मुद्दा – स्त्री अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी…

2448

>> मयूर प्रकाशचंद्र बजाज

आजही समाजात अशी परिस्थिती आहे की, मुलगी म्हटली की नकोच. म्हणूनच आपल्या सरकारने एक खूप चांगला नारा दिलेला आहे तो म्हणजे ‘मुलीला वाचवा, मुलीला शिकवा’ आणि खरोखरच आज ही काळाची गरज आहे. तरीसुद्धा समाजातील लोकांकडून वाईट घटना घडताना दिसतात. त्यामुळेच मुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या अंगावर शहारे येतात.

त्याचेच उदाहरण म्हणजे जालना येथील एका प्रेमीयुगलाला केलेली मारहाण आणि तरुणीचा विनयभंग. ही घटना घडली न् घडली तोच वर्धा जिह्यातील हिंगणघाट तालुक्यातील विक्की नगराळे या तरुणाने सकाळच्या वेळी एका प्राध्यापिकेवर भरचौकात पेट्रोल टाकून जाळले. या घटनेत प्राध्यापिकेला गंभीर स्वरूपात इजा झाली व ती नागपूरच्या दवाखान्यात मृत्यूशी लढा देताना मरण पावली. घडलेली घटना हेच दर्शविते की, समाजात जागरूकतेचा अभाव आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी समाजात जनजागृती निर्माण करावी लागेल. घडलेली घटना ही खरोखरच दुर्दैवी, निंदनीय आहे. मात्र दुसऱ्या एका सत्य घटनेवर ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित झाला, ही एक प्रशंसनीय बाब आहे. मात्र दैनंदिन जीवनात रोज स्त्री अत्याचाराच्या घटना घडतच आहेत त्याचे काय?

अशा प्रकारच्या वाईट प्रवृत्ती समाजात येतात तरी कुठून? दुसऱ्या व्यक्तीला हानी पोहोचवून नेमके काय साध्य केले जाते किंवा काय साध्य होते? अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जनजागृती करून प्रयत्न करावे लागतील. अन्यथा समाजात एक चुकीचा संदेश जाऊन मुली, महिलांसाठी भयावह परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. अशातूनच निर्भया हत्याकांड प्रकरण घडले. हे कायद्याच्या दृष्टीने दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण, ज्यात अजूनही फाशी झालेली नाही. उन्नाव बलात्कार प्रकरणात पुरावे नष्ट करण्यात आले. या प्रकरणातही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलीस अधिकारी आणि आरोपींमध्ये चकमक होऊन आरोपी जागीच ठार मारले गेले. कायद्यात अशा घटनेला अवैध म्हटले जाते, कदापि वैध म्हटले जाणार नाही. कारण या प्रक्रियेत कायद्याप्रमाणे अंमलबजावणी झालेली नसते. नांदेड शहरातील आणि बिलोली येथील शंकर नगरमध्ये घडलेली घटना या तर मानवतेला काळिमा फासणाऱ्याच म्हणाव्या लागतील.

एकंदरीत या सर्व घटनेवरून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आजच्या महिला, मुली या खरोखरच सुरक्षित आहेत का?  यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकांमध्ये कायद्याचा धाक, भीती राहिलेली नाही म्हणूनच कायदा हातात घेऊन दैनंदिन जीवनात रोजच अशा घटना घडताना दिसतात. ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे.

समाज सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटना यांनी पुढे येऊन एका चांगल्या समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. समाज सुधारणे हे काही एकटय़ादुकटय़ाचे काम नसून त्यासाठी सातत्याने आणि सर्व स्तरांवर कसोशीने प्रयत्न व्हायला हवेत, जेणेकरून समाजात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. तसेच कठोर कायदा करण्याची गरज आहे, ज्यामुळे कायद्याची दहशत निर्माण होईल आणि लोकांना कायदा हातात न घेऊ देता न्यायप्रणालीद्वारे लवकरात लवकर न्याय मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या