मीच ब्रह्म… आणि शून्यही मीच

381

>> मलिका अमरशेख

ही वसुंधरा ‘सुजलाम् सुफलाम्’च राहावी यासाठी वसुंधरेतल्या पंचमहाभूतांसकट आपल्यातलीही पंचमहाभूतं-पंचतत्त्वं निरामय राहतील याची आपणच काळजी घ्यायला हवी. एक माणूस एक हजार बिया पेरून एक हजार झाडांचं जंगल उभं करू शकतो तर दहा हजार माणसं पुन्हा नवे ऍमेझॉन उभं करू शकतात. ज्या अहंकाराने आपण ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणत सर्वनाशाचे नवे नवे पर्याय शोधले, त्या अहंकारामुळेच सूर्य विझण्याआधीच पृथ्वी निर्मनुष्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘‘कोहम्? कोहम्?’’
‘‘अहम् ब्रम्हास्मि’’
मीच ब्रम्ह आहे आणि शून्यही मीच आहे.
माझ्यात अहंकाराचा अग्नि आहे… माझ्यात कधीतरी स्पष्ट निरभ्र विचारांचं अवकाश आहे.
माझ्यात विकारांचं वादळ आहे. माझ्यात जिव्हाळा प्रेम यांचा झुळझुळणारा झरा आहे. ज्याच्या स्वच्छ शुभ्र पाण्यात जे जे मलिन अमंगळ आहे आहे ते दूर वाहून नेण्याची नष्ट करण्याची शक्ती आहे.
माझ्यात सर्जनशील समृद्ध भूमी आहे. ज्यातून मी नित्य नवीन कलाकृती निर्माण करण्याची प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ठेवतो… अन् अशा तऱहेने अग्नि-जल-पृथ्वी-वायु- आणि आकाश ही पंचतत्व पंचमहाभूतं माझ्यातच सामावलेलं आहेत. निसर्गाचं मी लाडकं अपत्य आहे आणि या सर्व गोष्टींनी मी जोडलो गेलो आहे. निसर्गातला न् माझ्यातला – तुमच्यातला हा दुवा म्हणजे नाळच आहे – जी तुटणारी नाही. जेव्हा जेव्हा मी निसर्गाविरुद्ध वागतो म्हणजे याचा अर्थ मीच माझा शत्रू होतो.

मी जंगलं तोडली याचा अर्थ मला प्राणवायू देणारी जीवनशक्तीच तोडली. माझाच गळा दाबून मी माझा श्वास बंद केला.
जेव्हा मी सागर-नद्यांमध्ये प्रदूषित रसायने, कचरा, लाखो टन टाकला त्याच वेळी मी माझ्याच रक्तामध्ये आजाराचे जंतू सोडले असाच अर्थ होतो…
ज्या विश्वाचा जन्म महास्फोटामधून झाला आणि त्यामधूनच आपल्या चिमण्या पृथ्वीचा जन्म झाला, आपण जन्मलो आणि मग आपण इतके शहाणे झालो की, इतर सर्व नष्ट करण्यासाठी ज्या अणुपरमाणूमुळे जन्मलो त्याच अणूंचा आधार घेत सर्वनाशक अणुबॉम्ब बनवले.

पंचतत्त्वातलं एक-एक तत्त्व गळून पडत आहे. आपल्यातलं एका भीषण शून्यातली ओसाड भयाण शांतताच राहील. मग ज्यातून निरस्तित्वशिवाय काहीच राहणार नाही. आपण होऊन जाऊ कृष्णविवर, आपण असे आंधळा अंधार होऊ जो अमानुषपणे सगळं गिळंकृत करत राहील. कोटय़वधी वर्षांनंतर सूर्यातला हायड्रोजन संपला की तो एखाद्या तेल संपलेल्या दिव्यासारखा विझेल आणि मग पृथ्वीवरले सर्व सजीव अस्तित्व शेवटचा श्वास घेतील असं शास्त्र्ाज्ञ म्हणतात. पण ज्य अहंकारानं आपण ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणत सर्वनाशाचे नवे नवे पर्याय शोधलेत, त्यामुळे सूर्य विझण्याआधीच पृथ्वी निर्मनुष्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न् ते होऊ नये, ही वसुंधरा ‘सुजलाम् सुफलाम्’च राहावी यासाठी वसुंधरेतल्या पंचमहाभूतांसकट आपल्यातलीही पंचमहाभूतं-पंचतत्त्वं निरामय राहतील याची आपणच काळजी घ्यायला हवी.
एक माणूस एक हजार बिया पेरून एक हजार झाडांचं जंगल उभं करू शकतो तर दहा हजार माणसं पुन्हा नवे ऍमेझॉन उभं करू शकतात. विज्ञानात एक सरळ साधा प्रयोग आहे. ऊर्ध्वपतन! त्यात कितीही गढूळ प्रदूषित पाणी उकळून त्याची वाफ-बाष्परूपात येऊन ते अत्यंत स्वच्छ पाण्यात परत रूपांतरित होतं. आता हा जरी खर्चिक उपद्व्याप असेल तरी मंगळयान/चांद्रमोहिमेपेक्षा परवडणारा न् चुकीचं परिमार्जन होऊन आपल्या नद्या-समुद्रातलं काही पाणी पुनश्च शुद्ध स्वच्छ होणं म्हणजे आपल्याच आरोग्यदायी शरीराचं न् पर्यायाने वसुंधरेचं पर्यावरणाचं पण जतन करणं आहे.

तद्वत विघटन न होणारे विषारी घटक, उदा. प्लॅस्टिक पिशव्या आणि विघटन होताच, ज्यातून कार्बन मोनोक्साईडसारखे विषारी वायू तयार करणारे घटक यांची निर्मिती पूर्णपणे बंद करून त्यांना दुसरे पर्याय शोधणे अवघड नाही.
इंधनाचा कमीत कमी वापर कसा करता येईल, ज्यायोगे प्रदूषण कमी होईल आणि सध्याच्या स्थितीत ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेले इराण-अमेरिका-आखाती देश यांनी तेल दिलं नाही तर आपण जगू शकू. सायकल किंवा घोडा, गाढव, कासव, ससा यावर बसून ऑफिसला जाण्याची वेळ येणार नाही असा पर्याय शोधून काढला तर ठीक!
सौरचूल ह एक उत्तम पर्याय आहे. तसेच जर पाण्याच्या अफाट ऊर्जेचा वापर करून जर वीजनिर्मिती करता येते, तर पेट्रोल-डिझेलऐवजी पाणी टाकून त्या पाण्यातून वीजनिर्मितीवर वाहने चालवणे शक्य नाही का?
आपल्याला पैशांची बचत वा नियोजन करण्याचे हजारो मार्ग हजार जण सांगतात, पण ज्यामुळे आपण जिवंत, सुखरूप व निरोगी निरामय आहोत त्या निसर्गातल्या जैविक संपत्तीची पंचमहाभूतांची बचत, नियोजन कसे करावे याकडे कुणाचं लक्ष नाही.
त्यासाठी प्रत्येक देशाला शंभर ग्रेटा थुनबर्ग हव्या
आहेत! शासन ते सर्वसामान्य यांना खडबडून जागं करण्यासाठी!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या