देखणे न देखणे – ये हृदयीचे ते हृदयी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मीनाक्षी पाटील ([email protected])

कोणत्याही कला क्षेत्रातील एखादी सर्जनशील व्यक्ती असो किंवा कोणत्याही प्रदेशातील एखादा आस्वादक असो, ते दोघेही एका व्यापक अर्थाने विशाल वैश्विक सांस्कृतिक व्यवस्थेचा एक छोटासा का होईना, पण घटक असतात. या अर्थाने वेगवेगळ्या संस्कृतींमध्येएक आंतरिक जोडलेपण कायम असते आणि ते उमटत राहते.

कलावंत, कलाकृती व आस्वादक यांच्यातील नातं समजून घेण्यासाठी आपल्याला सर्जनप्रक्रियेचे स्वरूप समजून घ्यावे लागते. मागील लेखात आपण पाहिले त्याप्रमाणे बाह्य निसर्ग आणि सर्जनशील मनातल्या निसर्गाच्या परस्पर संवादातून जशी कलाकृती आकार घेते अगदी त्याचप्रमाणे कलाकृती व आस्वादक यांच्यातील सहसर्जक संबंधातूनही कलाकृतीला अर्थाकार प्राप्त होतो. याचाच अर्थ कलावंत आणि आस्वादक या दोघांनाही अभिव्यक्ती आणि आस्वादाच्या पातळीवर सर्जनशील असावेच लागते. कोणताही  कलावंत हा जीवन जगताना असंख्य अनुभवांना सामोरा जात असतो. अशा अनंत अनुभवांचा त्याच्या सर्जनशील मनावर जो काही सूक्ष्म स्तरावर  परिणाम होतो त्यातून त्याच्या कलाकृतीस आकार प्राप्त होत असतो. थोडक्यात, कलावंत जे काही अनुभव घेत असतो त्या अनुभवांची सर्जक अभिव्यक्ती तो आस्वादकासाठी खुली करतो.

या सर्जक प्रक्रियेमध्ये अशा रीतीने कलावंताचा अनुभव हा आस्वादकाचा अनुभव होतो. येथे अनुभवाच्या स्तरावर कलावंत व आस्वादक यांच्यातील ‘मी’ आणि ‘तू’ हा भेदच लय पावतो. इथेच कलाकृतीतील ‘लय’ संकल्पनेचा उगम होतो असे म्हणता येईल. अशाप्रकारे कलाकृतीच्या निर्मितीप्रक्रियेत लयबद्ध भावानुभवाला विशेष महत्त्व प्राप्त होते. मग तो अनुभव रंगरेषांचा, शब्दांचा, स्वरांचा वा कोणत्याही कलेशी संबंधित असो. इथे कलावंताचा अनुभव व आस्वादकाचा अनुभव एकरूप होऊन कलारूप आकाराला येते. या प्रक्रियेचा सूक्ष्म स्तरावर विचार केला तर असे लक्षात येते की, कलावंत जेव्हा एक व्यक्ती म्हणून कोणतेही अनुभव घेत असतो त्यावेळी त्या क्षणांना तो स्वतच रंग, शब्द, स्वर इ. या कला माध्यमांसारखाच  एक ‘कला माध्यम’ झालेला असतो. अशाप्रकारे अनुभव घेणारी, अनुभवाला आकारणारी एक व्यक्ती या अर्थाने ‘माध्यम’ म्हणूनही कलावंताचा विचार करावा लागतो. समाजात, निसर्गात वावरणारी व्यक्ती जन्मापासून असंख्य अनुभवांचं संचित जमा करीत असते. या अनुभवांचं संचित जमा होताना स्वीकार-नकार-विरोध अशा बऱयाच प्रक्रियांमधून आतून- बाहेरून असं सर्वांगाने व्यक्तित्त्व घडत असतं.

निसर्गात काय किंवा समाज-संस्कृतीत किंवा एकूणच या विश्वव्यवस्थेत ही ‘घडण्याची’ प्रक्रिया अखंडपणे सुरू असते. या सर्व प्रक्रियेला एक व्यक्ती म्हणून ‘कलावंत’ व ‘आस्वादक’ या दोघांनाही सामोरे जावे लागते. कोणत्याही कला क्षेत्रातील एखादी सर्जनशील व्यक्ती असो किंवा कोणत्याही प्रदेशातील एखादा आस्वादक असो, ते दोघेही एका व्यापक अर्थाने विशाल वैश्विक सांस्कृतिक व्यवस्थेचा एक छोटासा का होईना, पण घटक असतात. या अर्थाने वेगवेगळ्या संस्कृतींमध्येही जरी स्पष्ट दिसत नसले तरी एक आंतरिक जोडलेपण असते. यामुळेच कोणत्याही दोन संस्कृतींमध्ये जसा संवाद दिसतो, तसाच संघर्षही. याचप्रकारे संवाद किंवा संघर्ष दोन व्यक्तींमध्येही असतो. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतींचे मूल्यमापन करताना बऱयाचदा त्या त्या संस्कृतीमध्ये कशाप्रकारची कलानिर्मिती झाली आहे हे विचारात घेतले जाते. वेगवेगळ्या संस्कृतीतील समाजजीवनातून कला निर्माण होते असे मानले जात असल्यामुळे त्या त्या संस्कृतीचा प्रभाव त्या त्या कलेत महत्त्वाचा मानला जातो. परंतु प्रत्यक्षात मात्र कलाकृती ही देश काल परिस्थिती व समाज संस्कृतीच्या सर्व दृश्य-अदृश्य मर्यादा ओलांडून वैश्विक पातळीवर सर्व संवेदनशील आस्वादकांना भरभरून आनंद देत असते.

कलावंत ज्या संस्कृतीत  आणि देशकाल परिस्थितीत जन्मतो, वाढतो त्या त्या परिसरातील जीवनानुभव त्याच्या कलाकृतीतून व्यक्त होत असतात. या जीवनानुभवाला कलाकृतीतून व्यक्त  करताना आस्वाद्यता देणे हे कलासर्जक म्हणून कलावंताचे मुख्य काम असते. तरच कलावंताचा अनुभव हा आस्वादकाचा अनुभव होऊ शकतो. या दृष्टिकोनातून पाहिल्यास कोणत्याही सर्जक किंवा आस्वादक व्यक्तित्वाला आलेला अनुभव हा केवळ त्या व्यक्तीचा म्हणण्याइतका एकटय़ाचा असत नाही तर त्या अनुभवाला एक साधारणीकरण प्राप्त झालेले असते. अशा रीतीने निर्मितीप्रसंगीचे कलावंताचे व्यक्तित्व तर आस्वादप्रसंगी आस्वादकाचे व्यक्तिमत्त्व लय पावल्याने अनुभवाचे ‘साधारणीकरण’ घडून येते. देश, काल आणि परिस्थितीची जी बंधने मानवी जाणिवेवर असतात ती कलानुभवात पूर्ण गळून पडल्यावरचं जे एक विशुद्ध, व्यक्तिनिरपेक्ष विश्वव्यापी असं भान निर्माण होतं ते या ‘साधारणीकरण’ शब्दात एकवटलेलं आहे.

कलाकृती आकारताना कलावंताची एक समतोल अशी मनस्थिती झालेली असते आणि कलास्वादात याच समतोल मनस्थितीचा अनुभव आस्वादक कलाकृतीशी एकरूप होऊन घेत असतो. याचा अर्थ ‘साधारणीकरण’ ही कलावंताची सर्जनकालीन तर रसिकाची आस्वादकालीन अशी आंतरिक अवस्था असते. या अवस्थेसाठी भारतीय साहित्यशास्त्रात सात्त्विकी, सुमनस, संभावन, सहृदयता, साधारणीकरण यासारख्या संज्ञा तर पाश्चिमात्य साहित्यशास्त्रात ‘एम्पथी’, मानसिक अंतर, अमानवीकरण, हेतुशून्य हेतुगर्भता अशा संज्ञा वापरलेल्या आहेत. थोडक्यात भारतीय तसेच अभारतीय विचारवंतांनी सर्जन व आस्वाद प्रक्रियेचा विचार करताना काहीप्रमाणात संवादी अशा संकल्पना मांडलेल्या दिसतात. या साधारणीकरणातच कलानिर्मिती आणि कलास्वाद याचे मर्म दडलेले आहे.

(लेखिका साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव, कवयित्री, चित्रकार आहेत.)