ठसा – राजा मयेकर

1924

>> प्रशांत गौतम

ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे लोकनाटय़, दशावतार, संगीत, नाटक, आकाशवाणी, मालिका अशा विविध क्षेत्रांत मौलिक योगदान लाभले होते. त्यांच्या निधनाने या सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. लोकनाटय़ाचा बादशहा आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राजा मयेकर गेली साठेक वर्षे कार्यरत होते. लोकनाटय़ म्हटले की, आजही रसिक प्रेक्षकांना त्यांचा दमदार अभिनय, बतावणी आठवते. लोकरंजनाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीला दिलेले योगदान कुणालाही विसरता येणार नाही. अभिनयातील सहज सुंदरतेसाठी ते प्रसिद्धच होते. त्यांचे जन्मगाव मूळ कोकणातले असल्याने लाल मातीविषयी त्यांना कायमच आस्था होती. याच मातीतून त्यांनी मालवणी रंगभूमीसाठी लक्षणीय कार्य केले जे आजही रसिकांच्या आठवणीत आहे. मालवणी रंगभूमीवर दशावतारी नाटकापासून सुरू झालेला प्रवास पुढे लोकनाटय़ातून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत विस्तारला. ज्या ज्या माध्यमात त्यांनी भूमिका केली त्यात त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा अमीट ठसा सोडला. एवढेच नव्हे तर संगीत नाटकासोबत बालगंधर्वांच्या नाटकाचेही प्रयोग त्यांनी दमदार सादर केले. कोकणातून मयेकर मुंबईत आले आणि तेथील चाळ वस्तीत शाहीर अमर शेख यांची भेट झाली. मयेकर चाळीत रहात असले तरी त्यांची भाषा मात्र शुद्ध व भारदस्त होती. त्यामुळे अमर शेख प्रभावित झाले. पुढील काळात कृष्णांत दळवी, मयेकर व साबळे यांच्या पुढाकारातून शाहीर साबळे आणि पार्टीची स्थापना केली. या पार्टीच्या माध्यमातून मयेकर यांनी ‘आंधळ दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’, ‘असुनि खास घरचा मालक’ अशा तीन लोकनाटय़ाची निर्मिती केली आणि त्यास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने लोककलेच्या क्षेत्रात राजा मयेकर यांनी अढळ स्थान निर्माण केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटलं’, ‘साधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’ या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. ‘गुंतता हृदय हे’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’, ‘संशयकल्लोळ’, ‘बेबंदशाही’, ‘झुंजारराव’, ‘स्वयंवर झाले सीतेचे’, ‘कळत नकळत’ ‘या सुखांनो या’, ‘श्यामची आई’, ‘लढाई’, ‘धमाल गोष्ट नाम्याची’ या नाटक आणि चित्रपटांतून मयेकर यांनी भूमिका साकारल्या. ‘गुंतता हृदय हे’मध्ये त्यांनी साकारलेली सोमाजी ही भूमिका रसिक प्रेक्षकांना पसंत पडली. दूरदर्शनवरील ‘गप्पागोष्टी’ ही मालिका अशीच लोकप्रिय ठरली व गाजली. राजा मयेकर यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमांतून कसदार अभिनय साकार करीत लक्षणीय योगदान दिले. त्यांनी साकारलेल्या अनेक कलाकृती अजरामर ठरल्या. मयेकर हे अस्सल कलावंत होते. त्यांच्या निधनाने आपण एक चतुरस्र अभिनेता गमावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या