
>> देवानंद गरड
भौतिक सुखाच्या मागे धावणाऱया जगात आपण समाजाचे काही देणे लागतो, या विचाराने काम करणाऱयांची संख्या तशी तोकडीच. मात्र त्यालाही छेद देणारी माणसं, संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यामुळेच जग चालते, असेच म्हणावे लागते. त्यात संभाजीनगरतील रमेशअण्णा मुळे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा बाजूला काढून तो समाजातील गोरगरीबांसाठी, दीनदुबळय़ांसाठी खर्च करण्याचा विडा त्यांनी उचलला असून यातून त्यांनी अनेकांना मदत केली आहे. त्यांचे कार्य निश्चितच अनुकरणीय आहे.
रमेशअण्णा मुळे यांनी मुळे अण्णा फाऊंडेशनची स्थापना केल्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यांनी फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना अन्नधान्य वाटप, निराधार, दीनदुबळय़ांसाठी आर्थिक मदत, दवाखान्यातील रुग्ण-नातेवाईकांसाठी जेवणाचा डबा देण्याबरोबरच वाहनाची सोय करून त्यांना आपल्या गावी पोहचविणे, अशा पद्धतीची निःस्वार्थ सेवा केली आहे. कोरोनाच्या संकटात त्यांनी या कार्याला अधिक गती दिली आहे. फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र राज्य पातळीवर असून सध्या ते संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा या तीन जिह्यांत प्राधान्यक्रमाने कार्य करीत आहेत.
रमेशअण्णा मुळे हे बुलढाणा जिह्यातील उदनापूर येथील मूळ रहिवासी. घरची परिस्थिती खूपच हलाखीची. त्यामुळे त्यांना दहावीच्या पुढे शिक्षणही घेता आले नाही. ते कर्माला दोष देत गप्प बसले नाहीत. बुलढाणा जिह्यातील लोणार येथे कापड दुकानात नोकरी करत राहिले. यादरम्यान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मेहकर दौऱयावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते अनेकांचा सत्कार झाला. आपलाही असाच सत्कार व्हावा अशी मनोमन इच्छा बाळगून इच्छापूर्तीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. कापड दुकानातील नोकरी सोडून संभाजीनगर गाठले. नोकरीची शोधाशोध करत असताना विविध कंपन्यांना मजूर पुरविण्याचे कंत्राट घेण्यास सुरुवात केली. त्यात त्यांचा बऱयापैकी जमही बसला. पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली. मात्र हे सर्व काही मिळाल्यानंतर माणसं बदलतात, त्याला रमेशअण्णा मुळे अपवाद ठरले.
आपण समाजाचे काही देणे लागतो हीच भावना कायम स्मरणात ठेवून आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचे धोरण रमेशअण्णा मुळे यांनी स्वीकारले. त्यांचे आई-वडील हे आध्यात्मिक आणि धार्मिक विचारांचे होते. त्याच विचारांचा पगडा रमेशअण्णांच्या मनावर बिंबला गेला. त्यामुळे ते समाजातील गोरगरीब, दीनदुबळय़ांना मदतीचा हात देत आहेत. त्यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी दामोधर मुळे, आशा रमेश मुळे, समाधान बहाद्दुरे, गया दामोधर मुळे, नंदकिशोर मुळे आणि सुखदेव मुळे यांना घेऊन ‘मुळेअण्णा फाऊंडेशन’ची स्थापना केली. फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र तसे राज्यभर असले तरी त्यांनी संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा जिह्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. या तीनही जिह्यांतील गरजवंतांना हरएक प्रकारे मदतीचा हात देत आहेत. फाऊंडेशनच्या स्थापनेनंतर वर्षभर हेच कार्य सुरू ठेवले. यादरम्यान सुमारे कोटींची मदत केली.
दुर्दैवाने गेल्या मार्च महिन्यात महाराष्ट्रासह देशाला कोरोना संकटाने गाठले. कोरोना संकटाचा मुकाबला केवळ शासन करू शकत नाही, अशा परिस्थितीत निःस्वार्थ भावनेने काम करणाऱया व्यक्ती, सामाजिक संस्थांनी पुढे येणे अपेक्षित आहे, तशा संस्था पुढे येताहेत. त्यातूनच महासंकटावर मात करण्याचे बळ मिळते, हेच मुळे अण्णा फाऊंडेशनने उचललेला मदतीचा खारीचा वाटा हे त्याचेच एक द्योतक म्हणावे लागेल. या फाऊंडेशनच्या माध्यमातून वर्षभर संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा जिह्यात मदतयज्ञ सुरू आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून गोरगरीबांना अन्नधान्य पुरविणे, बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱयांना नाश्ता, पाणी, सॅनिटायझरचे वाटप करणे याला प्राधान्यक्रम दिला आहे. याशिवाय मंदिर, शाळाखोल्या बांधकामासाठी आर्थिक मदतही केली जात आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये अधिकाधिक सोयीसुविधा पुरविण्यासाठी हातभार लावण्याचे काम फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जाते. त्यासाठी आजपर्यंत 3 कोटींचा खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत हा मतदयज्ञ सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणच फाऊंडेशनच्या या सामाजिक कार्याची दखल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रमेशअण्णा यांचा ‘मातोश्री’वर सत्कार करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्तेही रमेशअण्णांचा गौरव करण्यात आला. ही त्यांना मिळालेल्या सामाजिक कार्याची पावती आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
जन्मतः अंध, अपंग तसेच विविध व्यंग असलेल्यांना समाज स्वीकारत नाही, आई-वडील आणि नातेवाईकही सांभाळत नाहीत. अशा दीनदुबळय़ांचा ‘वाली’ होण्याचे धोरण मुळे अण्णा फाऊंडेशनने स्वीकारले आहे. त्यासाठी संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा जिह्यातील निराधार दीनदुबळय़ांचा सर्व्हे करण्यात आला आहे. अशांची संख्या तीन हजारांवर आहे. त्यासाठी सिंदखेडराजा येथे आश्रम उघडण्याचे नियोजन केले आहे, असे रमेशअण्णा मुळे यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांच्या भेटीने भारावलो…
शालेय जीवनात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहकर येथे झालेल्या भेटीने आपण भारावून गेलो होतो. आपल्या हातून मोठे कार्य घडावे अन् आपलाही सत्कार व्हावा अशी खूणगाठ मनी बांधून आपण सामाजिक कार्याला झोकून दिले. त्याचे फलित म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच आपला ‘मातोश्री’वर झालेला गौरव होय, असे भावोद्गार रमेशअण्णा मुळे यांनी काढले.





























































