नोंद – ग्रेस बाधा

>> रविप्रकाश कुलकर्णी

ग्रेस हा कवी चकवा देणारा आहे. कधी त्याची कविता कळल्यासारखी वाटते तर कधी कधी तो काय म्हणतो हे जाणून घेण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो. ग्रेसच्या कवितेने भल्याभल्यांना मोहविले जसे आहे तसेच पावलेदेखील. मग तो त्यांचा शोध, ग्रेसबाधाच म्हणायचं त्याला, ती कधी संपतच नाही. अशी ग्रेसबाधा झालेल्यांपैकी एक आहेत श्रीनिवास हवालदार! महाश्वेता मालिकेचे शीर्षकगीत होते-

भय इथले संपत नाही

मज तुझी आठवण येते

लता मंगेशकर यांनी गायिलेले हे गीत ऐकून श्रीनिवास हवालदार भारून गेले. त्यांना कळले ही मूळ कविता कुणा ग्रेस नावाच्या कवीची आहे! तोपर्यंत त्यांचा मराठी वाङ्मयाशी फारसा संबंध नव्हता. त्यात पुन्हा ग्रेसने म्हटलेलं, `काय दुर्बोध वाटतं माझ्या लेखनात?  `क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी’ यात काय दुर्बोध आहे. या माझ्या शब्दमयी, शब्दवेल्लाळ आणि अर्थ काहूर कवितेवर दुर्बोधतेचा आरोप केला जातो, त्या आरोपाचे मी निराकरण करत नाही. त्याचे कारण कलावंत म्हणून, जरी मला ठाऊक असले तरी कुमारिकेची ही बेसरबिंदी कुठल्याही प्रियाळ समीक्षकाला, वाचकाला मी देणार नाही.’ तर असे हे ग्रेस प्रकरण!

पण श्रीनिवास हवालदार यांनी ग्रेसच्या कवितेचा पिच्छा सोडला नाही. त्यातूनच त्यांचे दोन खंडाचे पुस्तक आले `धुक्यातून प्रकाशाकडे.’ त्यात ग्रेस यांच्या 170 कवितांमधील प्रतिमांचा उलगडा करून कविता अधिक सुबोध करून सांगितली. त्यात लेखक जणू ग्रेसमय झाले आणि त्यांची  शोधयात्रा सुरू झाली. आणि ती निरीक्षणे पुढे `दुरस्थ ग्रेस-कवी ग्रेस यांना न लिहिलेली पत्रे’ यात मांडलेली आहेत.

तरीसुद्धा ग्रेसबद्दल काही सांगायचे राहिले आहे असं वाटून अभ्यासक हवालदार यांनी समग्र ग्रेस कवितातून 50 कविता निवडून ग्रेसच्या कवितांतील सौंदर्य स्थळे आणि त्यातील गूढभाव उलगडून दाखवला आहे. तसंच या कवितांची आणि ग्रेस यांची व्यक्तिगत आयुष्याची सांगड कशी आहे हे दाखवायचा प्रयत्न करणारा संग्रह `सांध्यसुक्ताचा प्रवासी’ जो मिहाना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

ग्रेसने आपल्या कवितेवर घेतल्या जाणाऱया आक्षेपांबाबत म्हटलंय, `माझी कविता हे एक बेटच आहे. मीही एक बेटच आहे… बेटावर माणसे सफरीसाठी येतात किंवा समुद्र जिवावर उठला तर… माझ्या कवितेच्या बेटावर येणाऱया काव्यरसिकाला परतीची बोटीची कुठलीही हमी मी देऊ शकत नाही… परतावेसे वाटले तर स्वतच होडी झाले पाहिजे…!’ `सांध्य सुक्ताचा प्रवासी’तलं लेखन वाचकाला ग्रेस यांच्या भोवऱयातील कवितेपर्यंत पोचवण्यासाठी होडीची भूमिका नक्की करते. तसं श्रीनिवास हवालदार यांचे लेखन वाचून आपल्याही मनात आपला म्हणून अर्थ उलगडू लागतो हे लेखकाचे यश!