
>> नामदेव सदावर्ते
समाजाचा प्रखर विरोध पत्करून, पचवून, विरोधकांच्या मत्सरी मनाला धक्का न लावता आपल्या कार्याशी समरस होणारी माणसेच क्रांतिकार्य करू शकतात. सनातनी समाजाने दीन-दलितांचा अनन्वितपणे छळ केला, त्यांना रूढी-परंपरांच्या हत्यारांनी जखमी केले. अशावेळी दीनांची माऊली म्हणून सावित्रीबाई फुले यांनी सेवाभावी वृत्तीने शैक्षणिक-सामाजिक काम केले. सार्वजनिक स्त्री शिक्षण कार्यात सक्रिय भाग घेणारी पहिली हिंदुस्थानी स्त्री म्हणून सावित्रीबाईंचा गौरव इतिहासाला करावाच लागेल. आजच्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त…
महाराष्ट्रात ज्यावेळी रूढी-परंपरांनी आणि घातक चालीरितींनी थैमान घातले होते, त्यांना नीरक्षीर न्यायाप्रमाणे बाजूला सारून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने पुण्यासारख्या बुद्धिवंतांच्या नगरीत आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची सुरुवात केली. जनसामान्यांची राखरांगोळी करणारे सनातनी, कर्मठ समोर दंड थोपटून उभे असताना त्यांना आपल्या कार्याने फुले दांपत्याने चोख उत्तर दिले. सत्यस्वरूप जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे स्वप्न साकार केले.
समाजाचा प्रखर विरोध पत्करून, पचवून, विरोधकांच्या मत्सरी मनाला धक्का न लावता आपल्या कार्याशी समरस होणारी माणसेच क्रांतिकार्य करू शकतात. सनातनी समाजाने दीन-दलितांचा अनन्वितपणे छळ केला, त्यांना रूढी-परंपरांच्या हत्यारांनी जखमी केले. अशावेळी दीनांची माऊली म्हणून सावित्रीबाई फुले यांनी सेवाभावी वृत्तीने शैक्षणिक-सामाजिक काम केले.
दीन-दलितांचा कर्दनकाळ झालेल्या जुलमी, स्वार्थी लोकांना धडा शिकविण्यासाठीच क्रांतिकारक जन्म घेत असतात. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म जणू याच समाजसेवेच्या क्रतासाठी झाला. 3 जानेवारी 1831 रोजी नेवसे दापत्याच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. सातारा जिह्यातील नायगाव या छोटय़ाशा खेडय़ात सुसंस्कारित घराण्यात त्यांचे सारे बालपण गेले.
बालपणापासून सावित्री या वडील खंडोजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून वागू लागल्या. स्वभावाने बंडखोर, समंजस व मृदुभाषिणी म्हणून त्या सर्वांना प्रिय होत्या. निर्भयपणे सत्याची कास धरून कार्य करण्याचा हट्ट बालपणीच त्यांनी शिकून घेतला. संकटाशी व दुःखाशी, विरोधकांशी झुंज देण्याची जिद्द त्यांच्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणूनच जोतिरावांसमवेत समाजहितासाठी विरोधाला न जुमानता त्या समाजकार्य करू शकल्या. पुण्याजवळील धनकवाडीच्या गोविंदराव गोरे यांचे सुपुत्र जोतिरावांबरोबर सावित्री यांचा विवाह इ.स. 1840 च्या फाल्गुन वद्य पंचमीस झाला.
त्या काळीच विलक्षण प्रयत्नवादी, जिज्ञासू आणि गुणग्राहक असलेल्या गोविंदरावांनी जोतिरावांना 1842 साली बुधवार पेठेतील इंग्रजी शाळेत दाखल केले. शिक्षण घेताना ते कधी कधी शेतामध्येसुद्धा रमू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना उत्तम इंग्रजी शिक्षणाचा लाभ झाला. पुण्यासारख्या ठिकाणी केशवपन व सती जाणे अशा जुनाट रूढींनी स्त्रियांना केविलवाणे जीवन जगावे लागत असे. इ.स. 1815 ते 1824 या काळात हिंदुस्थानात 552 स्त्र्ाया सती गेल्या. स्त्रियांना जबरदस्तीने सती जायला भाग पाडले जात असताना सावित्रीबाईंनी पाहिले. स्त्रियांनी शिक्षण घेतले तर त्या बिघडतात, धर्म भ्रष्ट होतो, ईश्वराचा कोप होतो अशी धर्ममार्तंडांची कोल्हेकुई ऐकून सावित्रीबाईंना प्रचंड संताप येत असे.
1 जानेवारी 1848 रोजी तात्यासाहेब भिडे यांच्या वाडय़ात जोतिराव फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली. विविध जातींच्या फक्त सहाच मुली या शाळेत होत्या. 15 मे 1848 रोजी पुण्यातच आणखी एक शाळा फुले यांनी सुरू केली. ध्येयवेडे जोतिराव ध्येय साकार करण्यासाठी धडपडत होते.
सावित्रीबाई यांनी स्वतः जोतिबांकडून शिक्षण घेतले व नंतर त्यांनी शिक्षिकेचे काम सुरू केले. जोतिबांनी सुरू केलेल्या शाळेच्या सावित्रीबाई मुख्याध्यापिका झाल्या. 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग वाडय़ात सावित्रीबाई व जोतिराव फुले यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी पुण्यातील विद्वान, शास्त्र्ााr-पंडित, प्रोफेसर्स, कलेक्टर, सावकार, ब्रिटिश अधिकारी वर्ग जमला होता. मेजर कँडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जोतिबांनी आपल्या सत्काराबद्दल ब्रिटिश सरकारचे आभार मानले.
परंपरागत अशिक्षितपणा पुसून टाकून सार्वजनिक स्त्री शिक्षण कार्यात सक्रिय भाग घेणारी पहिली हिंदुस्थानी स्त्री म्हणून सावित्रीबाईंचा गौरव इतिहासाला करावाच लागेल.
12 फेब्रुवारी 1853 रोजी फुले दापत्याने चालविलेल्या सर्व शाळांचा एकत्रित ‘बक्षीस समारंभ’ पुणे कॉलेजच्या चौकात मोठय़ा थाटामाटाने साजरा करण्यात आला होता. विष्णुशास्त्र्ााr चिपळूणकरांनी फुले दांपत्याच्या शैक्षणिक कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. मिसेस जोन्स यांच्या हस्ते मुलींना साडय़ा व पुस्तके वाटण्यात आली. प्रोफेसर फ्रेअर यांनी पाहुण्यांचे आभार मानले. मेजर कँडी यांनीही फुले दाम्पत्याचा सन्मान करून त्यांच्या समाजप्रबोधन कार्याचे व शैक्षणिक कर्तृत्वाचे कौतुक केले.
महात्मा फुले यांनी इ.स. 1873 मध्ये ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना केली. आपल्या लिखाणातून, वक्तृत्वातून ज्यांनी समाजाला जागृतीचे प्रखर तडाखे दिले अशा जोतिरावांचा जनतेने ‘महात्मा’ असा गौरव केला. 1890 साली महात्मा फुले यांचे निधन झाल्यावर ‘सत्यशोधक’ समाजाची सूत्रे हाती घेऊन सावित्रीबाईंनी आपले कार्य अखंडितपणे चालू ठेवले. 10 मार्च 1897 रोजी त्यांनीही या जगाचा निरोप घेतला. जोतिबांच्या कार्यात त्यांनी सावलीप्रमाणे साथ दिली. दीनांची माऊली म्हणून सावित्रीबाईंची नोंद इतिहासात कायम राहील.



























































