
>> शिरीष कणेकर
पृथ्वी शॉमध्ये सार्वकालीन सर्वश्रेष्ठ हिंदुस्थानी फलंदाज होण्याची क्षमता आहे. पण असणं व ती प्रत्यक्षात उतरवणं यात फार फरक आहे. ‘देअर इज मेनी अ स्लिप बिट्विन द कप अॅण्ड द लिप.’ इथे तर चार चार स्लिप्सही असतात. एकोणीस वर्षांखालील विजेत्या संघाचा कर्णधार उन्मुख चंद याचं काय झालं आठवतंय ना? यथावकाश त्याचा कसोटी संघातील समावेश गृहीत धरला गेला होता. तो दृष्ट लागण्यासारखी फलंदाजी करायचा अन् खरोखरच त्याला दृष्ट लागली जणू! तो सातत्यानं ढेपाळत राहिला. तो फलंदाजीची कलाच विसरला. आज दिल्लीच्या रणजी संघातही तो स्थान मिळवू शकत नाही. हाच तो उन्मुख चंद हे सांगून खरं वाटत नाही.
आज ज्याच्या त्याच्या तोंडी एकच नाव आहे, पृथ्वी शॉ. नावापासूनच त्याच्यातील अद्भुतपणा जाणवतो. बिहारी माणसाचं आडनाव शॉ कसं? (नाटककार बर्नार्ड शॉचा कोण?) त्यानंतर त्याची फलंदाजी तोंडात बोटं घालायला लावते, श्वास रोखून धरायला लावते व डोळय़ांवरचा विश्वास उडविते. तो खेळत असताना टी.व्ही.वर बघताना भानामती झाल्यासारखं होतं. हातातलं सगळं काम सोडत आपण नजरबंदी झाल्यागत टीव्हीकडे बघत बसतो. त्याच वेळेला एखाद्या वाहिनीवर आपली लाडकी मालिका चालू असेल तर तीही बघण्याची आपल्याला इच्छा होत नाही. मी तर ऐकलंय की, टीव्हीवर शॉला बघत असताना काही माणसं बायकोच्या हाकेकडेदेखील पूर्ण दुर्लक्ष करतात. हा शॉबाबतचा चमत्कार आहे.
9 नोव्हेंबर 1999 रोजी शॉचा जन्म झाला. म्हणजे आज तो अवघा 21 वर्षांचा आहे. त्याच्यावर असलेल्या डोंगराएवढय़ा अपेक्षा पाहता त्याचं वय कोवळंच म्हणावं लागेल. तीन वर्षांपूर्वी म्हणजे केवळ अठरा वर्षांचा असताना त्यानं एकोणीस वर्षांखालील हिंदुस्थानी संघाचं नेतृत्व केलं. तत्पूर्वी ‘हॅरिस शील्ड’ स्पर्धेत ‘रिझवी प्रिंगफिल्ड’तर्फे खेळताना 330 मिनिटांत 546 धावा हाणल्या होत्या. हा एक विक्रमच होता. तो सहा तास सात मिनिटे विकेटवर होता. 546 धावांच्या खेळीत त्यानं 85 चौकार मारले. योगायोग सांगायचा तर, शॉनं हा भीमपराक्रम सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर चारच दिवसांनंतर केला.
4 ऑक्टोबर 2018 रोजी वय 16 वर्षे 319 दिवस असलेल्या पृथ्वी शॉनं वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. पहिल्याच प्रयत्नात त्यानं शतक झळकावलं आणि पदार्पणात शतक झळकावणारा तो जगातील सर्वात कमी वयाचा कसोटी फलंदाज ठरला. तेंडुलकर गेला नाही तोच आपल्याला नवीन दिग्गज, जगज्जेता फलंदाजोत्तम लाभला होता. पण सगळं एवढं विनाविघ्न, सुरळीत थोडंच होत असतं? ऑस्ट्रेलियाचा दौरा शॉला चांगलाच महागात पडला. तो फक्त 0 व 4 धावाच करू शकला. या अपयशापेक्षा त्यावर टीकाकारांनी घेतलेले तोंडसुख शॉला जास्त घातक वाटलं असेल. त्याच्या फलंदाजीच्या तंत्राविषयी प्रश्न उपस्थित केले गेले. आयपीएलमध्ये गतसाल त्याची वाट लागली. तेरा डावांत तो केवळ 228 धावा करू शकला. त्याच्या आयपीएलमधल्या शेवटच्या आठ डावांतील धावा अशा होत्या – 19, 4, 0, 0, 7, 10, 9 आणि 0.
क्षणभर अभद्र विचार मनात आला, हा उन्मुख चंदच्या मार्गाने तर निघालेला नाही ना? नाही, पण तो पुन्हा पृथ्वी शॉ होतोय. शॉटस् झकास ‘टाइम’ होतायत. त्याला बघताना सतत वाटत राहतं की, हा फलंदाज होण्यासाठीच जन्माला आलाय. तोही सलामीचा फलंदाज. म्हणजे डावाच्या सुरुवातीलाच तो प्रतिपक्षाची दाणादाण उडवून देतो. अशा मारझोडीची सवय नसलेले वेगवान गोलंदाज बावचळून, भांबावून जातात. क्षेत्ररक्षण कसं ठेवावं हेच कर्णधाराला कळत नाही. शॉ त्यांच्यावर आरुढ झालेला असतो. ते सैरभैर होतात. बरं, शॉ अतुल बेदाडेप्रमाणे वेडावाकडा मारत सुटत नाही. क्रिकेटच्या परिभाषेत म्हणतात तसे त्याचे सगळे ‘क्रिकेटिंग शॉटस्’ असतात. तो कचकचीत चौकार हाणत असतो. आपण गोलंदाजी करतोय की काय करतोय हेच गोलंदाजांना कळत नाही. अशी अपमानास्पद वागणूक त्यांना जगातील अन्य सलामीवारांकडून कुठेच मिळत नाही.
आता मुख्य मुद्याकडे वळूया. संघनायक, संघसहकारी, प्रशिक्षक व निवड समिती पृथ्वी शॉच्या हे खोपडीत घुसवू शकत नाहीत का की, प्रत्येक चेंडू हा चौकार मारण्यासाठी नसतो? विख्यात ऑस्टेलियन फलंदाज ‘गव्हर्नर जनरल’ चार्लस् मॅकार्टने म्हणायचा, ‘प्रत्येक चेंडूवर धावांचे आकडे लिहिलेले असतात. एक, दोन, तीन, चार – नाही पाच नाही, फार धावावं लागतं.’ शॉला मात्र प्रत्येक चेंडूवर एकच आकडा दिसतो. चार. एक, दोन, तीन हे आकडे त्याच्या गावी नाहीत. चुकून फटका अडवला जाऊन कमी धावा निघाल्या तर पुढच्या चेंडूवर चौकार मारायला तो कटिबद्ध असतो. या भानगडीत विकेट गेली तरी बेहत्तर. अनेकदा जातेही, पण चौकाराचं व्रत तो सोडत नाही. आता काय म्हणावं या कर्माला? ब्रॅडमनदेखील प्रत्येक चेंडूवर चौकार मारायचा प्रयत्न करायचा नाही. शॉ म्हणेल, नसेल ब्रॅडमन मारत, मी मारतो.
तो हे कधी समजेल की, मोठी खेळी खेळायची असेल तर काही चेंडू शांतपणे तटवायचे असतात. थेरपी म्हणून त्याला चेतेश्वर पुजाराला खेळताना दाखवा. (आणि पुजाराला थेरपी म्हणून शॉल खेळताना दाखवा. एखादा चेंडू मारायलाही हरकत नाही हे पुजाराला कळू द्या.) जितक्या लवकर शॉच्या डोक्यात प्रकाश पडेल तेवढं त्याच्या व संघाच्या दृष्टीनं उत्तम.
पृथ्वी शॉला एवढंच कळकळीचं सांगणं आहे – ‘भावा, तू हिरा आहेस. तुझी गारगोटी होऊ देऊ नकोस.’


























































