
>> डॉ. मंजिरी भालेराव ([email protected])
छत्रपती संभाजीनगर जवळील शिल्पसमृद्ध पितळखोरा लयनसंकुलातील जलव्यवस्थापन आजच्या अद्ययावत तंत्रज्ञानालाही खुजे ठरवणारे आहे. या लेण्यांमधील कोरीवकामाच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दरवाजाजवळच्या भिंतीत असलेले नागाच्या शिल्पाच्या रूपातील कारंजे. ही शैलगृहं साकारणारे स्थपती, कारागीर आणि निर्मितीच्या खर्चाचा भार उचलणारे प्रायोजक यांच्या जिद्दीला वा कल्पकतेला दाद द्यायला हवी.
प्राचीन भारतातील बांधीव बौद्ध स्थापत्य हे त्यांच्या वेदिकेवरील कथनशिल्पांसाठी जगप्रसिद्ध आहे. परंतु तशा प्रकारची कथनशिल्पे बौद्ध शैलगृहात सहसा आढळत नाहीत. याला अपवाद असलेले एक स्थळ म्हणजे पितळखोरा. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे येथील चैत्यगृह आणि विहार यांच्या समोरील अंगणात केलेल्या सफाई कार्यानंतर मातीखाली दडलेले अनेक शिल्पावशेष उजेडात आले. त्यामध्ये काही कथनशिल्पे होती तर काही सुटय़ा एकेकटय़ा मूर्ती होत्या.
चैत्यगृहाशेजारील विहाराकडे जाण्यासाठी 9 हत्तींच्या शेजारून एक मोठा जिनाच दगडात कोरलेला सापडला. जिन्याच्या दरवाज्याच्या द्वारशाखेवर सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. त्या दरवाज्याचा दोन्ही बाजूला शस्त्रसज्ज द्वारपाल कोरले आहेत. दरवाज्याच्या वरच्या बाजूला हत्तींच्या सोंडेत धरलेल्या घटातून जिच्यावर पाण्याचा अभिषेक होतो आहे, अशी सृजनता आणि समृद्धीचे प्रतीक असलेली पृथ्वी आणि तिच्यावर पावसाचा अभिषेक करणारे मेघ, हे रूपक दर्शविणारी, कोणत्याही धर्माच्या सीमेपलीकडे असलेली, आज गजलक्ष्मी नावाने प्रसिद्ध असलेली देवी कोरली होती. दगड ठिसूळ असल्याने ते शिल्प आपल्या जागेवरून तुटून खाली पडलेले सापडले. पण मूळ जागी आजही अजून दोन कोरलेले हत्ती शिल्लक आहेत. हे देखणे शिल्प आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात जतन करून ठेवले आहे.
छत्रपती संभाजीनगर जवळील पितळखोरा लयनसंकुलातील या आणि अशा अनेक शिल्पांच्या व्यतिरिक्त या स्थळाचे वैशिष्टय़ म्हणजे इथले अभूतपूर्व जलव्यवस्थापन. याचे उत्तम उदाहरण हे म्हणजे वर उल्लेख केलेल्या दरवाज्याजवळच्या भिंतीत असलेले नागाच्या शिल्पाच्या रूपातील कारंजे. हे कारंजे म्हणजे प्राचीन भारतीय स्थपती, कारागीर आणि या सर्व शैलगृहांच्या निर्मितीच्या खर्चाचा भार उचलणारे प्रायोजक यांचे संकटावर मात करण्याच्या जिद्दीचे, कल्पकतेचे आणि खडकात कोरीव काम करणाच्या कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. विहाराचे काम चालू असताना त्याच्या छतामध्ये, निसर्गतच एक प्रचंड मोठे खिंडार आहे असे त्यांच्या लक्षात आले. पावसाळ्यात त्यातून प्रचंड मोठय़ा प्रमाणात पाणीही गळते हे त्यांनी पहिले. विहाराचे काम अर्धवट सोडणे शक्य नसल्याने त्यांनी आपल्या बुद्धी आणि अनुभवाच्या जोरावर या मोठय़ा संकटावर अतिशय हुशारीने मात केलेली दिसून येते. छतातून पडणारे पाणी गोळा करण्यासाठी त्यांनी त्या खिंडाराखाली एक मोठा खड्डा केला. त्या खड्डय़ात साठलेले पाणी इकडेतिकडे वाहू नये म्हणून त्यातून एक पन्हाळ किंवा पाणी वाहण्यासाठीचा मार्ग तयार केला. तो सरळ दगडात कोरलेल्या जिन्यापर्यंत नेऊन तसाच एक मार्ग जिन्याच्या भिंतीत कोरून काढला आणि तो खालच्या अंगणापर्यंत नेला. तिथे दरवाज्याजवळच्या भिंतीत एक पाच फण्यांचा नागराज कोरला. त्याच्या फण्यांमध्ये अशी छिद्रे कोरली की त्यामध्ये भिंतीत कोरलेल्या मार्गाने पाणी येईल आणि गुरुत्वाकर्षणामुळे तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या दाबाने नागांच्या फण्यातून कारंजे उडेल. मुळात अशा प्रकारची कल्पना करणेच हे एक मोठे धाडस होते. त्याउपर ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे दिव्य करणे म्हणजे त्या काळातच (इ.स.पूर्व 2 रे शतक) नव्हे तर आजच्याही काळात हे मोठे आव्हान वाटू शकते. परंतु आपल्या कौशल्याने आणि अनुभवाने या सर्व लोकांनी हे आव्हान लीलया पेलले आणि यशस्वी रीतीने आलेल्या संकटावर मात केली. जे आधी संकट वाटत होते त्याचे रूपांतर संधीमध्ये करून न भूतो न भविष्यती अशी कारागिरी, स्थापत्य आणि कलाकारी यांचे मिश्रण असलेली अद्वितीय कलाकृती निर्माण झाली.
विहाराच्या छतातून गळणाऱया पाण्याला कारंज्यापर्यंत नेणारी पन्हाळ उघडी राहिली तर त्यात कचरा, पाने, माती पडून ते पाणी खराब होईल आणि कारंजे उडणे थांबेल म्हणून त्याला वरती दगड लावून तो मार्ग झाकून टाकला. सगळ्यात अवघड गोष्ट होती ती म्हणजे भिंतीतून काढलेल्या मार्गातून पाणी गळून जाऊ नये म्हणून त्यावर योग्य आकाराचे दगड पक्के बसवून तो मार्गही झाकणे. पण हेही काम या कारागिरांनी यशस्वी रीतीने पूर्ण केले. नागाच्या शिल्पाच्या वरपर्यंत हा मार्ग आणल्यामुळे बरोबर त्याच्या फण्यावर असलेल्या भागालासुद्धा दगडाने बंद केले आणि खडकाच्या आतून लहान मार्ग कोरून ते पाणी नागांच्या फण्यातील छिद्रातून बाहेर काढले. कल्पना करायला किंवा लिहायला हे जेवढे साधे वाटते त्याच्या कित्येक पटीने हे कार्य कठीण होते. पण आपले सर्व कौशल्य आणि अनुभव पणाला लावून आणि हे धर्माचे कार्य आहे, त्यामुळे त्यात कोणतेही विघ्न येऊ नये या भावनेने आणि भक्तीने सर्व लोकांनी हे कार्य पूर्ण केले. ज्यावेळेस हे सगळे काम पूर्ण झाले असेल त्यावेळच्या त्यांच्या मनातील भावनांची आपण कल्पना करू शकतो!
केवळ वर उल्लेखिलेले जलव्यवस्थापनच नाही तर डोंगरमाथ्यावरून येणारा जलप्रपात हेसुद्धा एक मोठे आव्हान या स्थपती आणि कारागीर यांच्यासमोर होते. पावसाळ्यात हा मोठा धबधबा पार करून चैत्यगृहात जावे लागे. त्यामुळे खडकात काही खाचा कोरून तिथे कदाचित एक लाकडी पूल किंवा कठडा केला असावा असे आज तिथे असलेल्या खाचांच्या रचनेवरून वाटते. हा धबधबा विविध टप्प्यांमधून खाली जातो. त्याच्यामध्ये काही सपाट जागा आहेत. त्यामध्ये खड्डे करून तिथे कायमस्वरूपी पाणी साठून राहील अशी योजनाही त्यांनी केलेली दिसते. पावसाळ्यात पाण्याची कमतरता नसते, पण नंतर जेव्हा फक्त वर्षावासाव्यतिरिक्तही हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात इथे राहणारे भिक्षू, तसेच या मार्गाने व्यापारी आणि प्रवासी खाली वाट उतरून जात असतील तेव्हा त्यांना सहज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हे नियोजन केलेले दिसते.
पितळखोरा येथे शैलगृहांची निर्मिती करत असताना स्थपती आणि कारागीर यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले असणार हे आजही आपल्याला स्पष्ट दिसते. चैत्यगृहाच्या वरच्या खडकात सुरेख कोरीव काम करायला सुरुवात झाली होती, पण काही कारणाने त्यांना ते काम अर्धवट सोडावे लागले. कदाचित चैत्यगृह त्या भागातच तयार करायचे मूळचे नियोजन असावे. पण ते नंतर दुसऱया भागात केले गेले. ठिसूळ खडक आणि पाण्याचे झरे, शेजारचा जलप्रपात या मुख्य अडचणी यामागे असाव्यात. या सर्व परिस्थितीत हे काम पूर्ण करण्यासाठी जसे त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले तसेच अलौकिक आणि अदृश्य शक्तींनाही त्यांच्या कार्यात पाठीशी राहण्याचे आवाहन केले असावे असे वाटते. इथे सापडलेली इतर शिल्पे आणि आढळणारे कोरीव काम अशाच काही संकल्पनांचे प्रतीकात्मक अंकन आहेत. त्यांची माहिती पुढील भागात घेऊ.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)





























































