वास्तववादी चळवळींचा नायक

>> श्रीपाद भालचंद्र जोशी

प्रसिद्ध कवी, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे नुकतेच निधन झाले. कामगार चळवळ असो का  वाङ्मयीन चळवळ, ते  कायम सक्रीय राहिले. वंचित, शोषित, दुर्बल यांच्या जीवनवास्तवाला साहित्यरूप देण्याची ठाम भूमिका घेणाऱ्यांपैकी सत्तरीच्या दशकातील महत्त्वाचे नाव म्हणून सतीश काळसेकर यांना पाहता येईल.   

मुंबईत असताना 1970 साली पांडुरंग वाडकरने माझा नामदेव ढसाळशी परिचय घडवला होता. पुढे त्या गोतावळ्यातील इतरही संबंधात आले. 1971 साली आम्ही चर्चगेट स्टेशनसमोर भर गर्दीच्या वेळी काही कवी कवितावाचन करत होतो. आमचा नायक होता सतीश… सतीश काळसेकर. नंतर अलंकार थिएटरसमोरील, नामदेव ढसाळांच्या कवितेत जी मुंबई प्रामुख्याने येते त्या भागातला एक चौक, तिथे चंद्रकांत खोतही येत असायचे. वयाने माझ्यापेक्षा सतीश सात-आठ वर्षांनी मोठाच. तो सगळा काळच माझ्या अस्तित्वाचा, व्यक्तिमत्वाचा अभिन्न भाग झाला, कोरला गेला, जाणिवेत शिरला, तोच मुळी सतीश, नामदेव, चंद्रकांत खोत, भाऊ पाध्ये अशा, पुढे मराठी विद्रोही, समांतर, बंडखोर, प्रस्थापित व्यवस्थाविरोधी, वास्तववादी वाङ्मयाची दीक्षा देणारे नायक ठरलेल्यांच्या त्या टोळीचा काही काळ भाग तेव्हा होता येण्याची संधी लाभल्यानेच. पुढे यातील सतीश आयुष्यभर कायमच सोबत राहिला.

महाराष्ट्रात कधीच अस्तित्वात न आलेल्या, या उपखंडातील सर्वच भाषांमधील प्रागतिक लेखक, कलावंत, प्रतिभावंत यांची एकमेव ऐतिहासिक महत्त्वाची संघटना असलेला अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ आम्ही गेल्या दशकात महाराष्ट्रात रुजवला त्याचा सतीश महाराष्ट्राचा अध्यक्ष होता. त्याअगोदर आणि नंतरही अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचाही तो सदस्य होता. प्रागतिक वाङ्मयीन चळवळीतील सतीश आमचा ज्येष्ठ सहकारी होता. मराठी कवितेवर आपली स्वतंत्र मुद्रा उमटवणारा, सत्तरीच्या दशकात लिहित्या झालेल्या आम्हा कवीमित्रांमधला तो सर्वात ज्येष्ठ कवी. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी निर्माण करण्यातील सहकारी. अशा कितीतरी स्वरूपात सतीश माझ्या व आम्हा सहकाऱ्यांच्या वाट्याला आलेला मराठी वाङ्मयीन, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीच्या अध्वर्युंपैकी होता.

प्रस्थापितांविरुद्ध बंडखोरीतून जगभरातच साठी, सत्तरीचे दशक जन्माला आले होते. महाराष्ट्रात त्या बंडखोरीचा, विद्रोहाचा, जीवन वास्तव हे साहित्याचा मूलाधार असण्याचा, वंचित, शोषित, दुर्बल यांच्या जीवनवास्तवाला साहित्य रूप देण्याचा नवहुंकार जे ठामपणे, भूमिका घेत देत होते त्यातला मराठीतील सतीश हा सत्तरीच्या दशकातील एक नायक होता. मग ती कामगार चळवळ असो की वाङ्मयीन चळवळ… अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन संकल्पना राबवणे असो की महाराष्ट्रभरातील व देशभरातील अन्य भाषेतीलही त्याचा प्रत्यक्ष वावर आणि त्याच्या अनुवादित कवितांच्या रूपाने हिंदुस्थानभर त्याचा सततचा वावर… त्याचे कृतिशील, कल्पक असे साऱ्यांना शांतपणे सांभाळून घेणारे व्यक्तिमत्त्वच त्यातून दिसत तर असेच पण ते सर्वांना मोहवीतही असे.

‘इंद्रियोपनिषद्’, साक्षात, विलंबित हे कवितासंग्रह तसेच कविताः लेनिनसाठी, लेनिनवरच्या विश्वातील कविता – अनुवाद व संपादन, नव्या वसाहतीत या अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद हे अनुवादही प्रकाशित झाले. अनेकांना त्याने लिहिते केले, प्रकाशितही केले. मात्र हे करताना दर्जा, अभिरुची, गुणवत्ता हे निकष त्याने कठोरपणे पाळले. नवी साहित्य दृष्टी, नवे जीवनानुभव जे देत होते तिच्या अभिव्यक्तीसाठी पारंपरिक भाषा, शैली, पारंपरिक साहित्यशास्त्र कामाचे नव्हते. म्हणूनच नवी भाषा घडवली जात होती. सतीशनेदेखील त्यांच्या कवितेतून ती परिणामकारक आणि प्रभावी अशी घडवली आहे. त्याचा काव्यपिंड कसा होता याचे ‘युगांतराची कविता’ या बृहद्ग्रंथात डॉ. किशोर सानप यांनी अप्रतिम वर्णन केले आहे. कवी असलेल्या बापाचा आणि अवेळी जग सोडून गेलेल्या कवी मुलाचा अंतर्संवादविषयक त्याच्या दीर्घकवितेत त्याच्या खाजगी दुःखाचेही जे सार्वत्रिकीकरण होते त्याने या कवितेला विश्व साहित्याचाच दर्जा प्राप्त होतो. त्याच्या कवितेतील प्रतिमा विश्वाचे वेगळेपण, विविधता, प्रसरणशीलता ही नवसाहित्याची सुरुवात करणाऱ्या चळवळीच्या या धुरिणाचे वेगळे वैशिष्टय़च आहे.

मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्मय, फक्त, तापसी, चक्रवर्ती, आपले वाङ्मय वृत्त  अशा नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी त्याने उत्तमरित्या सांभाळली. लोकवाङ्मय गृह, मुंबई या दर्जेदार व अभिरुचीसंपन्न प्रकाशन संस्थेला हे स्वरूप प्राप्त करून देण्यात त्याच्या संपादन कार्याचा वाटा मोठा आहे. तसेच वा.वि. भटांच्या अभिनव प्रकाशन या प्रकाशन संस्थेतही त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. सतीश साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचा सदस्य, महाराष्ट्र फाउंडेशनच्या (अमेरिका) हिंदुस्थानी पुरस्कार निवड समितीचा दहा वर्ष सदस्य आणि 2008पर्यंत निवड समितीचा निमंत्रक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सदस्यदेखील राहिला. राज्याच्या भाषा सल्लागार समितीचाही तो सदस्य होता.

सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक, लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, कैफी आझमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार  असे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्याला लाभले. वर्ध्याच्या प्रतिष्ठत दाते पुरस्कारांची तो निवड करत असे. विदर्भात त्याचा मोठा मित्रपरिवार होता. नागपूरला 2007 साली झालेल्या 80व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नामदेव ढसाळ संमेलनाचा मीच कार्यवाह असल्याने मला हवाच होता. नामदेवने त्याआधी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कधीच पायही ठेवला नव्हता. त्यामुळे तो येणारच नाही यावर लोकांनी शर्यती लावून झाल्या होत्या. नामदेवची मुलाखत सतीशने घ्यावी अशी माझी इच्छा होती. आश्चर्य म्हणजे त्यांच्या दोन्ही मित्रांसाठी नामदेव तयार झाला. पण त्याला तयार करण्याचे सारेच श्रेय मात्र सतीशचेच. काही नतद्रष्टांनी मोडता घातला नसता तर नामदेव ढसाळला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बघण्याचाही योग यावा याचीच खरेतर ती मुलाखत ही सुरुवात होती. सतीशने घेतलेली दोन तासांची ती मुलाखत हा तर आता महत्त्वाचाच सांस्कृतिक दस्तावेज झाला आहे.

नागपूरचा त्याचा संपर्क आम्ही, त्याला व्याख्याने, कवितावाचन, प्रगतिशील लेखक संघाचे राज्य अधिवेशन, अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन अशा अनेक निमित्ताने सतत आणत राहिलो. सतीशही येत राहिला. भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती कुठे सतीशचा वावर नव्हता. भटकायची त्याला भरपूर हौस होती. वाचन संस्कृतीचा तर तो प्रचारकच होता. प्रचंड वाचत असे. वाचलेले इतरांना सांगत असे. असे सांगता सांगताच त्याची ‘वाचकांची रोजनिशी’ तयार झाली.

केवळ आपलाच नव्हे, तर जागतिक वारसाही आपण विसरता कामा नये ही व्यापक अभिरूचीसंपन्न दृष्टी हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्टय़च आहे. मार्क्सवादी विचार ही सतीशची वैचारिक पाठशाळा असली तरी तो मुळात सांस्कृतिक मार्क्सवादीच असे मला वाटते, जी पारंपरिक औद्योगिक मार्क्सवादापासून फारकत घेत गेलेली, पण मार्क्सवादाचीच सांस्कृतिक आवृत्ती होती जी फ्रँकफर्ट स्कूलच्या पायावर उभी होती जिचा पुरस्कार ग्रामची, हेब्बरमास इत्यादीसारखे विचारवंत करीत होते.

सतीशचा संबंध नाही अशा मराठी वाङ्मयविश्वाची कल्पनाच करता येऊ शकत नाही. सतीशवर कितीतरी अंगाने लिहिता येऊ शकते, लिहिलेही जाईल. मात्र ते वाचायला आता हा पुस्तकवेडा, पुस्तक संग्राहक, मानुषतावादी, ध्येयनिष्ठ, जीवननिष्ठ कविमित्र – वाचक आपल्यासोबत असणार नाही.

 [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या