लेख – ओझे दप्तराचे की दडपणाचे?

450

>> राजन वसंत देसाई ([email protected])

मुलं जन्माला आली की फक्त दुडूदुडू चालायचा अवकाश, मॉण्टेसरी नावाच्या एका विश्वात ते मूल प्रवेश करते. पाटी, पुस्तक, वही काहीतरी ओरखडे काढते. त्यात जगाचा नकाशा दिसतो, काऊचिऊ दिसतात… हे सर्व सोपस्कार करत असताना ‘दप्तर’ नावाचं एक लोभसवाणं ओझं आपसूकच पाठीवर येते. माझी पिढी किंवा माझ्या अगोदरच्या अनेक पिढय़ा हे लोभसवाणं ओझं विद्यार्थी दशेत कायमच पाठीवर घेऊन फिरत आहेत. अर्थात दप्तराचे ओझे म्हणजे काही माथाडी कामगार किंवा गाढवांच्या पाठीवरचे ओझे नसून ज्ञानाच्या भांडाराचे गाठोडे पाठीवर घेत आहेत. हे हल्लीची पिढी विसरत का आहे?

याला महत्त्वाचे कारण म्हणजे, बदलती जीवनशैली, सुसंस्कृत समाजाचे अधःपतन. स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा काढला जातोय. स्वैराचाराचा रोग समाजात पसरत चालला आहे. मोबाईलचा अतिवापर, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा नको तेवढा ‘स्पीड’, भ्रष्टाचारांचे उदात्तीकरण अजूनही जातीपातीचे राजकारण व्यक्तीपूजा (फक्त) व्यक्तिमत्त्वाची तर नाहीच. वैफल्यग्रस्त तरुण पिढी याच दडपणाखाली आजचा समाज पोसला जातोय. मार्कातली टक्केवारी वाढली, ज्ञानातली खोलवर मुरणारी माती संपली. सगळय़ा नात्यांची पाषाणरूपी शिल्पे उभी राहिली आहेत. वेग वाढला, पण ज्ञानकक्षा मंदावली. नवनवीन शोधांची मालिका मोठी झाली आहे, पण सामाजिक, नैतिक मूल्यांचा ऱहास होताना दिसत आहे. याला कारण शालेय शिक्षणाचे आज ओझे वाटत आहे. आजकालची मुले कुठे पाठीवर दप्तर घेऊन जातात? त्यांचे आईवडीलच ओझी घेऊन फिरतात किंवा स्कूल बस असते. नाही तर घरी नोकरचाकर असतात. आज शिक्षण सोपे झाले आहे. मार्कांचे ओझे लीलया उचलतात, पण कॉलेज ऍडमिशनचे दडपण सर्वत्र कुटुंबावर आहे. वस्त्र्ा परिधानतेत सुंदरता आली. कलाकुसर आली, पण सोज्वळता संपली. बॉबकट, बॉयकटचे दिवस आले. मग ज्ञानाचे ओझे का वाटणार नाही. लायब्ररीत चार चार तास बसून अभ्यास करण्याचे दिवस संपले. कोणताही विषय, त्यातील बातमी एका मोबाईलच्या क्लिकवर विकिपीडियामार्फत सहजरीत्या मिळते. तरीही ओझे का वाटावे? कारण आजच्या विद्यार्थी हा वहय़ा-पुस्तकांच्या दप्तराने नव्हे तर बदललेल्या तणावग्रस्त विचारसरणीने दडपणाखाली आहे. ज्ञानाचे भांडार पाठीवर न वाटता ज्ञानाचे गाठोडे पाठीवर आहे याचा अभिमान बाळगणे ही काळाची गरज आहे. आजची पिढी ही मागील पिढीपेक्षा नक्कीच वेगवान आहे, पण वेगाला मर्यादा असावीच लागते. त्याला शास्त्र्ाशुद्ध कसोटीची जोड असावी लागते. यासाठी गरजेची आहे ती ध्यानसाधना आणि खोलवर रुतणारी विषयाची अभ्यासक दृष्टी. या सर्वच गोष्टींचा जर खोलवर विचार केला तर असे दिसून येईल की, नाश पावत असलेली माती आणि बाणा सतत विवंचनेत आणि भरकटलेला मेसेज- सत्य, असत्य पडताळून न पाहता व्हायरल होणारे मेसेज-अतिचिडचिडपणा, कुटुंब पद्धतीलाच जाणारे तडे याचाच भार आजच्या एकंदरीतच समाजाला होतोय. या दप्तरांचे ओझे मागील पिढीला कधीच वाटले नाही. भरपूर वहय़ापुस्तके, दिवाळीची स्वतः बनवलेली वही (आजकालच्या सजवलेल्या वहय़ा या बहुवंशी आईवडीलच बनवतात.) मुलं मोबाईल व पब्जी, ब्लु व्हेल वगैरे गेम्स खेळताना दिसतात. पूर्वी दिवाळी, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मनसोक्त हुंदडणे, पोहणे, सायकलिंग, धमाल मस्ती, मौज असायची. घरात एकटे कमावणारे असले तरी बाबांनी स्वतःच्या हौसेमौजेला बाजूला सारून आम्हाला नवीन कपडे आणल्यावर सुख आणि आनंद उपभोगताना आमच्या चेहऱ्यावर असलेल्या आनंद आईवडिलांच्या डोळय़ातून तरळताना आम्ही पाहिलाय. त्यामुळे आपल्या आईवडिलांना दुःख देण्याचा विचारसुद्धा आम्हाला कधी स्पर्श करत नाही. आम्हाला त्यांचा भार किंवा ओझे वाटत नाही. हा वेग आणि काळ यातला फरक आहे. म्हणून आताच्या पिढीच्या आईवडिलांनी आणि सरकारने मुलांच्या पाठीवरच्या ओझ्याचा बाऊ करू नये. कष्टाची सवय लावा. मोबाईलवर दिवसाचे पाच-सहा तास मान मोडून पाठीचा कणा वाकला आहे. त्यापेक्षा त्यांना मैदानी खेळ खेळायला लावा. सकस आहार व निसर्गाच्या सान्निध्यात न्या. हे वाटणारे दप्तरांचे ओझेच मनावरचा भार कमी करण्याच्या कामी येईल. ते ज्ञानाचे भांडार, गाठोडे सतत पाठीवर असूद्या. तेच आपल्याला ध्येयप्राप्तीला नेणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या