ठसा – शांताबाई काटे

38

तमाशा ही लोककला जिवंत राहिली ती जिवापाड जोपासणाऱया लोककलावंतांमुळे. एक काळ असा होता की, तमाशा हा ग्रामीण समाजकारणाचा एक अविभाज्य भाग होता. त्याचा एक देदीप्यमान कालखंड होऊन गेला. तमाशा आणि ही कला ‘जगणारे’ लोककलाकार यावर लोकांनी भरभरून प्रेम केले. या प्रेमाबरोबरच या कलाकारांना प्रसिद्धीही तेवढीच मिळाली, मात्र त्याचवेळी लोककलाकारांना बसलेल्या आर्थिक विपन्नावस्थेच्या ‘शापा’तून तमाशा कलावंतही सुटले नाहीत. उमेदीचा काळ बऱयापैकी पैसा आणि प्रसिद्धीच्या झोतात काढल्यानंतर उर्वरित आयुष्य आर्थिक गर्तेत ढकलले गेले. हा विदारक अनुभव अनेक लोककलाकार आणि तमाशासम्राज्ञींच्या वाटय़ाला आला. तमाशासम्राज्ञी शांताबाई काटे यांनादेखील याच भयंकर अनुभवातून जावे लागले आणि अखेर मृत्यूनेच त्यातून त्यांना मोकळे केले. गेल्या आठवडय़ात काळाच्या पडद्याआड गेलेल्या शांताबाईंनी एकेकाळी तमाशांचे फड अक्षरशः गाजवले. नगर जिल्हय़ातील शेवगाव तालुक्यातील आरखी कोरडगाव हे शांताबाईंचे मूळ गाव. शेतकाम करणाऱया शांताबाई दिसायला सुंदर. अंगात कला उपजतच. त्यामुळे वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्यांनी जे तमाशाच्या फडावर पाऊल टाकले ते नंतर तब्बल 30-35 वर्षे थिरकतच होते. आधी नाशिक येथील एका तमाशात त्यांनी काम केले, पण पुढे शांताबाईंनी थेट मुंबई गाठली. माधवराव नगरकर यांचा तमाशा त्यावेळी मुंबईत जोरात होता. त्यात शांताबाई सामील झाल्या. पुढे नगरकर आणि शांताबाई ही जोडी हिट ठरली. तब्बल तीन दशके या जोडीने फड गाजवला. रसिकांवर राज्य केले. हरिश्चंद्र तारामती, महारथी कर्ण, संत तुकाराम ही त्यांची वगनाटय़े तेव्हा प्रचंड गाजली. लोकं ती पाहण्यासाठी गर्दी करत. शांताबाई या जशा हाडाच्या कलावंत होत्या तशा प्रचंड कनवाळूही होत्या. अडल्यानडल्याला परतफेडीची अपेक्षा न धरता त्यांनी अनेकदा मदत केली. मात्र त्यामुळेच कधीकाळी अंगावर प्रचंड सोन्याचे दागिने घालून फड गाजविणाऱया या तमाशासम्राज्ञीच्या नशिबी आयुष्याचा उत्तरार्ध विपन्नावस्थेत घालविण्याची वेळ आली. प्रसिद्धीच्या झोतात असताना आसपास असणारे विपरीत परिस्थितीत कसे लांब जातात हा दाहक अनुभव अनेक लोककलाकारांप्रमाणे शांताबाईंच्याही वाटय़ाला आला. अर्थात, या हलाखीच्या परिस्थितीतही त्या स्वाभिमानाने जगल्या. रोजच्या जगण्यासाठी त्यांच्यावर कर्ज काढण्याची वेळ आली तरीही त्या डगमगल्या नाहीत. जे काही उत्पन्न मिळत असे त्यातून त्याची त्या परतफेड करीत. आपल्या कलेने एक काळ गाजविणाऱया या तमाशासम्राज्ञीलाही उत्तरायुष्यातील विपन्नावस्था चुकली नाही. लोकांनाच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले, यावरून शांताबाईंच्या एकूण हलाखीची कल्पना यावी. लोककलाकारांच्या वाटय़ाला आलेल्या या शोकांतिकेची आणखी एक नायिका म्हणून शांताबाई काटे रसिकांच्या लक्षात राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या