
>> डॉ. सुनिता बोर्डे-खडसे
काळाच्या किती तरी पुढे पाहणारा व त्यानुसार आपल्या राज्याचीच नव्हे तर देशाची पुनर्रचना करू इच्छिणारा एक समाजशील राजा, आद्य समाज सुधारक, परिवर्तनवादी कृतिशील विचारवंत महाराज सयाजीराव गायकवाड यांची 156 वी जयंती 11 मार्च रोजी त्यांचे जन्मगाव कौळाणे, मालेगाव येथे साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त त्यांच्या स्त्रियांविषयीच्या परिवर्तनशील कार्याचा वेध घेणारा हा लेख.
सयाजीराव गायकवाड महाराज म्हणजे हिंदुस्थानातील एक आद्य समाज सुधारक, परिवर्तनवादी कृतिशील विचारवंत, तत्त्ववेत्ता, देशभक्त, मानवतावादी आणि बुद्धिफ्रामाण्यवादी राजा होय. काळाच्या किती तरी पुढे पाहणारा व त्यानुसार आपल्या राज्याचीच नव्हे तर देशाची पुनर्रचना करू इच्छीणारा एक समाशील राजा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात दुर्लक्षित राहिला, हे दुर्दैवाने मान्य करावे लागते.
भारतीय समाज सुधारणा चळवळ ही तशी पाहता खरं तर ‘स्त्री सुधारणा चळवळ’ आहे असेच म्हणावे लागते; कारण या समाज सुधारणा चळवळीचे मुख्य केंद्रस्थान हे हिंदुस्थानी स्त्री आणि तिचे प्रश्न हेच होते. त्यामध्ये प्रामुख्याने स्त्री शिक्षण, सती फ्रथा, सक्तीचे वैधव्य, केशवपन, बालविवाह, जरठ कुमारी विवाह, बालिका हत्या या आणि अशा स्त्रीविषयक फ्रश्नांचाच समावेश होता. स्त्रीयांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यात महात्मा फुले, महर्षी कर्वे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे तसेच स्त्रीयांना घटनेने माणूसपणाचा अधिकार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींचे योगदान मोलाचे आहे. या सर्वच समाज सुधारकांना वेळोवेळी मदत करणारे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे स्त्री सुधारक म्हणून कार्यदेखील मोलाचे आहे. मात्र त्यांच्या स्त्रीविषयक सुधारणा कार्याची फारशी दखल घेतलेली नाही.
युरोपीय देशांच्या फ्रगतीचे मूळ हे त्यांच्या शैक्षणिक फ्रगतीत आहे असे महाराजांचे ठाम मत होते. म्हणूनच ते नेहमीच हिंदुस्थानी शिक्षण आणि त्यातही स्त्री शिक्षणाविषयी फ्रचंड आग्रही होते. स्त्रीया या देशाचा अर्धा भाग आहेत आणि त्यांच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही या विचारातून त्यांनी स्त्री शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरविले. त्यासाठी खास आदेश काढून मुलींसाठी शाळा सुरू केल्या. आर्थिक सहाय्य केले तसेच मुलींसाठी शिष्यवृत्तीही सुरू केली. म. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याला आर्थिक मदत केली. महाराष्ट्रातील कर्मठ लोकांकडून स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्याच्या होत असलेल्या छळाच्या पार्श्वभूमीवर बडोद्यातून महाराज सयाजीराव गायकवाड स्त्री शिक्षणासाठी देत असलेले प्रोत्साहन अनमोल होते. महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी तसेच मुंबई विद्यापीठास ठरावीक काळासाठी दरमहा पाचशे रुपये देण्याचे त्यांचे आदेश आदी बाबी त्यांची दात्री शिक्षणाची तळमळ अधोरेखित करणाऱया आहेत.
आर्थिक स्वावलंबन हा स्त्री स्वातंत्र्याचा मूळ पाया आहे अशी महाराजांची भूमिका होती आणि त्यामुळेच त्यांनी मुलींना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठीदेखील विशेष फ्रयत्न केले. आपली कन्या राजकुमारी इंदुमती यांनादेखील महाराजांनी चांगले शिक्षण दिले. इतकेच नव्हे तर तत्कालीन बालविवाह फ्रथेस झुगारून आपल्या कन्येचा विवाह वयाच्या विसाव्या वर्षी आणि तोही राजकुमारीच्या स्वतःच्या इच्छेने त्यांच्या इच्छित वराशी करून दिला व त्यानिमित्ताने बालविवाह प्रथेविरुद्ध एक आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले. आपल्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सक्तीच्या शिक्षणाची सर्वात पहिल्यांदा अंमलबजावणी करणारे महाराज खरोखर एक थोर शिक्षण सुधारक होते.
स्त्री शिक्षणाविषयी महाराजांचे विचार आणि तळमळ विलक्षण होती. होळकर महाराजांना लिहिलेल्या पत्रातील त्यांचे स्त्री शिक्षणाविषयीचे विचार खरंच मुळातून वाचण्यासारखे आहेत. त्यात त्यांनी होळकर महाराजांच्या राणी साहेबांच्या शिक्षणाविषयी समाधान व्यक्त केले होते. राणी साहेबांना शिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि वेळ उपलब्ध करून द्यावात असेही पुढे सांगायला महाराज विसरले नाहीत हे विशेष . ‘‘It pays us to educate our ladies sensibly, women represent half the population of our country; and one cannot really do good without them.’’ स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुलींना शिष्यवृत्ती सुरू करणारे महाराज, राणी चंद्रावती यांना लिहिलेल्या पत्रात स्त्री शिक्षणाविषयी अतिशय मोलाचे विचार मांडणारे महाराज, उत्कृष्ट ग्रंथांची मातृभाषेत भाषांतरे करवून घेणारे महाराज अशी महाराजांची किती तरी रूपे अक्षरश: थक्क करायला लावणारी आहेत. स्त्री सुधारणेसंदर्भात महाराजांचे विचार आणि कार्य पाहता ‘स्त्रीयांचे सुधारक’ म्हणून महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकणे आणि जास्तीत जास्त संशोधन होणे गरजेचे आहे.
स्त्री शिक्षण या महत्त्वाच्या प्रश्नाबरोबरच महाराजांनी बालविवाह, सक्तीचे वैधव्य यासारख्या कुप्रथांविरोधातदेखील कायदे केले. महाराजांनी आपल्या राज्यात बालविवाहास कायद्याने बंदी घालून वधूची किमान वयोमर्यादा बारा वर्षे इतकी केली. त्याच्या आत विवाह केल्यास कडक शिक्षा व दंड करण्याची तरतूद करून स्त्रीयांना कायद्याने संरक्षण दिले. एवढेच करून न थांबता सक्तीच्या वैधव्याच्या क्रूर प्रथेसदेखील त्यांनी विरोध करून विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. आपल्या आदेशात ते म्हणतात की, विधवांनी आयुष्यभर एकटे राहणे अन्यायकारक आहे. म्हणून आम्ही विधवा विवाहाला मुभा देण्याचा कायदा करत आहोत. तसेच विधवांशी विवाह करणाऱयास मदत करण्याचेही आमचे धोरण राहील. महाराज फक्त कायदे करूनच थांबले नाहीत तर बडोद्यातील कर्मठ लोकांचा विरोध असतानादेखील त्यांनी गणेश भाटे यांचा लीलाबाई या विधवेशी सरकारी खर्चाने मोठय़ा धुमधडाक्यात पुनर्विवाह लावून दिला.
आज स्त्रीयांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर उत्तरे सांगताना ‘स्त्रीयांनी सातच्या आत घरात यावे, घराबाहेर कुणाच्या सोबतीशिवाय पडू नये’ असे उपाय सांगितले जातात. याचाच अर्थ स्त्र्ायांना घरात कोंडणे आणि त्यांच्यावर अन्याय करू शकणाऱया पुरुषांना मात्र मोकाटपणे फिरण्याची मुभा देणे अशी व्यवस्था आजही दिसून येते. महाराजांनी आपल्या एका पत्रात आपल्या मंत्र्यांना याविषयी आदेश दिले होते की, आपल्या राज्यातील स्त्रीयांना मुक्तपणे, स्वतंत्रपणे आणि निःसंकोचपणे बाहेर फिरता यावे, बागबगीचे यांना भेट देऊन मनमुराद आनंद लुटता यावा म्हणून आठवडय़ातील एका ठरावीक दिवशी राज्यातील सर्व बागबागीचे व सार्वजनिक ठिकाणे पुरुषांसाठी बंद ठेवून तिथे फक्त स्त्रीयांना फ्रवेश देण्यात यावा, जेणेकरून स्त्रीया कोणत्याही दडपणाशिवाय या ठिकाणी भेट देऊ शकतील. महाराज स्त्री स्वातंत्र्याचे किती खंदे पुरस्कर्ते होते हे यावरून दिसते.
स्त्रीयांचे आरोग्य हा विषयदेखील महाराजांच्या नजरेतून सुटलेला नव्हता. त्यांनी आपल्या राज्यात स्त्रीयांसाठी प्रसूतिगृह सुरू केले. गर्भवती मातांचे आरोग्य चांगले राखणे ही केवळ कौटुंबिक जबाबदारी नसून ती एक सामाजिक आणि राष्ट्रीय जबाबदारी आहे असे त्यांचे मत होते. फ्रसूतिगृहांतून स्त्रीयांना सर्व आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळून त्यांचे बाळंतपण सुखरूप व्हावे यासाठी औषधे आणि आर्थिक मदतीबरोबरच प्रशिक्षित सुईणींची मानधनावर नेमणूक केली गेली होती. महाराजांच्या स्त्री सुधारणेसंदर्भातील कार्यावर संशोधन होऊन हे कार्य सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण महाराज सयाजीराव गायकवाड हे खरोखर एक महान स्त्री सुधारक आणि उद्धारक होते.
(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत.)




























































