परीक्षण- सहज स्वीकाराची कथा

>> तृप्ती कुलकर्णी

आपल्याकडे गोष्ट म्हटली की त्याच्यामध्ये सर्व गुणसंपन्न नायक, नायिका, तुल्यबळ शत्रू, त्यांच्यातला संघर्ष मग खूप सारे चमत्कार, भव्यदिव्यपणा हे आवश्यक असतं. त्याच्याशिवाय गोष्टींमध्ये रंगत येत नाही. आणि त्या शिवाय गोष्टी पटकन वाचल्या जात नाहीत. पण हे सगळे आपल्या मनाचे चोचले आहेत. प्रत्येक वेळी अशा गोष्टी घडणं किंवा सांगणं हे अशक्य आहे. कारण आयुष्य बऱयाचदा साध्यासुध्या माणसांचं आणि साध्यासाध्या घटनांनीच घडत असतं. अपवादात्मक म्हणून प्रभावी व्यक्तिमत्त्वं, चमत्कार आणि भव्यदिव्यतेच्या गोष्टी घडतात. अलीकडे नेमकं हेच आपण विसरत चाललो आहोत याची लख्ख जाणीव होते ते ‘सदानंद’ वाचल्यावर.

सुप्रसिद्ध लेखक विक्रम भागवत यांची ही कादंबरी. विक्रम भागवत म्हटल्यावर आपल्याला एक शून्य शून्य आणि दूरदर्शनवरच्या काही मालिका आठवतात. पण या व्यतिरिक्तही नाटक, एकांकिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. गेल्या तेरा वर्षांत जवळपास चौदाहून अधिक कादंबऱयांची निर्मिती करणारे कादंबरीकार हीसुद्धा त्यांची महत्त्वाची ओळख आहे. ‘सदानंद’ ही मिहाना प्रकाशनातर्फे नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी.

अगदी बालवयापासूनच कुठलंही विशेष कौशल्य आणि बुद्धिमत्ता नसलेल्या सदानंदची ही जीवनकथा. आयुष्याला स्वतहून वळण देण्यापेक्षा आयुष्य जसं घाट देईल तसं जगणारा हा सदानंद लक्षात राहतो तो परिस्थितीचा सहज स्वीकार करणारा म्हणून. आजकालच्या जगात नेभळट ठरणारं हे व्यक्तिमत्व. आयुष्यात काहीच करण्याची ईर्षा नसलेला, स्वहक्काची जाणीव हरवलेला, स्वतला दुय्यमत्त्व देणारा, अपराधगंड बाळगणारा हा मुलगा दोन मुलींच्या पाठीवर जन्मला आणि वारस मिळाल्याचा आनंद दिला म्हणून त्याचं नाव सदानंद. दुर्दैवाने या नावाव्यतिरिक्त त्याच्या आयुष्यात आनंददायी, समाधानकारक असं काहीही नाही.

रोज उठताना आजचा दिवस कसा घालवायचा या भीतीने त्याच्या पोटात खड्डा पडतो यावरून त्याच्या आयुष्याची कल्पना येते. पण याच आयुष्यात अचानक काही घडामोडी घडू लागतात. फार मोठय़ा नसल्या तरी त्याच्या चौकटीतल्या इवल्याशा जगण्याला धक्का देणाऱया असतात. त्यामुळे सदानंदला आपल्या जगण्याचं सूत्र स्वतच्याच हातात घ्यावं लागतं तेही नाईलाजाने. कारण निर्णय घेणं, विचार करणं हे भीतिदायक आहे, हे त्याचं मत. पण तरीही स्वतचं कवडीमोल वाटणारं अस्तित्व टिकवण्याचा तो प्रयत्न करतो. या गोष्टीत असं घडण्याची शक्यताच गृहीत धरलेली नसल्याने वाचकासाठी कथानकातलं हे धक्का तंत्र प्रभावी ठरतं आणि सदानंदाचं सामान्यपण अधोरेखित होतानाच त्याच्यातलं सूक्ष्म परिवर्तन आश्चर्यचकित करतं.

आई, पत्नी आणि आपल्या दोन मुलांसोबत राहणाऱया सदानंदच्या आयुष्यात मुलांमुळेच अडचणीचे प्रसंग येतात. पण त्यासाठीही तो स्वतलाच जबाबदार धरतो. जो कमवेल तोच या घरात राहील असा पत्नीनेच फतवा काढल्यामुळे तिनेच आणलेल्या अभ्यासिकेतील नोकरी स्वीकारतो. यापूर्वीच्या नोकरीतून जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागल्यामुळे नवीन ठिकाणी काहीही करून तग धरून राहायचं ठरवतो. पण गोष्टी वेगळ्याच घडतात. संकटं येतात पण संधीही देतात. नोकरीच्या ठिकाणी काही मित्र, सोबती मिळतात. त्याचा एकाकीपणा, न्यूनगंड दूर होऊन आयुष्यातल्या लढय़ाला तो सज्ज होतो  व हे कशा प्रकारे घडत जातं ते जाणण्यासाठी ही कादंबरी जरूर वाचा.

या कादंबरीची वैशिष्टय़ं म्हणजे सदानंदची अशक्त व्यक्तिरेखा प्रभावीपणे मांडली आहे. त्याचं बिचारेपण मांडतानाच त्याच्या मनात होणारा विचारांचा संघर्ष असा उत्तम विरोधाभास या कथेची सशक्त बाजू आहे. लेखकाने अत्यंत अल्पाक्षरांत पात्रांची मानसिकता, त्यांची जडणघडण आणि प्रसंग रेखाटले आहेत. यात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही. मिहाना प्रकाशनाने केलेली पुस्तकाची उत्तम रचना आणि सायली घोटीकरने केलेले समर्पक मुखपृष्ठ याही जमेच्याच बाजू आहेत.

भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषाचं कर्तेपण हे अत्यंत गृहीत धरलेलं असतं. जर पुरुषाला ते यशस्वीपणे पेलता आलं नाही तर एका कुटुंबावर त्याचा किती विपरीत परिणाम होतो यावर हे कथानक भाष्य करते. एका पुरुषाच्या नजरेतून त्याच्याच सामान्यपणाचा, कर्तृत्वहिनेतेचा घेतलेला हा परामर्ष वाचकाला अंतर्मुख करतो.

सदानंद 

लेखक ः विक्रम भागवत

प्रकाशन ः मिहाना प्रकाशन

पृष्ठे ः 135 ह मूल्य ः 150 रुपये