मुद्दा : वन्य जीव वाचलेच पाहिजेत!

tiger-

>>दादासाहेब येंधे<<

([email protected])

मानवी वस्तीत होणारा प्राण्यांचा शिरकाव, मानवाचे जंगलावरील अतिक्रमण, वृक्षतोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा झपाटय़ाने होत असलेला ऱहास आणि महामार्ग बांधणीमुळे धोक्यात आलेले कॉरिडॉर या सर्वांचा एकत्रित परिणाम वन्य जीवांच्या नैसर्गिक अधिवासावर झाला आहे आणि परिणामी वन्य जीवनच धोक्यात आले आहे. अलीकडे शिकारीचे प्रमाण वाढत असले तरी या कारणांना दुर्लक्षित करून चालणारे नाही. कारण वन्य जीवन धोक्यात येण्यामागे शिकार हेच एक कारण नसून त्यापेक्षाही राष्ट्रीय महामार्ग, कोळसा खाणी, विद्युत प्रकल्प, वाढते पर्यटन, शहरीकरण या माध्यमांतून आपणही कुठेतरी वन्य जीवांच्या असुरक्षिततेला कारणीभूत ठरत आहोत. कदाचित या सर्व मुद्यांवर गांभीर्याने विचार झाला तर धोक्यात आलेल्या वन्य जीवांना कुठेतरी सुरक्षितता मिळेल. जंगलातील वाढते पर्यटन आता वन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. जंगल पर्यटन आणि त्याअनुषंगाने जंगलाच्या आजूबाजूला झालेले रिसॉर्ट वन्य प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. पर्यटक येतात आणि त्यांच्या जवळचे प्लॅस्टिक बाहेर फेकतात. काही दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एक वाघ प्लॅस्टिक चघळत असतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. व्यवस्थित नियोजन न करता होणारे पर्यटन वन्य जीवांच्या मुळावर उठले आहे. कान्हा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, सारिस्काप्रमाणेच महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प धोक्यात आल्याची ही घंटा आहे.

पूर्वी सहय़ाद्रीच्या पट्टय़ात विपुल जैवसंपदा टिकून होती. या जैवसंपदेत एक प्रकारची सलगता होती. त्यामुळे वन्य जीवांसाठी अधिवास सहय़ाद्रीच्या पट्टय़ात होता. वन्य जीवांना सहजपणे अन्न उपलब्ध होत होते. त्यामुळे जैव साखळी सुरळीतपणे चालू होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सहय़ाद्रीच्या पट्टय़ातील जंगलांचा विविध कारणांनी ऱहास होत आहे. वणवे, जंगलतोड, मानवी वस्ती, शेती आदी विविध कारणांमुळे सहय़ाद्रीतील जंगलांचा नाश होत आहे. साहजिकच वन्य जीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. त्यांना अन्न सहजरीत्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे हे वन्य जीव मानवी वस्तीकडे वळत आहेत. तिथे त्यांना सहज अन्न वा भक्ष्य उपलब्ध होत असल्याने वन्य जीव मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यातून गंभीर असा मानव-वन्य जीव संघर्ष उभा ठाकला आहे. स्थिती अशीच राहिल्यास भविष्यात वन्य जीवांच्या मानवी वस्तीवरील अतिक्रमणात वाढ होणार आहे. मानवाप्रमाणे वन्य जीवांनाही जीवन जगण्याचं स्वातंत्र्य आहे. वन्य जीवांसाठी कायदे आहेत. जंगल हे त्यांचं घर आहे. त्यांचं जतन करणं आवश्यक आहे. जंगलं टिकल्यास जैव साखळी सुरळीत चालेल. मग वन्य जीवांच्या मानवी वस्तीवरील अतिक्रमणाचा प्रश्नही निर्माण होणार नाही. जंगलात अन्न मिळाले नसल्यानेच जवळच्या खेड्यात घुसलेले वाघ भुकेने मरण पावल्याच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. वन संरक्षण कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी, जंगलांचे पुनरुज्जीवन, जंगलात पाण्याचे साठे निर्माण करणे, अन्य प्राण्यांनाही संरक्षण देणे, जंगलावरची अतिक्रमणे हटवून जंगलांचे रक्षण करणे अशी व्यापक उपापयोजना अमलात आणल्याशिवाय हिंदुस्थान आणि आशिया खंडातल्या वाघांचे अस्तित्व राहणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या