
>> सुनीलकुमार सरनाईक
गाडगेबाबा आयुष्यभर माणुसकीच्या आराधनेत रमले. आपल्या त्यागाने, प्रेमाने आणि सेवेने त्यांनी समाजातील दैन्य, दुःख घालविण्याचा कृतिशील प्रयत्न केला. थेट समाजाच्या अंगणापर्यंत ‘खराटा’ नेला. त्याच खराटय़ाने अंधश्रद्धेवर प्रहार केले. समाजाला स्वच्छतेच्या सूर्याचे दर्शन घडविले, श्रमप्रतिष्ठsचे बिजारोपण केले, आरोग्याचा संदेश दिला, व्यसनमुक्तीचा गजर केला. समाजातील विषमता, पाखंडता, कर्मकांडता, मूढता नष्ट केली. समता, प्रेम, बंधुभाव आणि न्याय निर्माण व्हावा म्हणून अखंड प्रबोधन केले. अशा या थोर महात्म्याचे चरित्र त्यांच्या हयातीत प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले आहे. श्री गाडगे महाराज मिशन (रजि.) नाशिक या बाबांच्या संस्थेने 17 मार्च 1952 (एकनाथषष्ठी) रोजी प्रकाशित केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पुस्तकाचे रंगीत मुखपृष्ठ आपल्या अभिजात कुंचल्याने सुरेख रेखाटले आहे.
या चरित्र लेखनामागची पार्श्वभूमी सांगताना प्रबोधनकार लिहितात, “अवचित नि अयाचित योगाने गाडगेबाबांचे हे परमपवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरी मजवर सोपवण्याची श्री बाबांची लहर लागली. बाबांचे चरित्र महासागरासारखे अफाट नि विशाल. हकिकतींचे, आठवणींचे नि भक्तजनांकडून आलेल्या नानाविध गोष्टींचे कितीतरी कागदपत्रे माझ्यासमोर होती. किती घ्यावे नि कोणते टाकावे समजेना. गांगरून गेलो मी! प्रथम तपशीलवार विस्तृत मोठे लिहिण्याची योजना… ते काम सावकाशीने चालले असतानाच एक दिवस बाबांचा निरोप आला…
फुलवात तेवत आहे, तोवर तिच्या
उजेडात काय पाहायचे ते पाहून घ्यावे.
केव्हा वारा येईल, नीती विझेल,
याचा काय नेम?
या निरोपाने मी तर चरकलोच. चला, मोठे नाही तर छोटे, पण माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचकांच्या विचारांना चालना देणारे पुस्तक शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो टाईपरायटर खडाडवीत. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्यमुख्य, ठळक पैलू मी येथवर चित्रित केले. इंद्रधनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणाऱया शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एकतर लेखन-मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातली ती ‘निरांजन’ मला सारखी वाकुल्या दाखवित सुटली. केली सेवा वाचकांनी गोड मानून घेतली का त्यातच मला आनंद.’’ हे चरित्र लेखन समर्पित करतानाही त्यांनी गाडगेबाबांच्या स्वभाव पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ते लिहितात, ‘अखेर गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा, या न्यायाने ही चरित्र लेखनाची पत्री श्री गाडगेबाबांच्या चरणा – (अरे हो! पायांना तर ते हातही लावून देणार नाहीत.) बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यात साष्टांग प्रणिपाताने समर्पण करीत आहे.’
लोकोत्तर-कर्मयोगी महात्म्याची जीवनकथा पारिजातकाच्या परिमळासारखी मातीलाही सुगंधी करते, असे स्पष्ट मत या पुस्तकातील ‘देवडीवरचा मुजरा’ या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत व्यक्त केले आहे. प्रबोधनकारांनी लिहिलेले हे गाडगेबाबांचे पहिले चरित्र समाजशास्त्राच्या अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त आहे. म्हणूनच या थोर महात्मा व क्रांतिकारी संताच्या 63 व्या पुण्यतिथी दिनी त्यांचे स्मरण होणे औचित्याचे वाटते.

























































