मुद्दा : सेवानिवृत्ती एक वरदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शरद जोशी

सेवानिवृत्त झाल्यावर किंवा व्हीआरएस घेतल्यावर पुढे काय करायचे? असा प्रश्न अनेकांना पडत असतो, मात्र करणाऱयांना अनेक पर्याय उपलब्ध होतात. तसाच एक पर्याय ‘साथ साथ चॅरिटेबल्स ट्रस्ट’ या संस्थेने उपलब्ध करून दिला आहे. आयुष्याचा उत्तरायणाचा काळ आनंदात, समाधानात आणि उत्तम आरोग्यपूर्ण व्हावा ही सर्वांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. ‘साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था त्यासाठीच काम करते.

‘साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट’ही नोंदणीकृत सामाजिक संस्था असून समाजातील दुर्बल, मागास व वंचित घटकांसाठी ग्राम विकासाचा ‘विवेकानंदालय’ हा मोठा प्रकल्प उभारत आहे. गुहागर तालुक्यात हे मोठे कार्य उभारण्यासाठी वेळणेश्वरच्या जोशी कुटुंबीयांनी त्यांची 21/2 एकर जमीन या प्रकल्पास दिली आहे. संस्था शिक्षण, आरोग्य शेती, रोजगार निर्मिती तसेच महिला प्रबोधन व सक्षमीकरण यावर काम करत आहे.

सद्यपरिस्थितीत सामाजिक कार्य निःस्वार्थी भावनेने करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अभाव जाणवतो. नवी पिढी त्यांच्या जीवनात त्यांची ध्येये साध्य करण्यात व्यस्त आहे. त्यांना इच्छा असूनही सामाजिक कार्याला वेळ देणे शक्य नाही. सध्या एकत्र कुटुंब पद्धती समाप्त झालेली दिसते. शहरात राहणाऱया ज्येष्ठांना एकटे राहणे कंटाळवाणे व असुरक्षित वाटते. यावर ट्रस्टने सुंदर पर्याय शोधला आहे.

आज प्रत्येकाचे आयुर्मान वाढलेले आहे. निवृत्तीनंतर 20-25 वर्षे आयुष्यात भरीव कार्य करायला उपलब्ध असतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरात आयुष्यभर नोकरी केल्यावर उत्तरायणातील आपले दिवस समवयस्कांसमवेत आनंदाने जगावयास मिळावेत असे अनेकांना वाटते. रिकामे राहिल्यास अनेकविध व्याधी मागे लागतात. अशा ‘रिटायर्ड बट नॉट टायर्ड’ व अनुभवसंपन्न लोकांनी आपली निवृत्ती ही वरदान समजून समाजासाठी असलेल्या कर्तव्यपूर्तीच्या समाधानात व्यतीत करावी. आयुष्यभर आपण आपल्या कुटुंबासाठी कष्ट उपसले अथवा कर्तव्यपूर्तीत मग्न होतो. आता आपली सेकंड इनिंग ही समाजाप्रति व्यतीत करून आपले जीवन परिपूर्ण करावे यासाठी ट्रस्टने एक नामी संधी उपलब्ध केली आहे.

संस्था लवकरच लोटे परशुराम येथे साक्षात परशुरामाच्या पावन भूमीत म्हणजेच परशुराम मंदिराजवळ ‘संस्थान भार्गवराम परशुराम ट्रस्ट’ने उभारलेल्या वानप्रस्थाश्रमाच्या इमारतीत ‘विवेकानंदालय’ हा ग्राम विकास प्रकल्प नोव्हेंबरमध्ये आपल्या सहकार्याने साकारत आहे. एकूण 20 खोल्यांमध्ये 30/35 ज्येष्ठ राहून मंदिराची सेवा तसेच आसपासच्या गावातील लोकांचा सर्वांगीण विकास करायला हातभार लावतील. ज्येष्ठ एका निसर्गरम्य व प्रदूषणमुक्त वातावरणात राहून आपल्या पसंतीच्या तसेच आवडीच्या कामात व्यग्र असतील. ज्यांची मुले परदेशात आहेत असे पालक या योजनेत सामील होऊन आपल्या अनेक समस्यांचे निराकरण करू शकतात. मुलांना मदत हवी असल्यास अथवा त्यांना भेटावयाचे असल्यास महिना – दोन महिने परदेशात राहून परत या कार्यात सामील होऊ शकता.

संस्थेने वेळणेश्वर व परशुराम या दोन्ही प्रकल्पांची माहिती देण्यासाठी 21 ते 24 जून या कालावधीत वेळणेश्वर येथे शिबीर आयोजित केले आहे. तसेच 29 ऑगस्ट रोजी ‘विलेपार्ले’ येथे ‘उत्कर्ष मंडळ’ सभागृहात सकाळी 9 ते 5 या वेळेत ज्यांची मुले परदेशात आहेत त्यांच्यासाठी एका खास सभेचे आयोजन केले आहे.

(लेखक साथ साथ चॅरिटेबल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.)

[email protected]