वारसावैभव – शकुंतला एक्स्प्रेस

>>शुभांगी बागडे

रेल्वेच्या इतिहासात डोकावताना वऱहाडवासीयांना वेगळ्या प्रवासाचा अनुभव देणाऱया ‘व्हिंटेज लूक’ असलेल्या शकुंतला एक्स्प्रेसचे नाव अगदी आवर्जून घ्यायला हवं. कमी खर्चात सेवा देणारी ही विदर्भवासीयांची लोकप्रिय रेल्वे आता मात्र तिच्या पुन्हा मार्गस्थ होण्याची वाट पाहत आहे.

भारतीय रेल्वेची सेवा, देशभरात पसरलेलं रेल्वेमार्गांचं जाळं, एक्स्प्रेसच्या गाडय़ा याबाबत भारतीय रेल्वेने जगात आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय रेल्वेने केलेल्या प्रगतीमुळेच जगातील सर्वात मोठय़ा रेल्वे नेटवर्कच्या ऑपरेटिंगबद्दल नेहमीच कौतुक केले जाते. मात्र रेल्वेच्या इतिहासात डोकावताना काही रेल्वेमार्ग आणि त्यांच्या गाडय़ा यांची स्वतंत्र ओळख आहे. महाराष्ट्रात असलेली शकुंतला एक्स्प्रेस हा यवतमाळ ते अचलपूर रेल्वे मार्ग प्रवाशाच्या कुतूहलाचा विषय आहे. मुख्य म्हणजे हा रेल्वेमार्ग अजूनही सरकारच्या मालकीचा नसून ब्रिटनमधील खासगी कंपनीचा आहे. मात्र यवतमाळ-मूर्तिजापूर मार्गावर धावणारी जनसामान्यांची शकुंतला एक्स्प्रेस आता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

शकुंतला एक्स्प्रेस ही ब्रिटिश काळातील रेल्वेगाडी कायम दुर्लक्षित राहिली असली तरी महाराष्ट्रातील यवतमाळ आणि अचलपूर (अमरावती जिल्हा) मध्ये गरीब गावकऱयांसाठी ही जीवनरेखा आहे. किलिक-निक्सन नावाच्या ब्रिटिश कंपनीने 1910 मध्ये शकुंतला रेल्वेची स्थापना केली होती. सेंट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी (सीपीआरसी) या खासगी कंपनीने हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारशी करार करत विदर्भातील कापूस वाहतुकीसाठी हा रेल्वेमार्ग सुरू केला. विदर्भ हे त्या काळात कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. इथून या कापसाची निर्यात इंग्लंडमधील मँचेस्टरला केली जात असे. यामुळेच विदर्भालाही हिंदुस्थानातील मँचेस्टर असे म्हटले जात असे. या ट्रकवरील गाडय़ा जीआयपीआरद्वारे चालवल्या जातात. जीआयपीआर म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे जे स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेचा एक भाग बनले, मात्र तरीही शकुंतला रेल्वे अजूनही सीपीआरसी या कंपनीच्या मालकीची आहे. सीआरपीसी अजूनही किलिक-निक्सन या ब्रिटिश कंपनीच्या मालकीची आहे. याचे एकमेव कारण म्हणजे संपूर्ण रेल्वेचे राष्ट्रीयीकरण होताना हिंदुस्थानचे सरकार फक्त याच रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करणे विसरले. रेल्वेने करार तत्त्वावर हा मार्ग चालवायला घेतला, मात्र मालकी नसल्याने 102 वर्षांत रेल्वेने या मार्गासाठी कोणत्याही सुधारणा करत आल्या नाहीत.

या कालखंडात केवळ कोळशाचे इंजिन जाऊन डिझेलचे इंजिन या गाडीला लागले, एवढाच बदल झाला. हा रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन अंतर्गत येतो, पण मूर्तिजापूर ते यवतमाळ हा 113 किलोमीटरचा मार्ग आणि मूर्तिजापूर ते अचलपूर हा 77 किलोमीटरचा मार्ग आजही सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी यांच्या मालकीचा असल्यामुळे मध्य रेल्वेला या मार्गावर ट्रेन चालविण्यासाठी सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनीला मानधन द्यावे लागते. शकुंतला रेल्वेचा प्रवास आजही नॅरो गेजचा आहे. ती लाकडी सिटस्, आतील लाकडातील काम, मोठाले गज असलेल्या खिडक्या आणि लहान 2 फूट लोखंडी ट्रक आपल्याला ब्रिटिश काळाचा अनुभव देतात. या रेल्वेमार्गावरील सिग्नलदेखील ब्रिटिश काळातील असून यावर ‘मेड इन लिव्हरपूल’ असा उल्लेख आहे. आश्चर्य म्हणजे तिच्या मार्गावरील एकाही गेटवर कर्मचारी नाही. त्यामुळे फाटक आले की गाडी थांबते. गाडीतून कर्मचारी उतरतो, फाटक बंद करतो किंवा दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवतो. गाडी हळूहळू पुढे जाते, नंतर पुन्हा तो गाडीत जातो आणि पुढचा प्रवास सुरू होतो. या रेल्वेचा वेग कमी असूनही प्रवाशांनी तक्रार केली नाही. अतिशय कमी तिकिटात या गाडीतून प्रवास करणे शक्य होत असे. यामुळेच ही गाडी सुरू राहावी ही मागणी या भागातून कायम केली जात आहे. 2016 मध्ये अचलपूर-यवतमाळ-मूर्तिजापूर मार्गावर लवकरच ब्रॉडगेज रेल्वे सुरू होईल असे सांगण्यात आले होते, मात्र विदर्भवासीयांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.

स्वातंत्र्यसैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्नी शकुंतलाबाईंच्या नावावरून गाडीला नाव पडले, असे सांगितले जाते. अशी ही शकुंतला तिच्या प्रवासात मेळघाटातल्या विलक्षण सौंदर्याचा अनुभव देते. काही गोष्टी हक्काने वारसा म्हणून जपाव्यात अशा असतात. शकुंतला एक्स्प्रेसही अशा काळाची साक्ष देत उभी आहे. आता वाट पाहायची ती तिच्या पुन्हा मार्गस्थ होण्याची.
कमी खर्चात सेवा देणारी शकुंतला रेल्वे विदर्भवासीयांची लोकप्रिय रेल्वे ठरली. वऱहाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबई मार्गे मँचेस्टरकडे नेण्याच्या मूळ उद्देशाने ब्रिटिशांनी हा मार्ग उभारला. पुढे या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मध्य रेल्वेने प्रवासी रेल्वेची जबाबदारी स्वीकारली आणि मूर्तिजापूर ते अचलपूर या 77 किलोमीटर आणि मूर्तिजापूर ते यवतमाळ मार्गावर शकुंतलेचा प्रवास सुरू झाला. रेल्वेच्या वतीने ब्रिटिश कंपनीला रेल्वे ट्रक आणि संबंधित आस्थापनांच्या बदल्यात वार्षिक सुमारे 1 कोटी 20 लाखांवर रॉयल्टी द्यावी लागत होती. त्या कंपनीचा करार 100 वर्षांनंतर 1996 मध्येच संपला. यानंतर भारत सरकार व कंपनीतील वाटाघाटींनुसार 2006 आणि पुन्हा 2016 पर्यंत त्याला मुदतवाढ मिळाली. मात्र 2016 नंतर ही रेल्वे हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आली आणि आता बंद अवस्थेतच आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या