
वातावरणातली उष्णता वाढायला लागलीय. कारणं अनेक आहेत. त्यावर चर्चाही होतच असतात. मुळात सध्याचा काळ पृथ्वी सूर्याच्या ‘जवळ’ जाण्याचा. 4 जुलैला पृथ्वी तिच्या लंबवर्तुळाकार कक्षेत उपसूर्य किंवा सूर्याच्या सर्वात जवळ असेल. म्हणजे प्रतिवर्षी हाच काळ सर्वाधिक उन्हाळ्याचा. मात्र आपल्या देशाला मिळालेले निसर्गाचे ‘वरदान’ असे की, जूनपासून तुफान पाऊस पडत असल्याने, सूर्याच्या उष्णतेपासून वाचवणारे मेघांचे ‘कवच’ आपल्याला लाभते. त्या आधीचे दोन-अडीच महिने म्हणजे मार्चच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या अखेरपर्यंत उन्हाचे चटके बसतच राहणार.
परंतु याच काळात ‘ऊन पिऊन’ फुलणारी लाल फुलांची काही झाडं वनश्रीची शोभा वाढवतात. त्यांच्या उष्णता-ग्रहणाच्या शक्तीबरोबरच थंडावा देण्याच्या औदार्याचंही आपण कौतुक करायला हवं. साधं कलिंगडाचे विशाल फळ पहा ना. सध्या महामार्गावर या उष्णताशामक फळांचे ढीग लागलेले दिसतील. पाणेरी काकड्यांचीही विप्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल. निसर्ग त्याच्या पद्धतीने जीवनमानाचा समतोल, निर्हेतुकतेने साधतो तो असा. तर याच काळात फुलणारे आणि मऊशार तंतुमय कापसाची बरसात करणारे डेरेदार झाड म्हणजे सावर. या सावराचा कापूस त्यापासून विलग होऊन उडायला लागला की उडत्या शुभ्र ‘म्हाताऱ्यां’चे पुंजके आम्ही बालपणी गोळा करायचो. मुंबईसारख्या शहरात आणि शहराबाहेरच्या डोंगरभागात तर सावरीची काटेरी झाडं कितीतरी दिसायची. आजही मुंबईतल्याच घराच्या खिडकीतून दूर टेकडीवरची एखादी ‘सावर’ नजरेत भरते. पूर्वी आमच्या राजावाडीत अशी बरीच झाडे होती, म्हणून त्यांचा जवळून परिचय झालेला होता. एकदा सावरीचा बराचसा (किलो-दोन किलो) कापूस गोळा करून त्याची उशी बनवली. तेव्हा आजी म्हणाली. ‘थंड असतो सावरीचा कापूस. पण एखाद्याचे डोके सावरीच्या उशीने जड होऊ शकते.’ आम्हाला वाटायचं ती उगाच काहीतरी सांगतेय. पण ते खरे होते. त्या काळात घराघरात, सभोवतालच्या झाडापानांची गुणवत्ता ठाऊक असणारी, घराभोवतीच्या अंगणातल्या फुलझाडांवर आणि वाडीतल्या माडांवर प्रेम करणारी माणसे होती.
सावरीच्या कापसाला बोटॅनिकल किंवा वनस्पती शाखातले नाव आहे बॉम्बॅक्ससीना. एरवी त्याला इंग्लिशमध्ये रेड सिल्क पिंवा मलबार- कॉटन या नावाने ओळखतात. संस्कृतमध्ये या झाडाचा उल्लेख प्राचीन वाङ्मयातसुद्धा येतो. विषुववृत्ताच्या आसपासच्या उष्ण आणि त्यापलीकडच्या समशीतोष्ण कटिबंधात ही झाडे अनेक देशांत आढळतात. ऑस्ट्रेलियापासून ते चीन-तैवानपर्यंत त्यांची वाढ होताना दिसते.
सावरीचे साधारण वीस मीटर उंच वाढणारं झाड. हिरव्यागार पानांचे, अंगभर असणाऱया काटय़ांचं आणि एखाद्या पुपीच्या (कॅप्सुल) आकाराच्या लालचुटूक फुलांचे असते. त्याच्या बहराच्या काळात स्वसंरक्षणासाठीचे काटे अधिकच तीक्ष्ण असतात. त्यामुळे या झाडावर जाऊन फुलं पिंवा कापूस काढणं कठीण. या कापसाच्या मधोमध छोटी ‘बी’ असते. पुनरुत्पादनासाठी तीच बी फुलातून, कापसाच्या अंतरात घडून बाहेर पडते. कापसाचे तंतू वाऱ्यावरून लांबपर्यंत या बिया नेतात आणि कालांतराने त्या तिथेच रुजतात. स्वतःलाच जगवण्याची नव्हे, तर पुढच्या ‘पिढ्यां’चीही सोय निसर्गातील अनेक सजीव अनेक युक्त्या वापरून करत असतात. सावरीचा कापूस अतिशय मऊ आणि रेशमासारखा वाटतो. मधली ‘बी’ काढून उरलेला कापूस यंत्रात (किंवा हाताने) पिंजून त्याच्याच गाद्या, उशा बनवल्या जातात. त्यांचा गुणधर्म थंडावा देणे हा असल्याने त्यांना उन्हाळय़ात विशेष मागणी असते. सावरीचा उत्तम कापूस पाचशे रुपये किलोनेही विकला जातो. अर्थात, नेहमीच्या कापसाला जेवढी मागणी असते तेवढी या कापसाला आपल्याकडे तरी नसते. म्यानमार, नेपाळ, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स आणि चीनमध्येही सावराची मोठी लागवड होते. आपल्याकडे तशी व्यापक लागवडीची ‘सावराई’ (आमराईप्रमाणे) पाहिल्याचे आढळत नाही. हिंदीत या झाडाला ‘सेमल’ म्हणतात.
सावरीच्या कापसाचे ‘शीत’ किंवा नैसर्गिक थंडावा देणारे बिछाने जसे बनवले जातात, तसेच या कापसाच्या विणकामातून कापडसुद्धा तयार होते. थायलॅण्डमध्ये तर यातील शुष्क गाभा ‘सूप’ बनवण्यासाठी वापरतात म्हणे. या ‘शाल्मली’ वनस्पतीचा शीत गुणधर्म आयुर्वेदाला पूर्वापार ठाऊक आहे. त्याचा काढा बनवला जातो. तो काही विकारांवर उपयुक्त असून तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच घेणे योग्य ठरते. याशिवाय सावरीची फळं. मधमाश्यांची आवडती असतात. या काटेरी झाडाचा गोंद (डिंक) काढणे सोपे नसते, पण त्याचीही उपयुक्तता खूप आहे.
10 ते 15 सेंटीमीटर वाढणारी सावरीची पानं हिवाळ्यात पानगळ होऊन पडून जातात. त्यावेळी सावरीचे काटेरी खोड आणि फांद्या भेसूर दिसतात. पण वसंत ऋतुमध्ये (चैत्र वैशाख) त्याला पुन्हा बहर येतो. तोच सध्याचा काळ. पुतूहल म्हणून आसपासच्या प्रदेशातली ‘सावर’ शोधण्यासाठी (उन्हापासून बचाव करत) थोडी जंगलभ्रमंती करायला हरकत नाही. सभोवतीचा निसर्ग आपल्याला खुणावत असतो. वृक्षवल्ली त्यांच्याजागी स्थिर राहून प्रवाशांना, फुलं, फळं, सावली देतात. आपण कधीतरी त्यांच्याकडे जाऊन त्यांची ओळख करून घ्यायला हवी. विज्ञान तर सर्वत्रच भरलेले आहे. जितके ते ‘सायबर’मध्ये, तितकेच एखाद्या ‘सावर’ झाडामध्येही!
>> विनायक




























































