प्रासंगिक : नारळीकर सरांविषयी…

84

>> प्रदीप म्हात्रे

ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. जयंत नारळीकर आज  वयाची ऐक्याऐंशीं  वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्ताने मराठी विज्ञान परिषदेत काम करीत असताना नारळीकर सरांविषयीच्या आठवणी लिहून काढाव्यात अशी कल्पना मनात तरळून गेली. त्यातील काही आठवणी…

मराठी विज्ञान परिषदेच्या तत्कालीन प्रकल्पांवर ‘आढावा सभा’ 28 जून 1996 रोजी होती. त्या सभेला परिषदेच्या आजी-माजी पदाधिकाऱयांची मांदियाळी जमली होती. साहजिकच नारळीकर सरांचा त्यामध्ये समावेश होता. दुपारी नारळीकर सर रेल्वेने पुण्याला परतणार होते. त्यामुळे सरांना चुनाभट्टी स्टेशनपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देशपांडे सरांनी माझ्यावर सोपवली होती. त्याप्रमाणे देशपांडे सरांच्या गाडीतून मी त्यांना घेऊन गेलो. नारळीकर सरांनी मागच्या सीटवर बसण्याऐवजी ड्रायव्हरशेजारी बसणे पसंत केले. त्या काळात स्वतःच्या मालकीच्या गाडीत मागे बसण्याचा शिरस्ता होता. (आता काळ बदलला आहे.) नारळीकर सर पुढच्या सीटवर बसल्याने मी मागच्या सीटवर अवघडलो होतो. स्टेशनवर पोहोचताच मी प्रथम दर्जाचे तिकीट काढून दिले. प्लॅटफॉर्मवर जाताना तिकीट तपासणार्‍याने नारळीकर सरांना ओळखले आणि ते त्यांना त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. केबिनमध्ये जाणे मला प्रशस्त वाटले नाही. साहजिकच मी त्या केबिनबाहेरच थांबलो. शेजारच्या स्टॉलवरून सरांकरिता शीतपेय मागवले गेले. त्यावेळी नारळीकर सरांनी मी त्यांच्यासोबत असल्याचे संबंधितांना लक्षात तर आणून दिलेच, पण मलाही शीतपेय देण्याविषयी सूचना केली. या प्रसंगावरून सरांचा मोठेपणा लक्षात येईल.

2003 साली नारळीकर सरांना त्यांच्या ज्येष्ठ कन्येसह मुंबईहून पुण्याला जायचे होते. सर कुलाब्याहून तर त्यांची कन्या तिच्या छकुलीसह बोरिवलीहून यायची होती. सरांनी बोरिवलीमार्गे पुण्याला जाण्याऐवजी ‘मराठी विज्ञान परिषद’ मध्यवर्ती ठिकाण म्हणून निवडले आणि त्याप्रमाणे पुण्याला मार्गक्रमण केले. सरांनी कुलाबा ते बोरिवली हा अनाठायी प्रवास टाळून वेळ तर वाचवला होताच शिवाय इंधन वाचवले तो भाग निराळाच. मोठी माणसे कसा विचार करतात याचाच तो वस्तुपाठ होता. दरम्यान मराठी विज्ञान परिषदेत त्यांनी त्यांच्या नातीला, तिच्या वयाशी एकरूप होत ज्याप्रमाणे खेळवले, त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. त्यादिवशी आम्हा सर्वांना सरांचे एक आगळेच रूप दिसलेच त्याशिवाय त्या सर्वांचे कौटुंबिक छायाचित्र घेण्याचा मोह परिषदेतल्या आम्हा सर्वांना आवरता आला नाही.

2007 साली जुलै-ऑगस्टमध्ये केव्हातरी नारळीकर सर मुंबईत असल्याने परिषदेची विश्वस्त सभा लागली होती. सरांना विलेपार्ल्याहून परिषदेत आणण्याचे काम माझ्याकडे होते. त्या प्रवासात त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.भा.मा. उदगावकर यांच्या सन्मानार्थ एक परिषद मुंबईत होणार होती तोच धागा पकडत नारळीकर सरांना उदगावकर सरांच्या आठवणींविषयी मी विचारले. त्यावेळी त्यांनी काही आठवणी सांगितल्या. नारळीकर सरांच्या उमेदवारीच्या काळातल्या आणि मुंबईतील वास्तव्यात उदगावकर सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविकपणे  उदगावकर परिषदेनिमित्त एक स्मरणिका प्रकाशित होणार होती. त्यात नारळीकर सरांच्या लेखाचा समावेश होणार होता. खरंतर स्मरणिका प्रकाशित झाल्यावर त्यांचा लेख वाचण्याबद्दल सर सांगू शकले असते, पण सरांनी तसे केले नाही.

2013 साली गोवा सरकारच्या कला आणि सांस्कृतिक संचालनालयातर्फे डॉ. रघुनाथ माशेलकरांचा सत्कार होणार होता. तसेच त्यानिमित्त प्रकाशित होणार्‍या स्मरणिकेसाठी माशेलकर सरांविषयी काही लेख आणि छायाचित्रे त्यांना हवी होती. गोवा सरकारच्या संबधित खात्याच्या संचालकांनी त्यासाठी मराठी विज्ञान परिषदेशी शेवटच्या क्षणी संपर्क साधला होता. ओघानेच ती जबाबदारी माझ्यावर आली. माशेलकर सरांसंबंधी जे काही लेख पाठवले, त्यात नारळीकर सरांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश होता एका वर्तमानपत्राच्या रविवारच्या पुरवणीत सन 2004 मध्ये प्रसिद्ध झाला होता. वेळेच्या कमतरतेमुळे नारळीकर सरांची परवानगी घेता आली नाही. तो सत्कार समारंभ पार पडताच गोव्याहून त्या स्मरणिकेच्या काही प्रती परिषदेला पोस्टाने मिळाल्या. नारळीकर सरांच्या लेखाचा त्या स्मरणिकेत समावेश असल्यामुळे सरांना स्मरणिकेची प्रत पाठवणे आवश्यक होते. वरील प्रसंगाची पार्श्वभूमी कळवत स्मरणिका त्यांना पाठवली. नारळीकर सरांनी यथावकाश का होईना, पण त्याची पोच आवर्जून पाठवली होती. मी सांगितलेले हे काही प्रसंग कदाचित खूप साधे वाटतील, पण त्यातून नारळीकर सरांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू  समोर येईल, निश्चितपणे!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या