
>> वृषाली पंढरी
सनातन धर्मात कर्मकांड पार पाडताना सोपे जावे म्हणून अनेक पर्याय दिलेले आहेत. व्रत वैकल्ये, पूजा विधी करताना फुले, पाने, फळे, नैवेद्य, पंचामृत असे विविध पदार्थ समर्पयामि म्हणत इष्ट देवतेला अर्पण करण्याची प्रथा आहे. अर्पण करण्यासाठी इच्छित वस्तू वा पदार्थ नसेल तर अक्षतान् समर्पयामि म्हणजेच तांदूळ अर्पण करण्याचा सहजसाध्य पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता पितृपक्षाची सांगता होते आहे. श्राद्ध म्हणजे पूर्वजांचे स्मरण करण्याचा विधी. श्रध्देने केले जाते ते श्राद्ध असेही म्हटले जाते. हिंदू धर्मीयात श्राद्ध आणि महालय करण्याची पुरातन परंपरा आहे.
ग्रामीण भागात पितृपक्षातील श्राद्ध महाळ असे म्हटले जाते. महालयाचा अपभ्रंश म्हणजे महाळ. महालयाचा काल भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे जवळपास दीड महिन्याचा असतो. महालय हादेखील श्राद्धविधीच आहे. दर वर्षी पुण्यतिथीनिमित्त केले जाणारे श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक म्हणजे दर वर्षी पुण्यतिथीला केले जाणारे श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला उद्देशून असते तर महालय हे आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असते. म्हणजेच दुसऱ्या भाषेत वार्षिक श्राद्ध हे ठराविक व्यक्तीस उद्देशून असते तर महालय सर्व दिवंगत आप्तेष्टांना उद्देशून असते.
भाद्रपद वद्य प्रतिप्रदेपासून पितृ पंधरवडा किंवा पितृपक्षास सुरुवात होते. पितृपक्षातील प्रत्येक तिथीला श्राद्धविधी करण्याची परंपरा आहे. पितृ पंधरवडा बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 रोजी समाप्त होईल आणि 7 ऑक्टोबरपासून घटस्थापना सुरू होईल.
अमावास्येची तारीख सुरू होते – 5 ऑक्टोबर 2021 संध्याकाळी सात वाजून 4 मिनिटांपासून व अमावास्येची तारीख संपते – 6 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 4 वाजून 34 मिनिटांनी. अनेक लोक वेळेअभावी आणि श्राद्धतिथी माहीत नसल्यास किंवा लक्षात नसल्यास सर्व दिवंगत व्यक्तींचे स्मरण करून सर्वपित्री अमावास्येला महालय करतात. म्हणूनच या अमावास्येला सर्वपित्री अमावास्या असे म्हणतात. श्राद्ध काय किंवा महालय काय, या सर्वात विधींइतकेच महत्त्व श्रद्धेला आहे, कारण दिवंगत व्यक्तींप्रति आदर, आत्मीयता आणि आपुलकी दर्शवणारा भाव महत्त्वाचा आहे.
सनातन परंपरेत सर्वपित्री अमावास्येच्या तिथीला विशेष महत्त्व आहे. ग्रंथांनुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी विसरलेल्या लोकांच्या श्राद्धासाठी अतिशय अनुकूल मानली जाते. पूर्वजांच्या पिंडदानासाठी ही तिथी सर्वोत्तम मानली जाते. पितृ पक्षात आल्यावर या तिथीचे महत्त्व अनेक पटीने वाढते. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख आठवत नसेल, तर तुम्ही पितृ विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच त्यांच्या शांतीसाठी सर्वपित्री अमावास्या तिथीला श्राद्ध करू शकता. आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध नक्की करावे. ब्रह्म पुराणानुसार पितृ अमावास्येला पवित्र होऊन श्राद्ध केल्याने पितरांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तो अनंतकाळपर्यंत स्वर्गात सुख प्राप्त करतो.
सर्वपित्री अमावास्या तिथीला, योग्य ब्राह्मणांना किंवा भुकेलेल्याला आदराने घरी बोलवून जेवू घाला. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि श्राद्धकर्त्याला पुण्य फळे प्रदान करतात. जे लोक काही कारणास्तव पितृपक्षात 15 दिवसांपर्यंत श्राद्ध, तर्पण इत्यादी करत नाहीत, त्यांनी अमावास्येला त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध जरूर करावे.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल आणि यामुळे त्याला जीवनात सर्व प्रकारच्या अडचणी येत असतील, तर त्याने विशेषतः अमावास्येच्या दिवशी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करावेत. या दिवशी, पवित्र नदीच्या काठावर दिवा लावल्याने सर्वाधिक पुण्य प्राप्त होते. सर्वपित्री अमावास्या हा पूर्वजांना निरोप देण्याचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी जो माणूस आपल्या पूर्वजांना श्रद्धेने आणि विश्वासाने निरोप देतो, त्याच्यावर प्रसन्न होऊन पूर्वज त्यांना शुभाशीर्वाद देतात. पालघरच्या श्री. सचिन मधुकर परांजपे यांनी पित्रांना उद्देशून एक प्रार्थना तयार केली असून लोकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन केले आहे. मला ती खूपच भावली व वाचकांनी अवश्य उपयोगात आणावी असे वाटल्याने देत आहे.
मी आज सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी माझ्या समस्त पितृगणांना हात जोडून नमस्कार करतो/करते आहे. मला ज्ञात-अज्ञात असणारे सर्व पितृगण आणि माझ्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेले माझे सर्व सुहृद, नातेवाईक, हितचिंतक, माझे नोकरचाकर, माझे पाळीव प्राणीपक्षी आणि माझे हितशत्रू किंवा ज्यांच्याशी माझे मतभेद होते आणि ज्यांच्या मृत्यूपश्चात माझं शत्रुत्व संपुष्टात आले आहे त्या सर्व पितृगणांना मी वंदन करतो/करते. तुमच्या मनातील सर्व किंतु-परंतु आता कायमचे नष्ट होऊन तुम्हाला सद्गती, मोक्ष किंवा तुमच्या शुभविधिलिखितानुसार उत्कृष्ट जन्म प्राप्त होवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो/करते. आमच्या हातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काही अपराध, चुका किंवा तुमचे कार्य करण्यात हयगय होत असेल तर आपण उदार अंतःकरणाने क्षमा करा. आपल्या शुभकृपा आणि शुभेच्छेने आमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, सौख्य, मनःशांती, दीर्घायुरारोग्यसंपन्नता, उद्योग-नोकरीत सुयश, उत्तम संधी यांचा लाभ होवो. आमच्या पुढच्या सर्व पिढय़ांचा अभ्युदय होवो. आमचे वंशसातत्य चिरकाल राहो. आमच्या पिढीत सशक्त, बलवान, बुद्धिमान, दीर्घायुषी, सुंदर, सुप्रसिद्ध आणि सर्वार्थाने यशस्वी आत्म्यांनीच जन्म घेऊन आमच्या प्रत्येक पिढीचे शुभकल्याण होवो. आमचे संरक्षण आपण करावे…’’



























































