राजहंसी ठसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘राजहंस’ प्रकाशन हे मराठी पुस्तक विश्वातले अग्रगण्य नाव. विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी लाभलेल्या या प्रकाशनगृहाचे दोन स्तंभ म्हणजे श्रीकांत माजगावकर आणि दिलीप माजगावकर. या व्यक्त्वांचा वेध घेणारा ‘राजहंस’द्वारे प्रकाशित झालेल्या ‘माणूस’कार श्रीगमा आणि ‘राजहंसी’ दिगमा या पुस्तकांतील हा काही अंश.

श्रीगमा म्हणजे ‘माणूस’ अन् ‘माणूस’ म्हणजे श्रीगमा-असे समीकरण बनल असले तरी श्रीगमांचे कर्तृत्व ‘माणूस’च्या परिघापलीकडेही किती तरी विस्तारलेले होते. खरे तर ‘माणूस’च्या स्थापनेआधीच त्यांची साक्षेपी संपादक म्हणून कारकीर्द सुरू झाली होती. 1957 मध्ये ते बाबासाहेब पुरंदरेंना ‘राजहंस प्रकाशन’मध्ये येऊन मिळाले. स्थापनेपासूनच ‘राजहंस’ची पुस्तके वाचकाला वेगळा, सकस अन् आशयघन मजकूर पुरवत होती. श्रीगमांसारखा संपादक लाभल्याने विषयाचं वैविध्य अन् आशयाची समृद्धी राजहंसला जणू जन्मजातच लाभली. राजहंस प्रकाशनच्या साडेसहा दशकांच्या वाटचालीत जवळजवळ निम्मा काळ श्रीगमा त्याचे कर्णधार होते.

1983 मध्ये ‘राजहंस प्रकाशन’ची संपूर्ण धुरा श्रीगमांचे धाकटे बंधू दिलीप माजगावकर म्हणजेच दिगमांकडे आली. दिगमा ‘राजहंस’मध्ये दाखल झाले होते. 1966 मध्ये प्रकाशन क्षेत्रातील सुरुवातीचे धडे त्यांनी श्रीगमांच्या मार्गदर्शनाखालीच गिरवले होते. ‘माणूस’च्या वाटचालीतही श्रीगमांना दिगमांची भक्कम साथ लाभली होती. 1983 नंतरच्या वाटचालीत दिगमांनीही ‘श्रीगमा-माणूस’ या समीकरणासारखे ‘राजहंस’ म्हणजे दिगमा अन् दिगमा म्हणजे ‘राजहंस’ हे समीकरण घडवले. वैचारिक मोकळेपणा, समाजहितैषी बैठक, सर्व विचारधारांना समजून घेणारा उदार दृष्टिकोन आणि या साऱयांचा परिपाक म्हणून अगदी टोकाची मते असलेल्या व्यक्तींनाही ‘माणूस’ आणि ‘राजहंस’ परिवाराबद्दल वाटणारा जिव्हाळा ही वैशिष्टय़े श्रीगमा अन् दिगमा दोघांनीही कसोशीने अन् असोशीने जपली. त्यामुळेच ही वैशिष्टय़े राजहंस प्रकाशनाच्या कार्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली. श्रीगमांचा हा वारसा पुढे नेताना दिगमांनी आपली नजर प्रकाशन क्षेत्रावरच एकाग्र केली.

‘माणूस’मधील अनेक गाजलेल्या लेखमालांना अथवा विस्तृत लेखनाला राजहंस प्रकाशनाने पुस्तकरूप दिले होते. मात्र जवळजवळ सगळय़ा पुस्तकांचे विषयचरित्रे, आत्मचरित्रे, सामाजिक-राजकीय – ऐतिहासिक बाबी यांभोवती फिरणारे होते. दिगमांनी विषयांचा परीघ खूप विस्तारला. वाचकाला नेमक्या कोणत्या गोष्टीची गरज आहे याची नेमकी नस जणू त्यांना सापडली होती. राजहंसच्या व्यासपीठावर आता विज्ञान, पर्यावरण वावरू लागले. ललित लेखनाचा मोहोर फुलू लागला. चरित्र-आत्मचरित्रांचे दालनसुद्धा वेगवगळय़ा क्षेत्रातल्या व्यक्तिमत्त्वांनी गजबजून गेले. त्यात वैज्ञानिक, कलावंत, उद्योजक अशा व्यक्तीही उठून दिसू लागल्या. समाजकारण-राजकारणातील इतिहास-वर्तमानावर भाष्य करणारी वैचारिक ग्रंथसंपदा तर भरीवपणे आकार घेतच होती. जोडीला संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, नाटय़, चित्रपट अशा विविध क्षेत्रांमधील कलाविचार मांडणारी, निर्मितीच्या मागे घडणारी विचारप्रक्रिया शोधणारी पुस्तके वाचकाला आकर्षित करून घेऊ लागली.

असे वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी साक्षेपी संपादकांचा संच दिगमांनी बांधला. आनंद हर्डीकर, विनया खडपेकर आणि करुणा गोखले हे पूर्ण वेळ संपादक; तर श्रीराम गीत, मनोहर सोनवणे, संजय भास्कर जोशी असे प्रकल्पांशी संबंधित संपादक पुस्तकाच्या आशयावर घारीसारखी नजर ठेवून असतात. वेगवेगळे विषय हाताळताना दिगमांनी प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीमूल्यांकडे आवर्जून लक्ष पुरवायला सुरुवात केली. आशयसमृद्धीबरोबरच पुस्तकाचे रूपडेही आकर्षक ठरावे, बांधणी सशक्त असावी, वाचन केवळ मेंदू जागवणारे नाही तर नेत्रसुखदही बनावे आणि एकूणच पुस्तकवाचनाचा अनुभव जास्तीत जास्त आनंददायी आणि वाचकस्नेही ठरावा या उद्देशाने पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे काळजीपूर्वक बघण्यास दिगमांनी सुरुवात केली. उच्च निर्मितीमूल्ये राखण्याच्या या ‘राजहंसी’ प्रयत्नांना कुसुमाग्रज, पु. ल. देशपाडेंपासून श्री. पु. भागवत, मंगेश पाडगावकर, विक्रम सेठ, डॉ. जयंत नारळीकर अशा दिग्गजांनी आवर्जून दाद दिली आहे.

आशय आणि निर्मिती या दोन्ही आघाडय़ांवर राजहंस प्रकाशनाने आपला वैशिष्टय़पूर्ण ‘राजहंसी’ ठसा उमटवला आहे. राष्ट्रपती पदक, साहित्य अकादमी अन् राज्य शासनाच्या असंख्य पुरस्कारांपासून अखिल भारतीय प्रकाशक संघटनेच्या देशपातळीवरील निर्मितीविषयक पुरस्कारांपर्यंत विविध शासकीय अन् संस्थात्मक पुरस्कारांनी दिगमा स्वतः आणि राजहंसची अनेक पुस्तके सन्मानित झाली आहेत. निरनिराळय़ा विषयांमधील अधिकारी तज्ञ आणि रसिक वाचकवृंद या दोन्ही वर्गांनी राजहंसच्या पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. वितरण क्षेत्रातील अनेक अभिनव उपक्रम, ‘राजहंस’च्या महाराष्ट्रभर उघडलेल्या शाखा अन् प्रत्येक ठिकाणी घट्ट पाय रोवून काम करणारे ‘राजहंस’चे स्थायी प्रतिनिधी ही दिगमांनी केलेली कल्पक उभारणी.

ही प्रदीर्घ वाटचाल करत असताना अगदी 1966 पासून आजतागायत असा एकही लहानमोठा प्रसंग नसेल अशी एकही आनंदाची वा कसोटीची घडी नसेल ज्यावेळी दिगमांना त्यांच्या ‘श्रीभाऊ’ची आठवण झाली नाही. व्यक्तिगत संभाषण असो वा एखादा जाहीर कार्यक्रम- ‘श्रीभाऊ’ची आठवण झाली की एरवी संयत असणारे दिगमा काहीसे हेलावतात, कातर मन स्वरातही डोकावू लागते. मग एखादे हलके, मिष्कील विधान करून ते सफाईने स्थिरावतातही, पण ‘श्रीभाऊ’ कायमचे त्यांच्या मनाचा हळवा कोपरा व्यापून बसले आहेत. म्हणूनच आपल्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी आपल्या श्रीभाऊबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक वेगळी कल्पना राबवली.

श्रीगमांनी आयुष्यभर आपल्या चिंतनातून, विचारांतून अन् लेखनातून सतत राष्ट्रवाद, ग्रामविकास, राष्ट्रउभारणी अशा विषयांचा वेध घेतला. त्या जोडीलाच एका हातात शास्त्रकाटय़ाची कसोटी, तर दुसऱया हाती कलाकमलाची रमणीयताही महत्त्वाची मानली. त्यांना सर्वार्थाने रस असलेल्या क्षेत्रांशी संबंधित संस्थांची निवड करून श्रीगमांच्या नावे असलेला हा स्मृतिविधी संस्थांना आदराने व स्नेहपूर्वक देत मनातील कृतज्ञभाव प्रतिकरूपाने व्यक्त करावा असे दिगमांनी ठरवले.