
>> सुरेश चव्हाण
आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांनी शिक्षण घेऊन स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी मीरा कदम व त्यांचे पती धनराज कदम यांनी 2019 पासून हिंगोली येथे ‘सेवासदन’ नावाचं वसतिगृह स्थापन केले आहे. शेतकरी वडिलांचे छत्र हरपलेल्या या मुलांमध्ये जगण्याची नवीन उमेद जागवल्यामुळे ‘सेवासदना’तील वीस मुलं आज उच्च शिक्षण घेत आहेत.
मीरा कदम या व्यवसायाने शिक्षिका आहेत. लहानपणीच पोलिओमुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. चालताना त्यांना आधार घ्यावा लागतो, पण त्या नेहमीच इतरांना आधार देत आल्या आहेत. त्यासाठी त्यांचे पती धनराज कदम व त्यांनी हिंगोली येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या मुलांसाठी ‘सेवासदन’ नावाचं वसतिगृह स्थापन केलं आहे. या मुलांना पोरकेपणाची जाणीव होऊ नये, त्यांनी शिकून आपल्या पायांवर उभं राहावं, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, पावसाची अनियमितता, सावकारी कर्ज, शासनाचे शेतकऱयांकडे होणारे दुर्लक्ष अशा अनेक कारणांनी शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. त्यामध्ये मराठवाडय़ातील शेतकऱयांची संख्या जास्त आहे. 2005 साली मीरा यांचे वडील गेले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आलं, वडील गेल्याचं दुःख, ते नसल्याची पोकळी आपले पती व मुलं असतानाही आपल्याला एवढी जाणवते, तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लहान मुलांना ती किती जाणवत असेल? या जाणिवेने त्यांनी मुलांना मदत करायला सुरुवात केली.
या प्रश्नावर काहीतरी काम करायला हवं, असं त्यांना वाटायला लागलं. मग त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करू लागल्या. त्यांच्या मुलांच्या अभ्यासाविषयी त्यांना येणाऱया अडचणींची जाणीव झाली. त्या शिक्षिका असल्याने त्यांना बोलण्याची, समजावून सांगण्याची हातोटी आहे. त्यामुळे ‘आत्महत्या करू नका,’ असा संदेश देण्याचे त्यांनी ठरवलं. गावागावात जाऊन मंदिरातील ध्वनिक्षेपकातून त्या शेतकऱ्यांना आवाहन करू लागल्या. आत्महत्या करणाऱयांच्या मुलांची, त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होते, हे सांगू लागल्या. अनेक वर्षे अशा पद्धतीने लोकजागृती करूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आपले पती व मुलांना विश्वासात घेतलं. त्यांच्या सहकाऱयांना सांगितलं आणि ठरवलं. सुरुवातीला 25 गरजू विद्यार्थ्यांना मदत करायची ठरवली. त्यांच्या या कामाची माहिती आजूबाजूच्या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना कळली. तेव्हा त्यांचे कुटुंबीय त्यांना भेटायला येऊ लागले. या मुलांची संख्या वाढू लागल्यावर अशा मुलांसाठी काहीतरी निवासी व्यवस्था करावी लागेल, या विचारातून त्यांनी 2019 मध्ये हिंगोली येथे 14 खोल्यांचं एक घरे भाडय़ाने घेतले.
मीरा या मूळ लातूर जिह्यातील तांदुळजा येथील रहिवासी. त्यांचं माहेर-सासर एकाच गावात असून तिथे त्यांची साडेतीन एकर बागायती शेती आहे. त्यामुळे त्यातून मिळणारं उत्पन्न तसंच शिक्षिका म्हणून मिळणारा पगार यातील बराचसा पैसा त्या ‘सेवासदन’च्या कामाला लावतात. आता त्यांच्या कामाविषयी आजूबाजूच्या गावातील दानशूर मंडळींना कळल्यावर त्यांना त्यांच्याकडून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळू लागली आहे. मीराताई गावोगावी जाऊन व्याख्यानं देत असतात. त्यातून मिळणारं मानधनही याच कामासाठी खर्ची घालतात.
कोरोनाच्या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. बाहेरची व्याख्यानं बंद झाली. त्यातून मिळणारं मानधन बंद झालं. तेव्हा वसतिगृहात 50 मुलं होती. जवळचे नातेवाईकही मुलांना घरात घ्यायला तयार नव्हते. या मुलांना कसं सांभाळावं, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला. मग त्यांनी सहा लाख रुपयांचं कर्ज घेतलं. त्याचे हप्ते त्या अजूनही फेडत आहेत, पण असे कसोटीचे प्रसंग मुलांच्या महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी अधिक प्रमाणात येतात. काही मुलांचे प्रवेश हे प्रवेश शुल्क न भरल्याने रखडतात तेव्हा संस्थाचालकांशी संवाद साधून त्यांचे शुल्क माफ होते किंवा कमी होते. काही वेळा अनेकांना विनंती करून एखादी संस्था किंवा व्यक्ती मदतीसाठी हात पुढे करते आणि वेळ निभावली जाते.
मीराताई म्हणतात, या मुलांना आताच आधार दिला नाही तर ते फक्त गावात हमालीची किरकोळ कामं करत राहतील किंवा कोणाच्या शेतात मजूर म्हणून राहतील. म्हणून पुढची पिढी वाचविण्यासाठी आपल्याला शक्य आहे, तेवढं काम करायचं, असं त्यांनी ठरवलं आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळे अनेक मुलांना आयुष्य घडवता येणं शक्य होऊ लागलं आहे. ज्यांच्या घरातील कर्तापुरुष जातो, त्या घरातील एक तरी मुलगा शिकून पुढे जावा यासाठी मीराताई मनापासून आणि जिद्दीने काम करत आहेत. पोलिओमुळे दुसऱयाचा आधार घ्यावा असं आयुष्य जगत असताना त्यावर मात करत, त्या दुसऱयांना आधार देत आहेत. त्यांच्या या कामाचा विस्तार आता होत आहे व त्यांचे सहकारी, त्यांचे पती, मुलं याकामी त्यांना मदत करत आहेत. वसतिगृहातील मुलं त्यांना ‘मीराई’ म्हणतात. ‘सेवासदना’तील मोठी मुलं लहान मुलांना शिकवण्यासाठी मदत करत असतात. हिंगोली जिह्यात काम करताना त्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ओढ कमी असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गावात व्याख्यानांच्या माध्यमातून पालकांमध्ये जनजागृती केली. त्यामध्ये त्यांना पालक गमावलेले अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर गेल्याचं दिसून आलं. या मुलांमध्ये जगण्याची नवीन उमेद जागवल्यामुळे ‘सेवासदना’तील वीस मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. त्यातील तीन विद्यार्थी वैद्यकीय, तर पाच विद्यार्थी अभियांत्रिकी आणि हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहेत, ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे.