आभाळमाया – पौर्णिमेचा चंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

बुधवारच्या पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहिलात का असं विचारत नाही. कारण अर्थातच स्पष्ट आहे. लॉक डाऊनमुळे घराबाहेर पडणं योग्य नाही आणि त्यात कुठे कुठे ढगाळ वातावरण असलं तर कुठलं चांदणं? पण त्याची थोडी वैज्ञानिक माहिती घेऊ. तसं आपण चंद्राविषयी बरंच वाचलंय तरीही, खगोलातल्या एकेका ग्रह, तारे, उपग्रह, धूमकेतू अशा अनेक गोष्टींचे इतके बारकावे (ऍस्पेक्टस्) असतात की एका छोटय़ा लेखात ते पूर्णपणे मांडता येत नाहीत.

मात्र कालचा चंद्र या वर्षीचा शेवटचा सर्वात ‘मोठा’ दिसणारा ‘सुपरमून’ होता म्हणून त्यासंबंधी थोडंसं. अवकाशातील प्रत्येक वस्तूला गती आहे आणि ग्रह, उपग्रह, धूमकेतूच काय विशाल दीर्घिकासुद्धा (त्याच्या केंद्रकाभोवती) परिक्रमा करीत असतात. ग्रह आपल्या जनक ताऱयाभोवती, उपग्रह ग्रहांभोवती आणि धूमकेतूही त्यांच्या कक्षांमध्ये भ्रमण करतात. धूमकेतूंच्या कक्षा तर केवळ लंबवर्तुळाकार नसून अन्वस्त म्हणजे बोलिक स्वरूपाच्याही असतात. त्यामुळेच काही धूमकेतू आपल्या सूर्यमालेला एकदाच भेट देतात.

पृथ्वी आणि इतर सारे ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार (एलिप्टिकल) कक्षेत फिरतात. त्यामुळे त्यांचा वेग कधी जास्त तर कधी मंद असतो. तीच गोष्ट पृथ्वीभोवती फिरणाऱया आपल्या चंद्राची. आणखी एक मुद्दा म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षेमुळे मोठे ग्रह ताऱयाच्या कधी जवळ तर कधी दूर जातात. पृथ्वी सूर्याजवळच्या कक्षेत असते तेव्हा ‘उपसूर्य’ आणि दूर असताना ‘अपसूर्य’ स्थानी आहे असे म्हटले जाते. चंद्रही पृथ्वीजवळ असताना ‘उपभू’ आणि लांब असतो तेव्हा ‘अपभू’ स्थितीत असल्याचं म्हटलं जातं.

चंद्राच्या अशा भ्रमणामुळेच तो केव्हातरी पृथ्वीच्या जवळ येणार व मोठा दिसणार हे उघड आहे. अर्थात ‘सुपर मून’ फारच मोठा दिसतो आणि सहज कोणालाही त्यातला फरक समजतो असं नाही. सतत निरीक्षण करणाऱया किंवा सहज निरीक्षण घडणाऱया चिकित्सकाना ते चटकन जाणवते. पूर्वीही आजच्या पौर्णिमेचा चंद्र किती मोठा दिसतोय असं बोललं जायचं ते आठवतंय. पण त्यामागचं वैज्ञानिक कारण सर्वांनाच ठाऊक असत नाही. 1957 नंतर ‘स्पेस एज’ खऱया अर्थाने सुरू झालं आणि एकूणच माहितीचं आदान-प्रदान करणारी साधनं वाढल्यावर या संकल्पना अनेकांना समजू लागल्या.

चंद्र आणि पृथ्वी यातील सरासरी अंतर तीन लाख चौऱयाऐंशी हजार किलोमीटर आहे. लंबवर्तुळाकार कक्षेत तो ‘अपभू’ म्हणजे पृथ्वीपासून दूर असतो तेव्हा चार लाख चार हजार किलोमीटरपर्यंत लांब जाऊन छोटा दिसतो. परंतु त्याची ‘मायनर मून’ अशी काही चर्चा होत नाही. चंद्र उपभू म्हणजे पृथ्वीपासून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार किलोमीटरपर्यंत जवळ आला की मात्र नजरेत भरतो आणि ‘सुपर मून’चं कौतुक होतं. गेले चार चांद्र महिने तो पौर्णिमेला पृथ्वीजवळ येता येता काल सर्वाधिक नजीक आला म्हणून सुपर सुपर मून ठरला. असं सातत्यानं घडतच असतं. निरीक्षणाचं सातत्य मात्र हवं.

काल योगायोगाने कुणी घराच्या पूर्वेकडील खिडकीतून चंद्र पाहिला असेल तर त्यांना सुपर मून बघण्याचा आनंद मिळाला असेल. पण आता नाही तरी नंतर अशी संधी मिळेलच.

खरं तर आपल्या लेखमालेतून आपण शक्यतो सोप्या भाषेत खगोलशास्त्र्ा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातले काही प्रयोग तर कोविडमुक्त झाल्यावर आणि पाऊस संपल्यानंतर शाळांमधून करता येण्यासाखे आहेत. प्रयोग म्हणजे लगेच अभ्यासक्रम आणि परीक्षा नव्हे. उलट सृष्टीची मौज उलगडणाऱया आनंदातून बरंच काही शिकता येतं. गेली 35 वर्षे आम्ही असेच शिकलो आणि शिकवलं. त्यातून स्फूर्ती घेऊन अनेकांनी या विषयाची पीएच.डी. केली! अर्थात त्यासाठी मात्र सखोल विद्यापीठीय अभ्यासाची गरज असते. सर्वसामान्यांमध्ये विज्ञानविचार रुजवायचा तर लोकभाषेत आणि सोप्या शब्दात या संकल्पना सांगता आल्या पाहिजेत. इंग्लंडमधल्या केंब्रिज विद्यापीठात ‘एक्सपर्ट टू ले’ असा कार्यक्रम असतो. त्यात एक्सपर्ट म्हणजे तज्ञ व्यक्तीने आपलं म्हणणं ‘ले’ पर्सन्स म्हणजे सर्वसामान्यांना समजावून सांगण्याचं आव्हान असतं. हा कार्यक्रम तिथे सादर होतो. असे उपक्रम आपल्याकडेही करता येतील. ‘ऍनालेमा’, ‘पायाखालची सावली’ असे सोपे प्रयोग कुठेही होऊ शकतात.

विज्ञानाच्या परिचयातून आणि अभ्यासातून विश्वाची ओळख होत गेली तर अनेक गैरसमजुती दूर होतील. सकारात्मक विचारप्रक्रियेला गती येईल. कदाचित यातूनच संशोधक निर्माण होतील. हे ज्ञानाचे चांदणे ‘सुपर मून’पेक्षा शीतल असेल.