शिक्षणाचे वय आणि सवय

>> दिलीप जोशी

या महिन्याच्या 11 तारखेला राष्ट्रीय शिक्षण दिवस होता. देशभरात किती साक्षर, किती शिक्षित वगैरेची आकडेवारी नेटवर मिळू शकते. प्रश्न असतो शिकण्याचा. जगात एकेकाळी निरक्षरांची संख्याच जास्त होती. खरं तर मानवी जीवनाच्या उत्क्रांतीच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये सारे निरक्षर होते. अनेक भाषांची निर्मिती आणि विकास जसजसा होऊ लागला तेव्हा आधी संभाषण आणि मग लेखन या क्रमाने अक्षरं अस्तित्वात आली. त्यामुळे जगातल्या सर्वच संस्पृतींमध्ये पाठांतरातून प्रवचनातून काव्य, कथा, विचार या गोष्टी एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे आल्या. अक्षर अवतरल्यावर त्या त्या भाषेतला आविष्कार मुखोद्गत न करताही ‘ग्रथित’ करता येऊ लागला आणि ग्रंथ सिद्ध झाले.

पुढे शिक्षण पद्धतीत विविध बदल झाले. अनेक विषय, भाषा, गणित, विज्ञान यांच्या उत्क्रांतीबरोबर वाढत गेले. तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम झाले. शिकण्याची साधनं बदलली धुळपाटी दगडी पाटीपासून सुरू झालेली शिक्षण प्रक्रिया आता लॅपटॉप किंवा ‘टॅब’पर्यंत पोचली आहे. शिक्षणाची माध्यमं बदलत ‘ऑनलाइन’ किंवा दूरस्थ शिक्षणाचा जमाना आला आहे. तंत्रज्ञान सर्वदूर उत्तर प्रकारे पोचलेलं असेल तर ‘ऑनलाइन’ आदान-प्रदान शक्य असल्याचं ‘कोरोना’ काळात सर्वांनीच अनुभवलंय.

अर्धशतकापूर्वी ‘ऑनलाइन’ संभाषण पह्नच्या माध्यमातून होतं पण दृश्राव्य शिक्षण घेता येईल या स्वप्नवत गोष्टी होत्या. 1970च्या दशकात काॅम्प्युटरचा विकास विकास होत होता. 1990 नंतर त्याला गती आली आणि एकविसाव्या शतकात जग संपर्क क्षेत्रात ‘जवळ’ आलं. आमच्या लहानपणी साधारण चौथीपर्यंत दगडी पाटी, पेन्सिल आणि फार तर एखाद् दोन छोटी पुस्तपं एवढंच शाळेचं ‘दप्तर’ असायचं. पाटीवर लिहायचं, लक्षात ठेवायचं आणि पाटी कोरी करून नवा विषय सुरू करायचा अशी पद्धत. एकच शिक्षक भाषा, व्याकरण, गणित, विज्ञान शिकवत. चित्रकला, गायन, ‘पीटी’ला मात्र वेगळे शिक्षक, शाळा तशी सोपी आणि रंजक पद्धतीने शिकवणारी होती. अभ्यासाच्या एका तासाला (पस्तीस मिनिटे) सारा वर्ग शिक्षकांसह मराठी, इंग्लिश कविता एका सुरात गात असे.

काळाच्या ओघात ‘पाटी’ जवळजवळ अस्तंगत झाली आणि पुस्तकांचा, वर्पबुकांचा भार, विद्यार्थ्यांना पेलवणार नाही इतका वाढला. त्यातून ज्ञानसंपन्नता नेमकी किती वाढली याचं गणित या क्षेत्रातील तज्ञच सांगू शकतील. पठडीतल्या शिक्षण पद्धतीत बदल करायला हवा असं प्रत्येक काळात म्हटलं गेलच. खेडोपाडय़ातल्या कष्टकरी घरातल्या मुलांसाठी त्यांच्या वस्तीवरच्या, शेतावरच्या शाळेचेही प्रयोग झालेच. कोणत्या का पद्धतीने असेना शिक्षण देणं आणि घेणं महत्त्वाचं.

माणसं निरक्षर होती तेव्हाही ‘अडाणी’ नव्हती. त्यांच्या उद्योग-व्यवसायाचं ज्ञान त्यांना होतच. होम सायन्स किंवा कॅटरिंगचं काॅलेज येण्यापूर्वी विविध प्रकारच्या स्वयंपाकाची आणि खाद्यपदार्थांची निर्मिती होतच होती. शेतकी काॅलेजं निघण्यापूर्वीही हजारो वर्षें शेतकरी त्याच्या पीक-पाण्याच्या अनुभवजन्य ज्ञानावर आधारित उत्तम पिकं घेतच होते. कलाकार, वास्तुतज्ञ, तंत्रज्ञ, इंजिनीअरिंगच्या वर्गात न बसताही विविध वस्तूंपासून कलात्मक वस्तूंची निर्मिती करतच होते. माणूस त्याच्या उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यापासून सातत्याने नवं काही शिकत आला आहे.

तरीही शाळा, काॅलेज आणि विशिष्ट विषयातला अधिक अभ्यास (स्पेशलायझेशन) या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. त्यामुळे शिक्षणक्रमात शिस्त आली. शिक्षण सार्वत्रिक झालं. शिकण्याची इच्छा असणाऱया कोणासाठीही शाळांचे दरवाजे उघडले. कोणी कोणतं शिक्षण घ्यावं हा त्या विषयातली आवड (ऑप्टिटय़ूड) ठरवून शिकता येऊ लागलं. त्यामुळे ‘जुन्या’च्या अनुभवावर ‘नव्या’ची इमारत विकसित होणं अपरिहार्य होतं. मग शिक्षण पद्धतीत शाळेत दाखल होण्याचं ‘वय’ निश्चित झालं. मी सहाव्या वर्षी शाळेत गेलो. आता मुलं तिसऱया वर्षापासून शिकतात. आम्ही त्या बालवयात निसर्ग परिचयाचं शिक्षण घेतलं असं म्हणूया.

काही कारणाने ठरावीक वयात शिक्षण घेणं शक्य झालं नसेल, पण नित्यनवीन शिकण्याची आवड आणि सवय असेल तर कोणत्याही वयात ‘विद्यार्थी’ होता येतं. ‘शांतीनिकेतना’ स्वतंत्र शिक्षण पद्धती साकारणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (ठापूर) वयाच्या साठीनंतर चित्रकला शिकले! अशा मोठय़ा व्यक्तींच्या उदाहरणाप्रमाणेच आपला मुलगा किंवा नातवाबरोबर जिद्दीने एसएससी होणाऱयांचीही स्फूर्तिदायक उदाहरणं आहेत. शिक्षण कधीही घ्यावं! नव्हे आपण ते नकळत घेतच असतो, पण शैक्षणिक शिस्तीने ते घेतलं तर अधिक परिणामकारक ठरतं. अपेक्षा एक व्यक्ती शिक्षणाने माणसाला प्रगल्भता येऊन त्याच्या हातून मानवजातीसाठी विधायक कार्य घडावं ते कोणी साध्य केलं हे शिकत राहण्यानेच समजलं.

आपली प्रतिक्रिया द्या