ठसा – सतेंदरकुमार खोसला ऊर्फ बिरबल

>> दिलीप ठाकूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक वैशिष्टय़ांमधील एक म्हणजे ‘नावातील बदल’. युसूफ खानचा दिलीपकुमार झाला, जतीन खन्नाचा राजेश खन्ना, तर रवी कपूरचा जितेंद्र झाला आणि या नावांनी ते स्टार झाले. पण ही नावे कशी बदलली जातात, घेतली जातात, ठेवली जातात यामागेही अनेक रंजक गोष्टी असतात आणि त्यात या फिल्मवाल्यांची कल्पकता दिसते. सतेंदरकुमार खोसला यांचा ‘बिरबल’ असाच झाला. खरे तर त्याने मूळ नावानेच चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आणि ‘राजा’ (1964) चित्रपटातील एका गाण्यात अगदी किरकोळ भूमिका साकारली. अशा पद्धतीने अतिशय किरकोळ, छोटय़ा छोटय़ा भूमिका साकारत साकारत हळूहळू वाटचाल करणे, स्टुडिओतून चकरा मारणे, निर्मात्यांच्या कार्यालयातून फेऱया मारणे, एखाद्या दृश्यात एक संवाद मिळाला तरी दिग्दर्शकाची वाहवा करणे असे अनेक कलाकार या चित्रपटसृष्टीतील भटपंतीत पाहायला मिळतात. तोही एक येथील कामाचाच भाग आहे आणि असे करत असतानाच सतेंदरकुमार खोसलाची भेट मनोजकुमारशी झाली. त्याला अशा स्ट्रगलरची मानसिकता, गरजा, धडपड माहिती होती. तेव्हा मनोजकुमार दिग्दर्शनात पाऊल टाकत ‘उपकार’च्या तयारीत होता. अशातच त्याने सतेंदरकुमारच्या चेहऱयावरचे हसू, त्याची एकूणच देहबोली पाहून त्याला नाव दिले, ‘बिरबल.’

‘उपकार’ (1976) सुपरहिट ठरला आणि बिरबलची करीअर अशाच छोटय़ा छोटय़ा भूमिकांनी सुरू झाली. चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘बुंद जो बन गये मोती’मध्ये लक्षवेधक भूमिका मिळाली आणि 2022 च्या ‘दस नही चालीस’ या चित्रपटांपर्यंत कार्यरत राहिली. अखेर वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने बिरबलचे निधन झाले. एकेकाळी बिरबलच्या वडिलांचा पंजाबमधील एका गावात प्रिंटिंग प्रेस होता, पण त्या व्यवसायात न रमता बिरबल अभिनय क्षेत्रात आला. विनोदी कलाकारांचे सर्वात मोठे दुर्दैव असते ते त्यांना कोणीच गंभीरपणे घेत नाहीत. मला आठवतेय दादा काsंडके यांच्या ‘आगे की सोच’ या चित्रपटाचे भोर तालुक्यातील इंगवलीतील दादांच्याच स्टुडिओत शूटिंग असताना मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांचा शूटिंग रिपार्ंटगसाठी दौरा असताना बिरबल आणि मनमौजी यांची भेट झाली होती. दादा ‘ओके’ असे म्हणताच बिरबल सुखावायचा. तो आनंद प्रामाणिक होता आणि तेच त्याचे खरेपण त्याच्याशी बोलताना दिसे. आपल्यासाठी भूमिका लिहिल्या जात नाहीत, पण आपल्या वाटेला आलेली भूमिका आपण चोख बजावायची हे माझे सूत्र आहे, असे बिरबल म्हणाल्याचे माझ्या कायमच लक्षात राहिलेय. बिरबल मेहबूब स्टुडिओ, नटराज स्टुडिओ येथे अनेक चित्रपटांच्या मुहूर्तांना हमखास भेटायचा. या चित्रपटात तो असावा असे वाटे, पण ती त्याची सदिच्छा भेट असे हे लक्षात येई. असे करत करत त्याने हिंदी, पंजाबी, भोजपुरी, मराठी या भाषांत मिळून जवळपास साठ वर्षांच्या कारकीर्दीत पाचशे चित्रपटांत भूमिका साकारल्या. मराठीत ‘वऱहाडी झटका पुणेरी फटका’, ‘उपकार दुधाचे’ या चित्रपटांत काम केले.

बिरबल लक्षात राहिला तो रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’मधील (1975) अर्धी मिशीवाल्या पैद्याच्या भूमिकेत. ‘शोले’ सर्वकालीन सुपरहिट चित्रपट असल्याने बिरबल रसिकांच्या पुढील अनेक पिढय़ांपर्यंत पोहोचला. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अनुरोध’मध्ये (1976) त्याने ड्रग ऑडिक्ट साकारला. याशिवाय ‘आराधना’, ‘मेरा नाम जोकर’, ‘गॅम्बलर’, ‘अमर प्रेम’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘चरस’, ‘अमीर गरीब’, ‘विश्वनाथ’, ‘कर्ज’, ‘क्रांती’, ‘हम है राही प्यार के’, ‘पैदी’, ‘कामयाब’, ‘चोर के घर चोर’, ‘मेरा आशिक’ अशा अनेक चित्रपटांत भूमिका साकारत वाटचाल केली. एक लक्षात येते की, बिरबलला अनेक बडय़ा दिग्दर्शकांच्या चित्रपटांत भूमिका साकारायला मिळाली, पण त्याच वेळेस प्रश्न असतो की, अशा कलाकारांची तारखांची डायरी कधीच फुल्ल नसते. कधी चार दिवस काम, तर कधी दहा दिवस कामाचा शोध, तरीही आपल्या कामाचा भरभरून आनंद घेत घेत आणि तो इतरांना देत देत आपली कारकीर्द खुलवतात. एखाद्या इव्हेंटमध्ये संधी मिळाली की सुखावतात. कलेसाठी कला अशा वृत्तीने कायमच कामावरचा पह्कस ठेवलेल्या पिढीचा बिरबल प्रतिनिधी होता. तो कायम स्मरणास राहील!