
>> स्पायडरमॅन
प्रदूषण आणि पर्यावरणाची होत असलेली हानी हा जगापुढचा एक गंभीर विषय आहे. हिंदुस्थानसारख्या प्रगतीशील देशासाठी हा प्लॅस्टिक कचऱ्याचा भस्मासुर अत्यंत धोकादायक ठरत चाललेला आहे. हिंदुस्थानात दरवर्षी 3.5 दशलक्ष टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो, अशी माहिती खुद्द पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे, जी नक्की चिंताजनक आहे. चांगल्या पर्यावरणाच्या निर्मितीसाठी जीवनशैलीत बदल घडवून आणण्यासाठी लोकजागृती करण्याच्या मोहिमेचा एक भाग असलेल्या ‘प्रकृती’ या शुभंकराच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या पाच वर्षांत हिंदुस्थानात दरडोई उत्पन्न होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यामध्ये दुपटीने वाढ दिसून आली आहे. या प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रदूषणाचा हिंदुस्थानातील निसर्गावरदेखील भीषण परिणाम दिसून येत आहे आणि वायू प्रदूषणातदेखील वाढ झालेली आहे. हिंदुस्थानात दररोज सुमारे 25,940 टन इतका प्लॅस्टिक कचरा निर्माण होत असतो. त्यापैकी 40 टक्के कचरादेखील जमा केला जात नाही अथवा त्याच्या पुनर्वापरासाठी काही प्रक्रियादेखील राबवली जात नाही. या प्लॅस्टिक कचऱ्याने प्रदूषण वाढते. नाले, गटारे तुंबतात. पाण्याचे आणि मातीचेदेखील प्रदूषण होते. नदी तसेच समुद्रातील दुर्मीळ जीव, प्रवाळ यांनादेखील प्रचंड मोठा धोका निर्माण होतो.
एका अभ्यासानुसार हे प्लॅस्टिक प्रदूषण इतके घातक बनत चालले आहे की, मनुष्यदेखील दिवसाला प्लॅस्टिकचे सरासरी 250 कण गिळत आहे. म्हणजेच एका आठवडाभराच्या काळात एका क्रेडिट कार्डच्या आकाराएवढे प्लॅस्टिक आपल्या पोटात जात आहे. प्लॅस्टिक कचऱ्याचे योग्य विघटन न झाल्याने, पुनरुत्पादन प्रकिया न राबवली गेल्याने हे प्लॅस्टिकचे कण तयार होतात. बाटलीबंद पाणी, नळातून येणारे प्रदूषित पाणी हेदेखील हे कण शरीरात नेण्यास मदतच करत असतात. आपल्याला हे प्रदूषण का होत आहे आणि याचे परिणाम काय आहेत, याची पूर्ण कल्पना असूनही आपण प्लॅस्टिक कचरा निर्माण करणे टाळत नाही, हे सर्वात चिंताजनक आहे.
























































