आभाळमाया – ‘गुरू’चे वैज्ञानिक दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

गुरू  हा आपल्या सौरकुळातला सर्वात मोठा ग्रह. खरं तर नुसत्या म्हणजे दुर्बिणीशिवाय केलेल्या निरीक्षणातून प्राचीन हिंदुस्थानी खगोल अभ्यासकांनी हा ग्रह ‘गुरू’ म्हणजे मोठा आहे हे कसं ठरवलं हे एक कोडेच आहे. वास्तविक आकाशात अधिक तेजस्वी दिसतो तो शुक्र. राशींच्या आकाराच्या पार्श्वभूमीवर हळूहळू सरकताना दिसतो तो शनी. कारण ‘शनैः शनैः चरति सः शनैश्चरा’ म्हणजे हळू चालणारा ग्रह. मंगळ त्यावरच्या लोहतत्त्वामुळे निखाऱयासारखा लाल दिसतोच. त्यामुळे तोही अंगारक हेही ठीक, पण ‘गुरू’ हा आकाराने मोठा असल्याचं योग्य निरीक्षण कसं केलं गेलं असेल?

गुरू ग्रह पृथ्वीच्या अकरापट मोठा आहे. त्यामध्ये एवढय़ा पृथ्वी सामावतील असा त्याचा व्यास. मंगळापर्यंतचे (पृथ्वीसकट) चार ग्रह हे घन आहेत. म्हणजे त्यांचा पृष्ठभाग दगडी आहे, परंतु गुरूपासूनचे पुढचे ग्रह हे वायुरूप आहेत. त्यामुळे त्यावर वस्ती वगैरे करणं शक्यच नाही. त्यातल्या त्यात मंगळच पृथ्वीसारखा आणि वसाहतयोग्य असू शकेल याची खात्री पटल्याने आता काही व्यावसायिक अंतराळ पर्यटन कंपन्याही तिथे जाण्याची स्वप्नं पाहत आहेत. आपल्या सूर्यमालेतलं ते शेवटचं वस्तीस्थान. त्यापुढे गुरू-शनीच्या ‘चंद्रां’वर म्हणजे उपग्रहांवर वसतीयोग्य काही आढळलं तरी तिथे पोहोचून राहणं वाटतं तेवढं सोपं नाही. अर्थात विज्ञान नेहमी कठीण आव्हानंच स्वीकारत असतं, पण ती खूप पुढची गोष्ट. आधी मंगळ तर पादाक्रांत होऊ द्या?

… तर सूर्यापासून सुमारे 78 कोटी किलोमीटर आणि पृथ्वीपासून साधारण 63 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला ‘गुरू’ गेल्या 26 सप्टेंबरला पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता. माझ्या बहिणीने गिरगाव चौपाटीवरून या ठळक गुरूचं दर्शन घेऊन फोन केला, पण आमच्याकडे आकाश ढगाळलेलं होतं. त्यामुळे नंतर आठवडाभराने दुर्बिणीतून गुरूचं निरीक्षण केलं. तसं गेल्या चाळीस वर्षांत ते अनेकदा केलंय, पण प्रत्येक वेळी तेवढाच आनंद मिळतो याचं कारण म्हणजे पृथ्वीवरचे संदर्भ सोडून विराट विश्वात डोकावताना एक निराळीच अनुभूती जाणवते.

सध्या गुरूची प्रतियुती (ऑपॉझिशन) स्थिती आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य आणि दुसऱया बाजूला गुरू ग्रह आहे. या काळात पृथ्वीपासून सुमारे 63 कोटी किलोमीटरवर असलेला गुरू तीन-चार कोटी किलोमीटर अंतराने जवळ येतो म्हणजे पृथ्वीपासून साधारण 59 किलोमीटरवर दिसतो. अवकाशातील या प्रचंड अंतराची आकडेवारी चकीत करणारी असते. तिथे पाच-दहा कोटींचा हिशेब तर अगदी क्षुल्लक ठरतो. अतिदूरची अंतरं प्रकाशवर्षात मोजली जातात. सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने प्रवास करणारा प्रकाश आपल्या एका वर्षात 9 हजार 460 अब्ज किलोमीटर प्रवास करतो. त्याच्या या गतीने आपण ऍन्ड्रोमिडा किंवा देवयानी या आपल्या शेजारील दीर्घिकेकडे (गॅलॅक्सी) निघालो तर तिथे पोचायला 22 लाख वर्षे लागतील. बावीस प्रकाशवर्षे. हे सारंच अब्जावधींच्या पाढय़ांमध्ये मोजलं जातं हे लक्षात आलं की, ज्ञात विश्वाच्या (जे केवळ 4 टक्के आहे) त्याचा अंदाज येतो आणि त्यामुळे आपल्या अस्तित्वाचं अमूल्यपण अधिकच अधोरेखित होतं…. पण हे सारं उत्सुकतेने जाणून घेतलं तर!

पावसाळा संपता संपता आकाश निरभ्र होईल आणि प्रकाश प्रदूषण नसलेल्या जागी जाऊन नुसत्या डोळय़ांनी किंवा दुर्बिणीच्या सहाय्याने आकाशदर्शन करता येईल अशी आम्हा खगोल मंडळींची अपेक्षा आहे. गेल्या दोन वर्षांचा अवकाश अभ्यास कोविड काळाने गिळला. यंदा तरी ‘झाले मोकळे आकाश’ तर प्रयत्न करू. सध्या पूर्व क्षितिजावर संध्याकाळी गुरू, शनी, मंगळ असे मातब्बर ग्रह दिसू लागलेत. शुक्र पहाटेच्या वेळी दिसेल आणि सूर्यतेजाच्या जवळ असलेला बुध दुर्बिणीशिवाय दिसणं दुरापास्त.

गुरू मात्र छान दिसतोय. शक्तिशाली दुर्बिणीतून त्यावरचे  क्रिकेटच्या सीझन बॉलवर असलेल्या शिवणीसारखे पट्टे दिसतील आणि सुमारे तीन पृथ्वी सामावतील एवढा गुरूच्या दक्षिण गोलार्धातला ‘रेड स्पॉट’ही न्याहाळता येईल.

हा ‘रेड स्पॉट’ म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ांच्या उलटय़ा दिशेने (काऊण्टर क्लॉकवाइज) शतकानुशतके घोंघावणारं एक महाप्रचंड वादळ आहे. गुरूवरच्या या वादळाचं निरीक्षण दुर्बिणीचा शोध लागल्यापासून अनेकदा केलं गेलंय. त्याचे फोटो मात्र 1979 मध्ये व्हॉएजर-2 यानाने प्रथमच घेतले. आता अवकाशात गेलेल्या अधिक शक्तिशाली ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ने गुरूचे, त्यावरील महावादळाचे अप्रतिम फोटो नुकतेच घेतले आहेत.

येत्या काही दिवसांत आकाश निरभ्र झाल्यावर खगोल मंडळ मुंबई परिसरात आणि नाशिक येथे संध्याकाळी गुरू, शनीचं मनोहारी दर्शन दुर्बिणीद्वारे विनामूल्य घडविणार आहे, असं मंडळाचे मिलिंद काळे यांनी सांगितले. तेव्हा एवंगुणविशिष्ट गुरूचे आणि शनी-मंगळाचेही वैज्ञानिक दर्शन घेण्याची संधी लाभली तर सोडू नका. दुर्बिण नसली तरी खेडोपाडय़ांतील निरभ्र अवकाशात हे ग्रह सहज दिसतील आणि मनाला आनंद देतींल.

[email protected]