
>> अरुण जोशी
गोड गळ्याच्या सुरेल बहिणींची संख्या गानक्षेत्रात खूपच आहे. त्यातली जगप्रसिद्ध नावे म्हणजे लता-आशा, हे तर सर्वमान्य आहे. सगळीच मंगेशकर भावंडं सुरेल आहेत हे सांगायलाच नको. मीना आणि उषा मंगेशकर यांचीही गाणी गाजलेली आहेतच. याशिवाय सुमन कल्याणपूर, श्यामा चित्ताल, लता आणि कीर्ती शिलेदार, मालती पांडे आणि त्यांची बहीण अशी कितीतरी नावं आजच्या सावनी आणि बेला शेंडे यांच्यापर्यंत सांगता येतील.
घरातच पिढीजात गाणं असलं की त्याचे संस्कार पुढच्या पिढय़ांवर आपोआप होतात. त्यामुळे मार्गदर्शन मिळणं सहज शक्य असतं. परंतु सुस्वर ही मूलतः नैसर्गिक देणगी. तोच नसेल तर केवळ गाण्याचं व्याकरण समजून घेत गाणं कसं म्हणता येणार? अशी काही मंडळी गाणं शिकवण्याचं उत्तम काम करतात, पण गायक-गायिका म्हणून फारशी प्रसिद्धी त्यांच्या नावे नसते.
आपल्या या लेखमालेत मराठीचा ‘नाद’ लागल्याने मराठी गाणी गायिलेल्या इतर भाषिक गायक-गायिकांची ‘मैफल’ आहे. यातली सगळी माहिती अगदी परिपूर्ण असेल असं नाही. पण त्या निमित्ताने मराठी गाण्यांच्या ओढीने अनेक कलाकारांना कसं आकृष्ट केलं ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न. आजकाल नेटवरून बरीच माहिती मिळते. आपण काय आणि कसं शोधतो त्यावर ज्ञानात किती भर पडणार ते अवलंबून असतं. मध्यंतरी ‘कन्नड कोकिल’ म्हणून एकेकाळी गाजलेल्या गायिका अमीरबाई कर्नाटकी यांचं चरित्र वाचनात आलं. त्यामध्ये त्यांचा जीवनपट आणि सांगीतिक कारकीर्दीचा आढावा आहे.
ज्या काळात ‘प्लेबॅक’ किंवा पार्श्वगायनाचं तंत्र चित्रपटासाठी विकसित झालेलं नव्हतं; त्या काळात गायक-अभिनेत्यांना भरपूर वाव होता. काही गायकांच्या केवळ गाण्यासाठी चित्रपट निघायचा. बालगंधर्वांचा एकमेव गाजलेला मराठी चित्रपट ‘धर्मात्मा.’ तो संत एकनाथांच्या जीवनावर आहे आणि त्यातली संत एकनाथांची भूमिका गंधर्वांनी केली आहे. ती त्यांची बहुदा एकमेव पुरुष भूमिका. कुंदनलाल सैगल, नूरजहां हे तर गायक कलाकार होतेच, पण एकेकाळी अशोककुमार, दिलीपकुमार, दुर्गा खोटे यांनाही पडद्यावर गाणं गावं लागलं. तो 1931 नंतरचा वीसेक वर्षांचा बोलपट (टॉकी) सुरू झाल्याचा काळ होता. नंतर पार्श्वगायन आलं.
अमीरबाईंचा जन्म कर्नाटकातील बिलगी गावात झाला. तिथून मॅट्रिक (आताचं एसएससी) झाल्यावर त्यानी उज्ज्वल भवितव्यासाठी थेट मुंबई गाठली. सांगीतिक शिक्षण सुरूच असताना त्यांना त्या काळातील लोकप्रिय झालेल्या ‘किस्मत’ (1943) चित्रपटात गाण्याची संधी मिळाली ‘धीरे धीरे आ रे बादल’ हे त्यांचं अनिल विश्वास यांनी संगीत दिलेलं गाणं गाजलं. तसेच नौशादचं संगीत असलेल्या ‘रतन’ चित्रपटातलं (1944) ‘ओ जानेवाले बलमा लौट के आ’ हे गाणंही खूप गाजलं. त्यांनी अन्य भाषांपैकी गुजरातीत गाणी जास्त गायिली. नरसिंह महेता यांचा ‘वैष्णवजन तो तेणे कहीये’ हा अभंग महात्मा गांधीजींना खूप आवडत असे. त्यांच्या पश्चात, स्मृती म्हणून एका थिएटरला कर्नाटकात ‘अमीर टॉकीज’ असं नाव देण्यात आलं.
अमीरबाईंची मराठी गाणी म्हणजे ‘भक्तीचा मळा’ या चित्रपटासाठी गायिलेली ‘हरी वाजवी मंजुळ मुरली’ हे कवी स. अ. शुक्ल यांचं मास्टर कृष्णराव यांनी संगीत दिलेलं गाणं गाजलं. या चित्रपटात अमीरबाईंनी गुजराती भूमिकाही केली. ‘कुणी सांगा हो सांगा माझा प्रभू तो मिळेल कोठे?’ ही गाणी नेटवर पाहायला मिळतील. त्यांचं लतादीदींबरोबर प्रसिद्ध हिंदी गीत म्हणजे ‘गोरे गारे ओ बांके छोरे’ (संगीत सी. रामचंद्र) अमीरबाईंची धाकटी बहीण गोहरबाई या बालगंधर्वांच्या गाण्याने प्रभावित झाल्या होत्या. त्यांच्या आणि गंधर्वांच्या नात्याबाबत त्या काळात बरीच चर्चा झाली. गोहरबाई गंधर्वांच्या नाटकात काम करू लागल्या. गंधर्वांच्याच शैलीत त्या गात असत.
गंधर्व कंपनीच्या नाटकात त्यांनी गायिलेली काही गीतं उपलब्ध आहेत. मोठी बहीण अमीरबाईंप्रमाणेच त्यांचाही गळा गोड होता. ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’ (नाटक – सं. मानापमान), ‘वनवासी राम माझा सांगा कुणी पाहिला’, ‘माझ्या नारायणा माझ्या वसुदेवनंदना’ या अशा त्यांच्या गाण्यांच्या काही ध्वनिमुद्रिका ऐकायला मिळतात. ‘अगा वैकुंठीच्या राया’ हे गाणे ‘जोगिया रागात आपल्यासाठी आजही उपलब्ध आहे.
गोहरबाई कर्नाटकी विजापूरच्या. मात्र हिंदुस्थानात ज्याचं गाणं कोलकाता येथे पहिल्यांदाच 1902 मध्ये ध्वनिमुद्रित झालं त्याचं नाव होतं गौहरजान. त्यांचा काळ गोहरबाईंच्या खूपच आधीचा. त्यांच्याविषयी वेगळा लेखच लिहिला पाहिजे.




























































