
जगण्याशी कधी जमवून घेत तर कधी दोन हात करत स्त्रीची वाटचाल अविरत सुरू आहे. या वाटेवरचा प्रवास मांडून ठेवणाऱया अभिव्यक्तीची लिपी समजून घेणारे हे सदर.
संत जनाबाई कधीपासून मनाच्या मनात जागा पटकावून बसलीय कोणा ठावे!
बहुधा सळसळत्या तारुण्याच्या बंडखोर वयातच असणार. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याचा बेधडकपणा त्याच वयाला झेपतो म्हणूनही असेल, पण डोईचा पदर आला खांद्यावरी ‘भरल्या बाजरी जाईन मी’ असं ठणकावून सांगणारा जनाबाईचा आवाज त्या वयापासून बळ पुरवत आला हे नक्की.
बाईसाठी घराच्या उंबऱयाची मर्यादा आखून देणाऱया इथल्या समाजव्यवस्थेला ती जे आव्हान देते त्याला तोडच नाही. याच अभंगात ती पुढे म्हणते, ‘जनी म्हणे देवा मी झाले वेसवा…’ एखाद्या स्त्राrनं डोईचा पदर खांद्यावर आला म्हणावं, मी झाले वेसवा म्हणावं इतका निसंगपणा आला तरी कुठून आणि का? स्त्राr जन्म म्हणवूनी न व्हावे उदास असंही जरी तिनं कधी म्हटलं असलं तरी स्त्राr जन्म म्हणजे अनेक नकारघंटा. जिथे तिथे अडसर, ज्याला त्याला मज्जाव हे तिनं अनुभवलं आहे. आजूबाजूच्या स्त्राr जीवनाचं निरीक्षणही तेच सांगतंय आणि अखेरीस तर त्या विठूच्या भक्तीवरही बंधन आल्यावर तिच्यातली ही ठिणगी जहाल शब्दांत उतरली आहे. घ्या करून काय करायचं ते, ‘मी झाले वेसवा!’ बाई म्हणून सतत जी भीती ठाण मांडून बसली आहे, ज्याचं भय सारखं हा समाज तिला घालतो आहे, त्या भयावर ती कशी मात करते ते इथं दिसतं. म्हणून जनाबाईचा हा उद्गार मला स्त्राrचा पहिला आत्मस्वर वाटतो. आता या बंडखोरीची किंमत तिनं कशी चुकवली असणार याची जाणीव करून देते अरुणा ढेरे यांची ‘जनी’ ही कविता. त्या म्हणतात,
अगे जनाबाई माझे, तुला ठाऊकेच नाही
रुख्मिणीच्या शेजेवर विठू निजलाहे बाई
अशी एकटी तू उभी, तुझा मोकळा पदर
आणि नीज त्याची गाढ, त्याचे बंद आहे दार
तिच्या वाटय़ाला अखेर काय येतं याचं हे करुण चित्र. जनी म्हणजे प्रत्येक स्त्राr. तिचा प्रश्न हा अनेक तऱहांनी प्रत्येक बाईचा प्रश्न आणि नीज याची गाढ. हा तर आजही कुणा बाईला येणारा अनुभव. तो तिचा पुरुष, तो तिनं जीव ओवाळून टाकलेला तिचा कंथ, तो तिला गुंतवून पाय मोकळा करून घेणारा, तो तूच निर्माण केलास गुंता आता निस्तर तूच म्हणणारा. तो राजा असो की रंक, तो पुराण पुरुष असो की उत्तर आधुनिक पुंगव. तो समतेचा झेंडा खांद्यावर घेऊन सर्वात पुढे चालणारा असो की बायकोसाठी लाथा-बुक्क्यांची भाषा समजणारा असो, आपल्या जिवाभावाच्या गोष्टीसाठी जीव पाखडला तरी वाटय़ाला येणाऱया या बंद दरवाजाचं काय करायचं हा प्रश्नचिन्ह घेऊन उभी असलेली ती. युगानुयुगं.
पंढरीला एकटीच उभी असलेली साक्षात त्याची ‘वामांगी’ रुक्मिणी अठ्ठावीस युगं जशी उभी आहे तशीच. तो खांद्याला खांदा लावून सोबत आहे, हा निव्वळ भासच म्हणायचा मग.
जनाबाईच्या या पहिल्या उद्गाराचा खोल अर्थ जाणून घ्यायला हवा आपण. ते ठणकावून सांगण्याचं धैर्य बांधायला हवं. आपल्या स्वतच्या बळाशिवाय काहीच उपयोगाचं नाही हे शिकायला हवंय आणि ते बळ आहेच प्रत्येकीत. आत्मबळ! जरा फुंकर घालून जमलेली राख बाजूला करायला हवी फक्त. आत आहेच तो धगधगता स्फुल्लिंग.
नवरात्री सुरू होतेय. दुर्गावताराची उपासना करायची तर फक्त निरनिराळ्या रंगांच्या साडय़ा नेसून नव्हे, तर ते सारे रंग आपल्या जगण्यात मिसळून घेऊन. हा रंगांचा उत्सव कोणा पुरुषी डोळ्यांचं रंजन करण्यासाठी नाही, तर स्वतच्या निर्भर आनंदासाठी आहे, हे स्वतला सांगण्याची गरज आहे. अष्टभुजा दुर्गेच्या रूपाची पूजा करताना स्त्राrला अष्ठभुजा म्हणून गौरवताना पुरुषप्रधान व्यवस्था तिला पुन्हा नव्याने एका व्यापक भावनिक, सांस्कृतिक जाळ्यात तर नाही ना अडकवत… घरचे-दारचे, मुलाबाळांचे साऱयांचे ‘जन्म डोईवर’ घेणाऱया तिचं ओझं आणखीन वाढवत तर नाही ना… विचार करायला हवा यानिमित्तानं.
म्हणून हे ‘स्त्री-लिपी’ सदर. भेटत राहू दर पंधरा दिवसांनी याच ठिकाणी.