुना आपले सण, परंपरा या विज्ञानावर आधारितच आहेत, पण कालौघात त्यात काही चुकीचे प्रघात पडत गेले.
सर्व पक्ष्यांमध्ये कावळा हा हुशार पक्षी समजला जातो. अक्रोडसारखे टणक कवच असलेले फळ तो उंचावरून खाली टाकून फोडतो व खातो. मडक्याच्या अर्ध्यावर असलेले पाणी तो मडक्यात एक-एक दगड टाकून कसे आपल्या चोचीपर्यंत आणतो ही गोष्ट आपण ऐकली / वाचलेली आहेच. मात्र तो हुशार असूनही कोकिळा पिल्लांना जन्म देण्यासाठी आपली अंडी कावळ्याच्या घरटय़ात ठेवून त्याला फसवते असे म्हणतात. तो खूप वेळा किंचीत मान तिरकी करून बघतो म्हणून त्याला ‘एकाक्ष’ असेही म्हणतात. असे जरी असले तरी प्रत्येक गोष्ट बारीक – चौकस नजरेने पाहणाऱ्या माणसास ‘काक नजरेचा’ असे म्हणतात. तर ज्यांचे हस्ताक्षर खराब असते त्या हस्ताक्षराला ‘काकपद’ असे म्हणतात. कावळ्याचा रंग काळा आहे आणि तो रोज दृष्टीस पडतो म्हणून त्याचे काही गुण लक्षात घेतले जात नाहीत. माणसे जे पदार्थ खातात ते जवळपास सारे पदार्थ कावळा खातोच (इतर पक्षी शिजवलेले अन्न खातीलच असे नाही), पण निसर्गात मिळणारी फळेही तो खातो. केरकचऱ्यातील सडणारे पदार्थ कावळे खाऊन टाकतात तसेच मृत प्राणी…उंदीर, मांजर, कुत्रे यांची विल्हेवाट तोच लावतो. त्यामुळे कावळ्याला ‘स्वच्छतादूत’ असेही म्हणतात. कावळा कधी वेळेत घरटे बांधत नाही. मग पावसात तो इकडे तिकडे फिरतो असा एक अपसमज आहे. खरे तर उन्हाळ्यात (एप्रिलच्या शेवटी ते जूनच्या सुरुवातीपर्यंत) कावळे आपले घरटी तयार करतात. कावळा काळा असला, घाण खात असला तरी तो कधी घाणेरडा दिसणार / वाटणार नाही, तो नेहमी स्वच्छ दिसणार. आणखी एक, इतर पक्ष्यांमध्ये नसलेले ऐक्य कावळ्याच्या ठायी ठासून भरलेले असते. एखादा मृत कावळा पडलेला असेल तेथे बघता बघता शेकडो कावळे एकत्र जमून ‘काव…काव….काव…….काव’ करून जणू शोक व्यक्त करतात. तासन्तास हे सुरू असते. खरोखरच माणसांनी कावळ्यांकडून स्वच्छता आणि ऐक्याचा गुण घेतला पाहिजे. कावळ्याचे आणखी अनेक गुण, गोष्टी सांगता येतील, पण तूर्तास ‘काकपुराण’ आवरते घेतो.
























































