
>> महेश उपदेव
संस्कृतच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, हिंदुस्थान दर्शन आणि न्यायशास्त्रातील विद्वान म्हणून ओळखले जाणारे आणि नागपुरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदानीदेवी यांचे नुकतेच अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने विदर्भ एका संस्कृत पंडिताला मुकला आहे.
प्रा. हरेराम त्रिपाठी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील देवरिया (कुशीनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही देवरियामध्येच झाले. 1986 मध्ये त्यांनी संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी बनारस गाठले. त्यांनी रामाचार्य संस्कृत विद्यापीठातून उत्तर माध्यम परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून त्यांनी शास्त्री (पदवी), आचार्य (पदव्युत्तर) आणि पीएचडीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. 1986 मध्ये न्यायशास्त्रातील प्रख्यात विद्वान प्रा. वशिष्ठ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पदवी मिळवली. 1993 मध्ये त्यांनी राष्ट्रीय संस्कृत संस्थान (रणवीर कॅम्प, जम्मू) येथे संशोधन सहायक म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. काही महिन्यांनी त्यांची श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागात नियुक्ती झाली. 2008 मध्ये ते सर्वदर्शन विभागाचे प्राध्यापक झाले. संस्कृत साहित्य आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. 2003 मध्ये त्यांना उत्तर प्रदेश संस्कृत संस्थेकडून महर्षी बद्रायन राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला. तसेच शंकर वेदांत, पाणिनी आणि इतर क्षेत्रांतील विशिष्ट पुरस्कारही त्यांनी मिळवले.
प्रा. हरेराम त्रिपाठी हे हिंदुस्थान दर्शनशास्त्र, नव्यन्याय, सांख्ययोग, न्यायशास्त्राचे प्रख्यात विद्वान व दार्शनिक होते. त्यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरू पदाची सूत्रे दि. 7 जून 2023 रोजी स्वीकारली. दोन वर्षांच्या कार्यकाळात विश्वविद्यालयाच्या विकासासाठी आतापर्यंत 70 कोटी अनुदान तसेच संशोधन प्रकल्प व विविध कार्यशाळा, सेमिनार, परिषदांकरिता अनुदान प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात वारंगा आंतरराष्ट्रीय परिसराच्या डॉ. हेडगेवार शैक्षणिक भवनाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले. याशिवाय संशोधन छात्रावास, डॉ. तोतडे सभागृहदेखील त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. अगदी कालच सहा प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे पत्र त्यांनी विशेषत्वाने बोलावून सगळ्यांना दिले होते. त्रिपाठी यांना संस्कृत क्षेत्रातील विविध प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचा दांडगा अनुभव होता. प्रा. त्रिपाठी हे श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्ली येथे भारतीय दर्शनशास्त्राचे प्रोफेसर होते. त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरूपदही भूषविले होते. सतत कार्यमग्न असलेल्या व विविध संस्थांमध्ये कार्य करण्याचा अनुभव असलेल्या त्रिपाठी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक भरीव काम केले. त्रिपाठी यांना संस्कृत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाकरिता केंद्र सरकारतर्फे महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, शांकर वेदान्त पुरस्कार, पाणिनी सम्मान तसेच उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानचा विशिष्ट सेवा पुरस्कारासह अनेकानेक सन्मान
प्राप्त झाले होते.
प्रा. हरेराम त्रिपाठी आपली पत्नी बदामीदेवी यांच्यासोबत कुशीनगर जिह्यातील चकिया बाघुजघाट येथील त्यांच्या मूळ गावी जात होते. यादरम्यान कारचा अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या अनपेक्षित व धक्कादायक निधनाने संस्कृत क्षेत्राची मोठीच हानी झाली असल्याची प्रतिक्रिया संस्कृत तसेच देशातील मान्यवरांनी व्यक्त केली.