बेताल बडबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाने जितका कहर केला आहे तितकाच भयंकर कहर नेत्यांच्या बेताल बोलण्याने केला आहे. उडदामाजी काळे गोरे असा तो प्रकार. सत्ताधारी पक्ष म्हणून जबाबदारीने बोलण्याची व वागण्याची भाजपाच्या नेत्यांची जबाबदारी आहे. मात्र, त्याला हरताळ फासण्याचे काम या पक्षाचे नेते सातत्याने करताना दिसतात. पंतप्रधानांनी अनेक वेळा बजावूनही भाजप नेत्यांनी सैल सोडलेल्या जिभा काही आत घेतलेल्या दिसत नाहीत.

दमोह या आपल्या मतदारसंघातून गायब असलेल्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना त्यांच्या मतदारसंघातील मतदाराने संतप्त होऊन, ‘मंत्रीजी लोग मर रहे है और आप कहा गायब है?’ असा सवाल केल्याने मंत्री महोदयांचे पित्त खवळले. त्यांनी संबंधिताची असभ्य भाषेत कानउघाडणी तर केलीच शिवाय या मंत्र्यांनी ज्या पद्धतीचे वर्तन केले ते कोणत्याही लोकप्रतिनिधीला शोभा देणारे नव्हते.

एकीकडे मंत्र्यांनीच असा ताल सोडल्यानंतर भाजपाचे बिहारातले एक बोलभांड पुढारी यांनी आपली राजकीय संस्कृती किती रसातळाला गेली आहे, त्याचे प्रत्यंतर दाखवून दिले. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्या चिरंजीवाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तरणाताठा मुलगा जाण्याचे दुःख येचुरीच नाही तर कोणालाही होणे स्वाभाविक आहे. मात्र चीनचे समर्थन करणाऱया येचुरींच्या मुलाचे चीननिर्मित कोरोनाने निधन झाले, असे हिणकस विधान करून मिथिलेश कुमार तिवारी यांनी भाजपासह आपल्या राजकीय संस्कृतीला लाज आणली.