लेख : ठसा : डॉ. रामदास गुजराथी

1590

>> ज्योती कपिले

डॉ. रामदास गुजराथी अर्थात गुजराथी सर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. गुजराथी सर हे नाशिक जिह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा या खेड्यात जन्मले. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या आईवडिलांच्या सन्मानार्थ त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये एम.कॉम , पीएच.डीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नाशिकच्याच त्याच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बी. वाय. के. कॉलेजमध्ये अध्यापक, प्राध्यापक म्हणून आपली शैक्षणिक कारकीर्द सुरू केली. त्याच सुमारास नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमाला सुरू झाली. त्या व्याख्यानमालेचे ते कार्याध्यक्ष होते.

अत्यंत मनोभावे सरांनी व्याख्यानमालेचे काम सुरू केले. गुजराथी सर नाशिकला असताना कवी कुसुमाग्रज यांच्या लोकहितवादी मंडळाचे खजिनदार, कार्यवाह, कार्याध्यक्ष म्हणून तसेच 1973मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीच्या नाशिक शाखेत त्यांनी उत्तम प्रकारे काम केले. बदलत्या काळातील संदर्भ आणि मूल्ये लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख व्यापार कसा करता येईल, त्याचबरोबर समाजात सन्मान कसा प्राप्त करता येईल यासाठी त्यांनी  विक्रय विद्या वर्ग योजना आयोजित करून उत्तर महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांतून व्यापारांचे  प्रशिक्षण वर्ग घेतले, व्यापारीवर्गाच्या अडीअडचणी समजून घेऊन वर्तमानपत्रांतून अनेक लेख लिहून महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून दखल घ्यायला लावली. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत विद्यार्थी ते प्राचार्य म्हणून त्यांनी मजल गाठली ते केवळ त्यांच्या शिस्तबद्ध, न्यायप्रिय, गुणग्राहक वृत्तीमुळेच. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने तरीही तेवढय़ाच मोकळ्या मनाने त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. तसेच विद्यार्थ्यांना बदलत्या जगाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांची कॉलेजमध्ये व्याख्याने आयोजित केली. शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था काढून सरांनी आपल्या कॉलेजच्या सर्व स्टाफला आश्वस्थ करून त्यांच्या प्रगतीकडेही लक्ष पुरविले.  मुंबई विद्यापीठातर्फे 21 वर्षांत 21 परिसंवाद आयोजित करणारे कॉलेज म्हणून तसेच Academy ऑफ हायर लार्ंनग असा नावलौकिक सरांच्या मार्गदर्शनामुळे गोखले कॉलेजला मिळाला. ईशान्य हिंदुस्थानात शैक्षणिक कार्य करणाऱ्या ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्याची प्रेरणा गुजराथी सरांचीच होती. त्यांनी शिक्षणामध्ये सीमाबंध विस्तारले होते त्यामुळे गोखले कॉलेजमध्ये विविध राज्यांतून प्राध्यापक वर्ग शिकविण्यासाठी येत होते. तसेच नागा विद्यार्थ्यांनाही त्यांनी आपल्या कॉलेजचे, घराचे दार उघडून दिले होते. जेणेकरून शिक्षणाद्वारे त्या नागा विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचे दरवाजे उघडतील.

मुंबई ग्राहक पंचायतीच्या बोरिवली शाखेचे काम बघत असताना त्यांनी केलेल्या चौफेर कामगिरीमुळे ते मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष, अध्यक्ष झाले. समाजाचे आपण देणे लागतो ही भावना त्यांनी स्वतःइतकीच आपल्या सहकाऱ्यांमध्ये रुजवली. सरांची धोरणे, नियोजनपूर्वक वाटचाल आणि उपक्रमातील सातत्य यामुळे  त्यांनी ग्राहक चळवळीस एक आकार मिळवून दिला. गुजराथी सरांच्या कार्याला पावती म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा  ‘कर्तबगार ज्येष्ठ नागरिक’ पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. तसेच  रोटरी क्लब ऑफ बोरिवलीतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. गुजराथी सर ‘सह्यगिरी ट्रेकर्स’ या संस्थेचे अध्यक्ष होते आणि या संस्थेच्या पायभरणीत त्यांचे निवृत्त असूनही अद्भुतपूर्व योगदान होते. प्रत्येक जीवनानुभवाला सर आनंदाने सामोरे गेले. ते सतत माणसे जोडत गेले पण त्यांनी कधीच तडजोड केली नाही. नेहमीच स्वाभिमानाने जगले. गुजराथी सरांचे वाचन अफाट होते. त्यामुळे साहित्य सेवेचा वसा चालविण्यासाठी त्यांनी ‘श्री अक्षरधन’ या त्रैमासिकाची स्थापना केली. त्याचा उपयोग त्यांनी नवोदित आणि सन्माननीय लेखकांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, स्त्राr साहित्याला सन्मान मिळवून देण्यासाठी आणि कथा-कवितेचा प्रसार करण्यासाठी केला. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व नुकतेच काळाच्या पडद्याआड गेले.

 

आपली प्रतिक्रिया द्या