
मराठी संत वाङ्मयात स्त्रियांचा समावेश मोठय़ा संख्येने नाही. अर्थात तो असणे शक्यही नव्हते. परंतू बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात महदंबेपासून सोळाव्या शतकातील समर्थांची शिष्या वेणाबाई यांच्यापर्यंत काही महत्वाच्या स्त्राr संत दिसून येतात. त्या त्या सामाजिक अवस्थेत स्त्राrचे संतपण आणि वाड्मय लिखाण यांना ऐतिहासिक महत्व आहे. बहिणाबाईंच्या समकालीन असणार्या रामदासांची शिष्या वेणाबाई या एक महत्त्वाच्या स्त्री संत. वेणाबाई या समर्थांच्या शिष्यपरिवारातील एक महत्त्वाच्या आणि सक्षम स्त्राr होत्या. समर्थांच्या धर्मसंघटनेत व कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. रामदासांचे शिष्यत्व पत्करलेल्या वेणाबाईने समर्थ संप्रदायाच्या प्रचारात आणि प्रसारात आपले आयुष्य वेचले .सीता स्वयंवर आणि रामायण हे दोन मुख्य ग्रंथ वेणाबाईंनी लिहिले. ही ग्रंथरचना मर्यादित स्वरूपाची असली तरी या ग्रंथात अनेक लक्षवेधी गोष्टी आढळतात.कारण वेणाबाई उत्कृष्ट कवी होत्या. त्यांच्या सीता स्वयंवर ग्रंथातून तत्कालीन महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन अगदी यथायोग्य दिसून येते, असे अभ्यासकांचे मत आहे. वेणाबाईंना आदराने वेणास्वामी असे म्हटले जाते. त्यांनी उपदेशरहस्य, कौल, पंचीकरण, रामगुहकसंवाद, रामायणाची कांडे, सीतास्वयंवर, स्फुट इतकी ग्रंथरचना केली.