मातृभाषेतून विज्ञान

210

>> शैलेश माळोदे

विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून विज्ञान शिकवले तर ते अधिक सोपे जाईल आणि विज्ञानाची आवडही उत्पन्न होईल….

इंग्रजी ही जागतिक विज्ञान क्षेत्राची भाषा असून संज्ञापनाची मुख्य भाषा आहे. तरीही जगात बहुतांश प्रगत राष्ट्रांमधील मुख्य शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून दिलं जातं. अर्थात त्यांची इंग्रजीवरदेखील बऱयापैकी पकड असत़े परंतु मूलभूत शिक्षण मातृभाषेतूनच व्हायला हवं कारण त्यामुळे मूळ ओरिजल विचार प्रक्रिया चांगल्या प्रकारे विकसित होते. अन्यथा ते केवळ कॉपी करणारे (इमिटेटर) होतात. काहीजणांचे यासाठी अपवाद असले तरी बहुतेकवेळा विज्ञानासहित कुठल्याही विद्याशाखेचे विद्यार्थी स्वतःपासून तुटतात. मग या समस्येवर उपाय काय? उपाय अगदी सोपा साधा आहे. आज आपण केवळ पुस्तकांच्या लिखित साहित्य वापरून शिकण्याच्या पद्धतीपासून खूप पुढे आलो आहोत. एकाचवेळी इंग्रजी भाषेतील अभ्यास मजकूर मातृभाषेत एकाच वेळी उपलब्ध झाल्यास खूपच सुलभ जाईल. हे कठीण वाटत असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. हिंदुस्थानच्या शिक्षण क्षेत्रातील विशेषतः विज्ञानक्षेत्रातील पाठय़पुस्तकांचा वापर कसा अधिक फायदेशीर करता येईल या प्रश्नाचं उत्तर देताना प्रा. के. विजयराघवन यांनी हे मत व्यक्त केले. प्रा. कृष्णास्वमी विजयराघवन सध्या देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आहेत. 26 मार्च 2018 रोजी त्यांनी या पदाचा पदभार डॉ. आर. चिदंबरम यांच्याकडून स्वीकारला. देशाचे एक प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा. के. विजयराघवन यांना 2013 साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आलं होते.

2009साली विज्ञानासाठी इन्फोसिस पारितोषिक प्राप्त करणारे प्रा. के. विजयराघवन यांनी 31 ऑगस्ट रोजी नववे डॉ. एच. एन. सेठना स्मृती व्याख्यान नेहरू सेंटरमध्ये ‘मेकिंग इंडिया फ्यूचर-रेडी द रोल ऑफ सायन्स, टेलॉजी ऍण्ड इनोव्हेशन’ या विषयावर दिलं. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. 28 जानेवारी 2013 ते फेब्रुवारी 2018 पर्यंत त्यांनी जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून देशाच्या जैव तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा आणि नीती निर्देशन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मूलतः रासायनिक अभियंता असलेल्या प्रा.विजय राघवन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1954 रोजी झाला. ते 2013 पर्यंत राष्ट्रीय जैवविज्ञान केंद्राचे संचालक होते. या केंद्राची स्थापना करण्यातदेखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बंगळुरू येथील या केंद्राच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांनी 1997 साली स्वीकारली. तत्पूर्वी ते 1988 पासून मुंबईच्या टीआयएफआरमध्ये कार्यरत होते.

आयआयटी कानपूरमधून 1975 साली बीटेक आणि 1977 साली एम. टेक पदवी प्राप्त केल्यावर टीआयएफआरमधून रेजवीय जीवशास्त्रत संशोधन करून पीएचडी संपादन केली. त्यानंतर पोस्ट डॉक्टरल कार्यासाठी 1984 ते 1985 पर्यंत ते रिसर्च फेलो होते आणि नंतर 1986 ते 1988 याबाबत कॅल्टेक (यूएसए)मध्ये सीनिअर रिसर्च फेलो म्हणून काम केलं. 1992 साली ते एनसीबीएस (तेव्हा टीआयएफआरच्या अखत्यारीत होतं) मध्ये रुजू झाले. 1995 मध्ये ते बेंगळुरूला शिफ्ट झाले. डेव्हलपमेंटल जेनेटिक्सचे प्रथितयश प्राध्यापक असलेले प्रा. के. विजय राघवन हे विकसन जीवशास्त्र, अनुवांशिकी आणि चेता अनुवांशिकी क्षेत्राचे तज्ञ मानले जातात. त्यांचं संशोधन प्रामुख्यानं चेतासंस्थेचं नियंत्रण करणाऱया महत्त्वाच्या तत्त्वे आणि यंत्रणांविषयी असून याविषयी सांगताना ते म्हणाले, ‘प्राण्याच्या विकासचक्रात अशा यंत्रणांची नेमकी भूमिका काय असते हे जाणून घेणं खूपच महत्त्वाचं. विशिष्ट प्रकारे हालचाल होण्यासाठी शरीराच्या विशिष्ट भागाला संदेश पाठविलं जातात. त्यासाथी ड्रासोफिला माशीवर संशोधन करून एक प्रारूप बनविण्यात आलं. या फळमाशीच्या शारीरिक रचनेच्या प्रत्येक भागाच्या अभ्यासातून चेतास्नायूंची कनेक्टिव्हिटी आणि शारीरिक हालचाल याबाबतचे पॅटर्न समजावून घेत संशोधन पुढे गेलं.

टीआयएफआरच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरेटिकल सायन्सेसच्या व्यवस्थापन मंडळावर प्रा.विजय राघवन कार्यरत असून ते विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या व्यवस्थापन, शैक्षणिक आणि संपादकीय मंडळांवर कार्यरत आहेत. इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे मानद सदस्यत्व (1997), भटनागर पारितोषिक (1998) आयआयटी कानपूरचा माजी विद्यार्थी पुरस्कार (2003) आणि 2006 मध्ये जे. सी. बोस फेलोशिप प्राप्त झालेल्या प्रा.विजयराघवन यांना 2012 मध्ये एच.के.फिरोदिया पुरस्कारही प्राप्त झालाय.

ट्रान्सलेशनल स्कूलची सुरुवात करण्याचा मानस असून त्यासाठी विविध राज्य सरकारे आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहयोग घेण्यात येतोय. मशिनद्वारे भाषांतर आणि मानवी प्रयत्नांचं भाषांतर यांची योग्य सांगड घालून आपण आपल्या ज्ञानकक्षा रुंदावू शकतो. त्यासाठी केवळ इंग्रजी भाषेची गरज नाही. जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजी शिकणं चांगलंच आहे. मात्र तेच फक्त साध्य नाही. मायक्रोसॉफ्ट इजरायल हिब्रू भाषेत काम करून जगातल्या सर्व सहयोगी कंपन्यांबरोबर ताळमेळ राखत काम करतं. मायक्रोसॉफ्ट इंडियाद्वारे मात्र इंग्रजीतच काम होतं. त्याचा काही खास वेगळा कायदा नाही असे प्रतिपादन करत प्रा.के.विजय राघवन पुढे म्हणाले. पण खरी आव्हानं देशापुढे उभी ठाकत आहेत ती आपल्या शीवनशैलीत, आहारात आणि आपल्या वागण्यात झालेल्या बदलांमुळे. बैठी जीवनशैली वाढल्यामुळे संसर्गजन्य रोगांच्या धोक्यांबरोबरच अतिरिक्त धोके निर्माण होऊ लागल्याचं दिसतं. आपली जनुकं अशा स्थितीत विकसित झालीत त्यानुसार आपल्याला अधिक शारीरिक श्रम करायला हवेत आणि अन्नपदार्थदेखील अधिक प्रथिनयुक्त हवेत. नवीन पिढीनं याबाबत संशोधन करून नवीन पर्याय शोधायला हवेत, परंतु मागचा इतिहासदेखील लक्षात घ्यायला हवा. असे हे पारंपरिक वैज्ञानिक ज्ञान आणि आधुनिक गरजांची सांगड घालण्याचा आग्रह करणारे 65 वर्षीय प्रा.के.विजयराघवन, केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या